...तिथे फक्त परिणाम असतात

-
सोमवार, 21 डिसेंबर 2020

संपादकीय

समाज म्हणून काही काही वेळा आपल्या वागण्याचा लंबक दोन संपूर्णपणे विरुद्ध टोकांच्या मध्ये झुलत असतो. एखाद्या आपत्तीच्या वेळी माणुसकी, सद्भावना, विवेकाने वागण्याची पराकोटीची उदाहरणे घालून देणारी माणसं, दुसऱ्या एखाद्या प्रसंगात तोच विवेक का दाखवू शकत नाहीत, हे एक कोडंच वाटतं. महापुरात, दुष्काळात, अतिवृष्टीत, भूकंपात, माणुसकीच्या भावनेला साद घालणाऱ्या आणखी कोणत्या एखाद्या प्रसंगात माणसं माणसांसाठीच नव्हे तर अगदी मुक्या जनावरांनाही आधार देताना काहीतरी जगावेगळं, अतर्क्य करून जातात, आणि एखाद्या वेळी अशीच काही, एरवी खूप छान वागणारी, प्रेमळ असणारी माणसं सगळा साक्षेप हरवून बसतात, कुठल्यातरी लाटेत वाहून जातात. माणसाच्या मनाचा शोध घेणाऱ्या शास्त्राला याविषयी नक्की काहीतरी म्हणायचं असणार, पण मानवी व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे आणि त्यातले ताणे-बाणे समजावून घेऊनही ह्या कोड्याचं उत्तर मिळत नाही. गेल्या आठवड्यात वाट चुकून पुण्याच्या पश्चिम सीमेवरच्या एका कॉलनीत आलेल्या गव्यामुळे हे कोडं पुन्हा पडलं.

गवा, माणसांच्या जंगलात आला आणि पुढे काय झालं यावर रकानेच्या रकाने लिहिले गेले आहेत. आताचा मुद्दा आहे तो स्वतःच्या बुद्धिमत्तेमुळे वेगळा ठरलेला माणूस या ताज्या प्रसंगातून काही शिकणार आहे की अजूनही आपण सगळे प्राण्यांवर एका अर्थाने आपणच लादलेल्या संघर्षातून होणाऱ्या जखमांवर तात्पुरत्या मलमपट्ट्या करत राहणार आहोत.

आक्रमणं, शिकारीपासून ते झाडतोडीपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी आक्रसत जाणारा  वन्यप्राण्यांचा अधिवास, ''जीवो जीवस्य जीवनम्'' या न्यायाने चालणाऱ्या निसर्गचक्रातल्या कमकुवत होत जाणाऱ्या, गळून पडणाऱ्या कड्या अशा अनेकविध कारणांमुळे वन्यजीवांच्या माणसाबरोबर होणाऱ्या संघर्षाने अनेक ठिकाणी परिसीमा गाठलेली दिसते. आणि जाणकारांच्या मते हा संघर्ष वाढतच जाणार आहे.  वाघाचं, बिबट्याचं किंवा अन्य प्राण्याचं अस्तित्व मान्य करणारी गेल्या पिढीतली माणसं भेटतातही अजून. पण या साहचर्याला आता संघर्षाची, अतिक्रमणाची किनार लागली आहे. वाढत वाढत थेट अरण्यात घुसलेली शहरं, वाढती शेती, उद्योग, शहराच्या गजबजाटापासून शांतता मिळवण्यासाठी माणसानी अरण्यात मांडलेला गजबजाट, वन्यप्राण्यांकडून होणारे हल्ले, त्यात जाणारे बळी, शेतीचं, गुराढोरांचं नुकसान अशा कारणांनी ही किनार काही ठिकाणी खूप गडद झालेली दिसते.

वाट चुकून थेट पुणे शहरातच शिरलेल्या गव्याच्या घटनेने वन्यप्राणी आणि माणसांमधल्या संघर्षात काही ना काही भूमिका बजावणाऱ्या सगळ्याच माणसांविषयी पुन्हा नव्याने चर्चा सुरू झालीय. ह्या चर्चेचे बरेच पैलू आहेत; आणि त्यातले बरेचसे मुद्दे निव्वळ कुतुहलापासून सुरू होऊन सार्वजनिक उन्मादात रुपांतरीत होणाऱ्या लाटेत सहज वाहून जाताना प्राण्याच्या सुटकेपेक्षा सेल्फीला आणि ती सेल्फी समाजमाध्यमांवर सर्वप्रथम झळकवण्याला प्राधान्य देणाऱ्या बिनचेहऱ्याच्या गर्दीनेही समजावून घ्यावे असे आहेत.  

पुण्यात प्राणाला मुकलेल्या गव्याच्या निमित्ताने झडलेल्या चर्चांमध्ये एका बाजूला तज्ज्ञांनी वन्यजीव धोरणाचा मुद्दा मांडला, तर दुसऱ्या बाजूला यंत्रणांमधल्या समन्वयाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. अशा परिस्थितीत कोणी नेमकं काय करायचं याच्या चेक लिस्ट्स किंवा स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर्स तयार असणे आणि त्या सर्व थरातल्या संबंधितांना माहीत असणे यावरही भर दिला गेला. काही प्राण्यांच्या बाबतीत अशा एसओपीज् आहेतही, हे देखील बऱ्याचजणांना नव्याने समजलं.

याला एक मुद्दा जोडावासा वाटतो. वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या लोकांच्या संस्थांना, मंडळांना, गटांना जोडून घेण्याचा. व्हॉट्सअॅप विद्यापीठ हातात असल्याने आपण सर्वच विषयांचे तज्ज्ञ आहोत असा समज असणारी एक आख्खी पलटण सतत आपल्या आजूबाजूला असते. अस्थानी ज्ञानाची ही गंगोत्री कोणता विषय कुठे घेऊन जाईल याचा काहीच अंदाज कोणालाही येऊ शकत नाही, अशा परिस्थितीत यंत्रणांशी समन्वय असणाऱ्या नागरिकांची मदत मोलाची ठरेल, या बाबत शंका नसावी. संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असतेच, पण मदतीचा हा हात केवळ भावनांमध्ये गुंतलेला न राहता त्याला शिस्तशीर प्रशिक्षणाची जोड दिली तर बचाव आणि मदतीच्या कामाला ती महत्त्वाची जोड ठरेल. महाविद्यालयीन स्तरावर चालणारे एनसीसी, एनएसएस सारखे प्रकल्प केवळ अंतिम परीक्षेतल्या काही गुणांसाठी न राहता त्याच्याही पलीकडे नेण्याची ही एक संधीही असू शकते. वन्यप्राण्यांना समजावून घेणं हे प्राणी पहाण्याइतकंच रंजक असू शकतं. हा धागा पकडून गावागावात, विशेषतः प्राणी आणि माणसामधल्या ताणल्या गेलेल्या नात्याला तोंड देणाऱ्या गावांमध्ये, जर त्यांच्या भागातल्या प्राण्यांचे स्वभाव, सवयी यांबद्दल थोडीफार माहिती असणारे मुला-मुलींचे गट तयार केले, त्यांच्या मार्फत त्या परिसरातल्या रहिवाशांबरोबर खात्रीलायक संपर्क निर्माण करता आला, तर मनुष्यवस्तीत येणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणांकडून होत असलेल्या प्रयत्नांची परिणामकारकता वाढू शकते. ह्यात फार नवे काही आहे अशातला भाग नाही. बिबट्यांच्या धाकात राहणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागातल्या काही गावांमध्ये महाराष्ट्राच्या वनखात्याने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने असा एक प्रयत्न करून पाहिला आहे.

या संदर्भाने अमेरिकी लेखक रॉबर्ट ग्रीन इन्गरसोल (1833 -1899) यांचं एक उद्धृत लक्षात ठेवण्याजोगं आहे, ते म्हणाले होते. "इन नेचर, देअर आर नायदर रिवॉर्ड्स, नॉर पनिशमेंट्स, देअर आर कॉन्सिक्वेन्सेस!" (निसर्गात फक्त परिणाम असतात, बक्षिसं, दंड असं काही नसतं.   

संबंधित बातम्या