पसंतीची मोहोर 

ऋता बावडेकर
सोमवार, 6 मे 2019

मनोगत
 

एखादे नियतकालिक किती लोकप्रिय आहे हे वाचकांसह सगळ्यांनाच माहिती असते. पण या पसंतीवर जेव्हा एखाद्या मान्यवर यंत्रणेची अधिकृत मोहोर उमटते, तेव्हा होणाऱ्या आनंदाला पारावार नसतो. ‘सकाळ’च्या ‘सकाळ साप्ताहिक’ या मराठीतील अग्रगण्य नियतकालिकाला असे यश लाभले आहे. 

इंडियन रिडरशिप सर्व्हेचा (आयआरएस) यंदाचा अहवाल हेच सांगतो आहे. या अहवालानुसार ‘दैनिक सकाळ’च्या वाचकसंख्येत १३ लाख ४३ हजारांची दणदणीत वाढ झाली आहे. ‘सकाळ’चे वाचक एक कोटी १८ लाख ४१ हजार आहेत. यापूर्वी ऑडिट ब्युरो सर्क्‍युलेशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील मराठी दैनिकाच्या खपात ‘सकाळ’ पहिल्या स्थानावर असून ‘सकाळ’चा खप १२ लाख ९२ हजार इतका नोंदवला आहे. त्यानंतर आता ‘आयआरएस’च्या आकडेवारीनेही ‘सकाळ’च्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केले आहे. 

‘दैनिक सकाळ’चाच एक भाग असलेल्या ‘सकाळ साप्ताहिक’ या नामवंत नियतकालिकानेही असेच लक्षणीय यश मिळविले आहे. ‘सकाळ साप्ताहिका’ची वाचकसंख्या पाच लाख पाच हजार होती. ती आता पाच लाख ५२ हजार एवढी वाढली आहे. वाचकांचा असा उदंड प्रतिसाद नक्कीच उत्साह वाढवणारा असतो. 

वाचकांना काय वाचायला आवडते? हे ठरवणे हा खूप उत्सुकतेचा, आनंदाचा आणि गुंतागुंतीचा भाग असतो. गुंतागुंतीचा अशासाठी, की ‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ या न्यायाप्रमाणे एखादा विषय एखाद्याला आवडला तरी तो दुसऱ्याला तेवढा आवडेलच असे नाही. मोठ्या लोकांचे विषय मुलांना तेवढ्या तीव्रतेने भावतीलच असे नाही. 

पण ही प्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी एकदा वाचकांची मूळ आवड लक्षात आल्यावर पुढची प्रक्रिया खूप सोपी होऊन जाते. ज्येष्ठ नागरिक हे आमचे सुरुवातीपासूनचे वाचक आहेत. हा एक असा गट असतो, जो सगळ्या वयोगटांसाठी असलेले विषय मोठ्या आवडीने वाचतो. त्यांच्याकडे वेळच वेळ असतो, अशी कुत्सित टीका कोणी यावर करेल; पण ते खरे नाही. कारण वय वाढले तरी माणसाची उत्सुकता, नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा ही वयावर आणि हातात असलेल्या वेळेवर अवलंबून नसते. जगात काय घडते आहे याबद्दल हा वयोगट खूप जागरूक असतो. त्यामुळे सगळी माहिती ते वाचत असतात. या वयोगटाबरोबरच तरुण मुलांसाठी (यात मुलीही आहेतच) आम्ही अंकात खूप वेगळे विषय देण्याचा प्रयत्न करतो. त्यात पर्यटन, किल्ले भ्रमंती, टेक्‍नॉलॉजी, फॅशन, ब्लॉग, ट्रेकिंग.. असे कितीतरी विषय आहेत. हे विषयही त्या त्या वयोगटातील लेखक-लेखिकांनीच लिहिलेले आहेत. त्यामुळे नवनवीन विषय येतात आणि ही मुले कसा विचार करतात हेही कळते. शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले-मुली परगावी - परदेशात जातात. तिथेच त्यांना राहावे लागते. सुरुवातीचे काही दिवस बरे असतात; मग घरच्या स्वयंपाकाची आठवण येऊ लागते. हल्ली अनेक आया आपापल्या मुलांना स्वयंपाकाचे धडे देतात. पण ज्यांना काहीच माहिती नसते अशा मुला-मुलींसाठी आम्ही ‘कुकिंग-बिकींग’ हे सदर सुरू केले आहे. भात कसा लावावा, डाळ कशी लावावी, कणीक कशी मळावी, दही कसे लावावे... इथपासून हे प्रशिक्षण दिले आहे. हे सदर अजूनही सुरू आहे. पाककृतींवरची आमची इतर सदरेही खूप लोकप्रिय आहेत. पर्यटन आणि फूडपॉइंट यासाठी तर आमच्या वाचकांकडून आलेले लेखनच आम्ही प्रसिद्ध करतो. याशिवाय कोडे, भविष्य, पुस्तकपरिचय अशी कितीतरी वाचकप्रिय सदरे आहेत. 

या सगळ्यात अगदी लहान मुले हा भाग काहीसा दुर्लक्षित राहतो. त्यांचा विचार करताना ८ ते १५ असा वयोगट आम्ही निश्‍चित केला. मागील वर्षीपासून त्यांच्यासाठी चार पाने आम्ही नियमितपणे देत आहोत. नावाजलेली चित्रे-चित्रकार, वनस्पतींची माहिती, निसर्गातील चमत्कृती असे विषय मागील वर्षभर आम्ही दिले. अनेक मुलांना गणिताची प्रचंड भीती वाटत असते. ती कमी करावी आणि हसत खेळत गणित कसे शिकावे, यासाठी मागील वर्षीपासून डॉ. मंगलाताई नारळीकर ‘गणितभेट’ हे सदर लिहीत आहेत. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या वर्षी तीन नवीन सदरे आम्ही सुरू केली. वैज्ञानिक व विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके यांचे ‘कुतूहल’ हे सदर सुरू आहे. मुलांना खूप प्रश्‍न पडत असतात. त्यातील काही आपल्याला विचित्र वाटतात. पण ते तसे नसतात. अशा प्रश्‍नांची उत्तरे डॉ. फोंडके या सदरात देऊन मुलांचे कुतूहल शमवतात. सह्याद्री प्रमाण धरून तेथील प्राणी, पक्षी, कीटक, झाडी, विविध जीवसृष्टी अशी विविध प्रकारची माहिती ‘निसर्गकट्टा’ या सदरांत मकरंद केतकर देतात. दहा वर्षांची मुलगी नेमका कसा विचार करत असेल, तिला काय प्रश्‍न पडत असतील, त्यांची उत्तरे ती कशी शोधत असेल असा संवाद ‘साराची डायरी’मधून प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री विभावरी देशपांडे साधतात. 

असे विविध वयोगट लक्षात घेऊन लेखांचा विचार आम्ही केला आहे. मात्र हे करताना हे लेखन केवळ त्या त्या वयोगटापुरतेच मर्यादित नाही. सगळ्यांना आवडेल असा आमचा प्रयत्न होता आणि आहे. आपल्या मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील आखणीसाठी त्यामुळे हुरूप आला आहे. तुमची साथ मात्र हवी... ती मिळेल याची खात्री आहे.   

संबंधित बातम्या