सडत न एक्या ठायी ठाका...

-
सोमवार, 18 जानेवारी 2021

संपादकीय

चेंज इज द ओनली कॉन्स्टन्ट इन द लाइफ - जगण्यात बदलच काय तो शाश्वत असतो - असं ग्रीक तत्त्वज्ञ हेराक्लिटसने म्हणाला होता. काही हजार वर्षांपूर्वी. हेराक्लिटसने सांगितलेलं हे शाश्वत सत्य आपल्यापैकी बहुतेकांना उमगलेलं असतं, अंगवळणी पडलेलं नसलं तरी मनाच्या आतल्या गाभ्यात कुठेतरी मान्यही असतं. आयुष्याच्या लांबलचक प्रवासात आपण सगळेच पुन्हा पुन्हा हेराक्लिटस ऑफ इफेससच्या वळणाशी येत असतो, काहीवेळा आपण बदल स्वीकारतो कारण आपल्याला तो हवा असतो, आणि काही वेळा आपल्याला तो स्वीकारावा लागतो कारण सटवाईला तो हवा असतो...

माणूस म्हणून वाढताना माणसाच्या प्रवासात उभ्या मनुष्यजातीची कसोटी पहाणारे असंख्य प्रसंग येऊन गेले आहेत. काही माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते, काही त्याच्याच कर्तुत्वामुळे त्याच्यासमोर आव्हान म्हणून उभे ठाकले होते, पुराणातल्या भस्मासुरासारखे. पण बुद्धीबरोबरच माणसाकडे असलेल्या विजिगिषु वृत्तीने या प्रत्येकवेळी माणूस दरीच्या काठाशी येता येता कुठल्या ना कुठल्या बदलाचा वेध घेऊन रस्ते बदलत राहिला, जगला, तगला.

सार्स-कोव्ह-२ या नावाच्या डोळ्यांना न दिसणाऱ्या विषाणूनी असंच आपल्याला आणखी एका दरीच्या तोंडाशी उभं केलंय. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा आधार असणाऱ्या तेजोनिधीला संपूर्णपणे ग्रासून टाकणाऱ्या ग्रहणसमयीच फक्त दिसणाऱ्या ज्वाला-मुकुटाची आठवण करून देणाऱ्या कोरोना नावाच्या विषाणू कुळातलं हे शेंडेनक्षत्र आपल्याला बदल स्वीकारणं भाग पाडतं आहे. आपल्या जीवलगांशी आपण कसं वागायचं इथंपासून ते जगण्यासाठी करण्याच्या प्रयत्नात आपल्या हाताशी असणाऱ्या कौशल्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आता आपल्याला पुन्हा विचार करावा लागणार आहे. कृत्रीम बुद्धिमत्तेसारख्या अगदी अलीकडच्या तंत्रज्ञानानी माणसाला बदलाच्या एका वळणावर आणून उभं केलंच होतं, इंडस्ट्री 4.0 कडे जाताना पूर्वापार बाणवलेली अनेक कौशल्यं इतिहासजमा होताना आपण पहात होतोच, नव्या कौशल्यांचा शोध घ्यायला, काही भविष्यवेधी माणसं बाकीच्या जगाला नव्या कौशल्यांसाठी तयार व्हायला सांगतही होती. कोविड-१९ या कोरोना कुलोत्पन्नाने आता ही सगळी प्रक्रिया सटवाईच्या लेखासारखी अपरिवर्तनीय करून ठेवली आहे.

कोवि़ड-१९ला, भविष्यातल्या त्याच्या रूपांना रोखणारी ढाल लशीच्या रूपानं उभी रहातेच आहे; संशोधक ती ढाल अधिकाधिक अभेद्य करत नेतील; माणूस पुन्हा उभा राहील, पण हे घडत असताना आपल्या सगळ्यांनाच जगण्याच्या कौशल्यांचा पुन्हापुन्हा विचार करावा लागेल. भविष्याल्या बदलांचा अंदाज घेत रहावं लागेल; कुठे, काय आणि केव्हा बदलायचं हे वेळेवर समजेल अशा क्षमता बांधाव्या लागतील. ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते असं म्हणतात. पण ही शिदोरी कधीतरी एकदाच बांधलेली नसावी, त्या शिदोरीतलं ज्ञान अद्ययावत राहील याची काळजी घेण्याची गरज कधी नव्हे एवढी वाढली आहे.

एका बाजूला कोविड-१९ नी जगाची परिभाषा बदललेली आहे, दुसरीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानानी उद्योगांसह बहुतेक सर्व क्षेत्रं व्यापून टाकली आहेत. बऱ्याच क्षेत्रातली बरीचशी कामं आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने यंत्रमानव त्यांच्या जन्मदात्या माणसांपेक्षा वेगाने करणार असतील तर माणसांना या यंत्रांच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एक पाऊल पुढे रहाण्याचा विचार करवा लागेल. यंत्र जे करणार नाहीत, माणसाइतक्या तारतम्याने करू शकणार नाहीत त्याचा शोध घेत रहावं लागेल.

स्कील सेट्स हा आता परवलीचा शब्द बनला आहे, आणि पुढच्या पिढीने तो समजावून घ्यावा असं वाटत असेल तर ती जबाबदारी आधीच्या पिढीला उचलावी लागेल.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फ्युचर ऑफ जॉब्ज् हा ताजा अहवाल या सगळ्या परिस्थितीवर प्रकाश टाकतो. आज आपण एका निर्णायक वळणावर आहोत. आज आपण जे ठरवू त्याचे दूरगामी परिणाम आपल्या संपूर्ण पिढीच्या जगण्यावर होणार आहेत, असं फोरमचे संस्थापक क्लॉस श्वाब आणि व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्या सादिया झाहिदी यांनी या अहवालाच्या प्रस्तावनेतच अधोरिखित केलं आहे. आताची तातडीची गरज आहे ती अधिक निष्पक्ष, दर्जेदार, चिरस्थायी, उचित आर्थिक-सामाजिक घडी निर्माण करण्याऱ्या ग्लोबल रिसेटची -नव्या जागतिक रचनेची. त्यांना अपेक्षित असणाऱ्या रचनेत सामाजिक सुसंवाद असेल. ती रचना नवचैतन्य निर्माण करणारी असेल आणि त्या रचनेतली आर्थिक समृद्धी पृथ्वीच्या स्वास्थ्याशी सुसंगत असेल. ही संधी हातची जाऊ देता उपयोगी नाही, यावरही त्यांचा भर आहे.

समतेचा ध्वज उंच धरून, तुतारीच्या सुरांबरोबर नीतीची द्वाही पसरवताना, प्राप्तकालाच्या विशाल भूधरावर सुंदर लेणी खोदण्याच्या संदेश देणारे केशवसुतही सव्वाशे वर्षांपूर्वी सांगत होते -सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका...

संबंधित बातम्या