पॉलिसी क्लेम कताना...

सुधाकर कुलकर्णी
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

अर्थविशेष

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा मुख्य उद्देश, आपल्या पश्चात आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांसाठी आर्थिक तरतूद करणे हाच असतो. अशा पॉलिसीचे प्रामुख्याने दोन प्रकारचे क्लेम केले जातात १) डेथ क्लेम व २) मॅच्युरिटी क्लेम. डेथ क्लेम हा नॉमिनीने करावयाचा असतो. हा क्लेम कसा करावा याबाबत बऱ्याचदा नॉमिनीला पुरेशी माहिती नसते. चुकीची अथवा अपुरी माहिती देऊन केलेला क्लेम नाकारला जातो व यामुळे पॉलिसी घेण्याच्या मूळ उद्देश साध्य होत नाही. 

  • लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर क्लेम दाखल करण्यापूर्वी नॉमिनी/क्लेमंट असणाऱ्या व्यक्तीने खाली उल्लेख केलेल्या बाबींची खात्री करून घ्यावी -
  •     संबंधित लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अॅक्टिव्ह (चालू) आहे का व क्लेम करण्यापर्यंतच्या कालावधीचे पॉलिसीचे सर्व प्रीमियम भरलेले आहेत का?
  •     ज्या विशिष्ट परिस्थितीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला आहे, त्यासाठी क्लेम लागू आहे का? पॉलिसीमध्ये तसा उल्लेख आहे का?
  •     पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत.

डेथ क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया 
साधारण पुढीलप्रमाणे असते.
स्टेप १ : क्लेम फॉर्म भरून संबंधित इन्शुरन्स कंपनीस शक्य तितक्या लवकर कळवावे. क्लेम फॉर्म इन्शुरन्स कंपनीच्या नजीकच्या कार्यालयात मिळू शकतो किंवा आजकाल इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावरूनसुद्धा डाऊनलोड करून घेता येतो. तसेच आजकाल ऑनलाइनसुद्धा पाठविता येतो.

फॉर्ममध्ये पॉलिसीधारकाचे पूर्ण नाव, पॉलिसी नंबर भरून फॉर्मला मृत्यू दाखला व पॉलिसीची मूळ प्रत जोडावी लागते. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी घेतल्यापासून तीन वर्षांच्या आत झाला असेल, तर इन्शुरन्स कंपनी संबंधित व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याबाबतचे हॉस्पिटलचे पत्र मागण्याची शक्यता असते व त्यात नेमके काय उपचार केले गेले याबाबत माहिती असावी लागते.

जर मृत्यू विमान अपघात अथवा जहाज बुडून झाला असेल, तर संबंधित सक्षम अधिकाऱ्याचे पॉलिसीधारक व्यक्ती विमानात/जहाजात होती याबाबतचे प्रमाणपत्र जोडावे लागते.

जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पूर, चक्रीवादळ, भूकंप किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीत किंवा अतिरेकी हल्ला यात झाला आणि देह मिळाला नाही, तर कोर्टाकडून जाहीर केलेल्या यादीचा आधार घेता येतो. अशा प्रसंगांवेळी कोर्ट बेपत्ता व्यक्तींना मृत मानून त्यांच्या नावांची यादी जाहीर करते. या यादीत पॉलिसीधारकाचे नाव असेल, तर मृत्यू दाखला नसला तरी नॉमिनी क्लेम दाखल करू शकतो व असा क्लेम इन्शुरन्स कंपनी सेटल करू शकते.

जर खून, अपघात किंवा आत्महत्या यांसारख्या कारणाने अकस्मात मृत्यू झाला असेल, तर क्लेम फॉर्मबरोबर पोलिस एफआयआर, पंचनामा, पोस्टमार्टेम (शव विच्छेदन) रिपोर्ट जोडावा लागतो.

जर पॉलिसी धारकाने पॉलिसी घेतलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत आत्महत्या केली असेल, तर क्लेम दिला जात नाही. केवळ भरलेल्या प्रीमियमच्या ८० टक्के इतकीच रक्कम वारसाला मिळू शकते.

स्टेप २ : क्लेम फॉर्मबरोबर नॉमिनीच्या बँक खात्याचा तपशील, या खात्याचा कॅन्सल्ड चेक, आधार कार्डची फोटो कॉपी जोडावी लागते. 

स्टेप ३ : वरील सर्व पूर्तता केल्यावर जर इन्शुरन्स कंपनीकडून अन्य आवश्यक माहिती मागितली गेली, तर त्याबाबत पूर्तता करावी लागते.

आयआरडीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार क्लेम दाखल केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत इन्शुरन्स कंपनीने क्लेम सेटल करणे आवश्यक आहे. क्लेम सेटल करण्यापूर्वी काही आवश्यक चौकशी करणे गरजेचे असेल, तर अशी चौकशी करून सहा महिन्यांच्या आत (क्लेम दाखल केल्यापासून) इन्शुरन्स कंपनीने क्लेम सेटल करणे आवश्यक आहे.

जर पॉलिसीधारक बेपत्ता असेल व त्याबाबत रीतसर पोलिसात तक्रार नोंदविली असेल, तर तक्रार नोंदविल्यापासून सात वर्षांच्या कालावधीनंतर पोलिसांकडून सदर व्यक्तीचा तपास लागलेला नाही असा (नॉन ट्रेसेबल) रिपोर्ट घेऊन तो कोर्टात सादर करावा लागतो. कोर्टाकडून सदर व्यक्ती मृत समजावी असे प्रमाणपत्र मिळवावे लागते व हे प्रमाणपत्र क्लेमबरोबर दाखल करून नॉमिनी क्लेम मिळवू शकतो. असा क्लेम मिळवताना जर कधी अशी व्यक्ती प्रकट झाली, तर क्लेमची रक्कम व त्यावरील नियमांनुसार होणाऱ्या व्याजासहित रक्कम इन्शुरन्स कंपनीला  परत केली जाईल, याबाबतचे हमी पत्र क्लेम घेणाऱ्याने इन्शुरन्स कंपनीला देणे गरजेचे असते.

याउलट मॅच्युरिटी क्लेम मिळणे खूपच सोपे असते. साधारणपणे एक ते दोन महिने आधी इन्शुरन्स कंपनीकडून याबाबत पॉलिसीधारकास याबाबत सूचना दिली जाते. आपण पॉलिसीची मुदत संपण्याआधी किंवा संपल्यानंतर लगेचच क्लेम दाखल करू शकता. यासाठी आपली मूळ पॉलिसीची प्रत, आपल्या बँक खात्याचा तपशील, याच खात्याचा कॅन्सल्ड चेक, आधार कार्ड व पूर्ण भरलेला क्लेम फॉर्म इन्शुरन्स कंपनीच्या ज्या ऑफिसमधून आपण पॉलिसी घेतली असेल, त्या ऑफिसमध्ये द्यावा लागतो. साधारणपणे मुदतीनंतर एक-दोन दिवसांत आपल्या बँक खात्यात क्लेम रक्कम जमा होते (जर आपण मुदत संपण्यापूर्वी क्लेम फॉर्म सबमिट केला असेल तर).

डेथ क्लेम नाकारला जाण्याची प्रमुख कारणे:

  •     पॉलिसी घेताना चुकीची अथवा खोटी माहिती दिली जाणे, उदाहरणार्थ असलेले आजार, व्यसने, व्यवसायाचे स्वरूप, साहसी छंद यांचा हेतुपुरस्सर पॉलिसी फॉर्ममध्ये उल्लेख न करणे.  
  •     पॉलिसी प्रीमियम न भरल्याने पॉलिसी लॅप्स होणे. 
  •     नॉमिनेशनमधील बदल इन्शुरन्स कंपनीला वेळीच न कळविणे (उदा. बहुधा पॉलिसी घेताना आई किंवा वडील यांना नॉमिनी केले जाते. पुढे विवाहानंतर त्यात बदल केला जात नाही. जर पॉलिसीधारकाच्या आधी नॉमिनीचा मृत्यू झाला, तर सदर पॉलिसीला नॉमिनेशन राहत नाही.)

    इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणत्या प्रकारच्या मृत्यूमुळे क्लेम दिला जाणार नाही याबाबत उल्लेख असतो. उदा. एक वर्षाच्या आतील आत्महत्या, मादक पदार्थांचे अति सेवन, नशेत असताना वाहन चालविताना झालेला अपघाती मृत्यू.
 थोडक्यात असे म्हणता येईल, की मॅच्युरिटी क्लेम अगदी सहजगत्या दिला जातो. मात्र डेथ क्लेम सेटल करताना वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींची खातरजमा करूनच डेथ क्लेम सेटल केला जातो. त्या दृष्टीने डेथ क्लेम दाखल करताना नॉमिनीने आवश्यक माहिती घेऊन त्यानुसार पूर्तता केल्यास क्लेम नाकारला जाण्याची शक्यता राहत नाही.
(या लेखाबरोबर ‘सुरक्षा कवच’ हे सदर समाप्त होत आहे.)

संबंधित बातम्या