भूतकाळाचे आव्हान

-
सोमवार, 25 जानेवारी 2021

संपादकीय

ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये, या परंपरेने दिल्या जाणाऱ्या सल्ल्याकडे अनवट वाटांची ओढ असणाऱ्या काही मंडळींनी दुर्लक्ष केल्याने माणसाची मुळं शोधण्याचं माणसाचं काम अव्याहतपणे सुरू आहे. ''को हं..'' या प्रश्नाचं उत्तर जेवढं जवळ येतंय असं वाटतं तेवढंच ते नजरांच्या पल्याड असतं हा या खेळातला नित्याचा अनुभव. माणसाच्या पूर्वजांनी मागे ठेवलेल्या खाणाखुणांचा अभ्यास करताना माणसाच्या संस्कृतीचा एकेक पापुद्रा उलगडत जातो आणि माणसाच्या स्वभावाच्या ताण्याबाण्यांपासून ते त्याच्या रोजच्या जगण्याच्या लढाईपर्यंतची अनेक सत्ये सामोरी येत जातात. गेल्या आठवड्यात इंडोनेशियाच्या दक्षिण सुलावेसी प्रांतात सापडलेल्या एका गुहाचित्रामुळेही माणसाच्या उत्क्रांतीतल्या काही मिसिंग लिंक उजेडात येतील असं संशोधकांना वाटतं आहे. यासंदर्भातला एक शोधनिबंध सायन्स अॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्धही झाला आहे. कातळशिल्प कुटुंबाचा भाग असणारं सुलावेसीतल्या चुनखडीच्या गुहेतलं हे रानडुकराचं चित्र आत्ताच्या हिशेबाप्रमाणे तरी जगातलं सगळ्यात जुनं म्हणजे साडेपंचेचाळीस हजार वर्षांपूर्वीचं आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या चित्राच्या वरच्या भागात चितारलेले दोन मानवी हात आपल्याला माणसाच्या, आता लुप्त झालेल्या, डेनिसोव्हन किंवा डेनिसोव्हा होमिनिन्स या कुळापर्यंत पोचायला हात देतील, असा त्यांचा अंदाज आहे. असं चित्र काढून ठेवणाऱ्या माणसांकडे पुरेशी साधनसामग्री होती आणि मुख्य म्हणजे काही एक विशिष्ट विचार होता, हे अगदी प्राथमिक वाटणारं विधान खरंतर संशोधकांसाठी भूतकाळ नावाच्या रहस्यांनी भरलेल्या गुहेचं दार किलकिलं करत असतं.

ही गुहाचित्रं, कातळशिल्पं माणसाचा प्रवास अगदी सहजपणे समोर ठेवत जातात. आपल्याला आता सुपरिचित असणाऱ्या भीमबेटकाच्या गुहाचित्रांपासून ते अजिंठा, बदामीमधली गुहाचित्रे किंवा वेरूळ, घारापुरी मधली भव्य शिल्पं नजरेसमोर आणली तरी केवळ कलेचाच नव्हे तर त्या त्या काळातल्या जगण्याचा, ज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा प्रवास, आवाका उलगडत जातो आणि शोधणाऱ्याची मुळांकडे जाण्याची, त्या त्या काळातल्या धार्मिक, सामाजिक जाणिवा, कल्पना, परंपरा, कथा, दंतकथा, वस्त्रप्रावरणं, खाद्यसंस्कृती अशा असंख्य बाबींचा आणि त्यांच्या आताच्या जगण्याशी जुळलेल्या धाग्यांचा धांडोळा घेण्याची आस वाढवत रहातो. 

सुलावेसीच्या निमित्ताने आठवली ती कोकणातल्या जांभ्या दगडांच्या सड्यांवरची कातळशिल्पे. आधुनिक काळातल्या माणसांसाठी अजूनही एक गूढ, आव्हान असणारी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मिळून साठ-बासष्ट गावांमध्ये आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त कातळशिल्पांची नोंद स्थानिक अभ्यासकांकडे आहे. सह्याद्रीच्या सड्यांवर जमिनीलगत कोरलेल्या ह्या कातळशिल्पांशी अजूनही फारसा संवाद झालेला नाहीये. जे दिसतं त्यापेक्षा जे दिसत नाही, माहिती नाही ते अधिक गहिरं असतं याची प्रचिती ही भव्य आकाराची कातळशिल्प ठायी ठायी देत असतात, असा अभ्यासकांचा अनुभव आहे. वानगीदाखल सांगायचं तर ह्या शिल्पकृतींचे निर्माते कोण आणि त्यांनी ही शिल्पे का घडवली हे देखील अजून नीटसे उमगलेले नाही.

अभ्यासकांच्या मते ही शिल्पे वीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. या गूढ कातळशिल्पांचा अभ्यास कोकणाच्या इतिहासावर आणखी प्रकाश टाकू शकेल आणि कोकण-पर्यटनाला एक वेगळा पैलू जोडू शकेल याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही. पण त्यासाठी त्यांचा पद्धतशीर अभ्यास होणे गरजेचे आहे. ही कातळशिल्पे महत्त्वाची आहेत हे पटलेली कोकणातली काही मंडळी आणि त्या त्या ठिकाणचे ग्रामस्थ गेल्या चार-पाच वर्षांपासून जवळपास वैयक्तिक पातळीवर शिल्पांच्या जतनासाठी प्रयत्न करत आहेत, या प्रयत्नांना काही ठिकाणी यशही येतं आहे. काही ख्यातनाम संशोधन संस्थांमधले संशोधक या शिल्पांचा वेगवेगळ्या शास्त्रांच्या अनुषंगाने अभ्यास करत आहेत. अर्थातच त्यांच्या समोरची आव्हाने आणि प्रश्न विविधांगी आहेत, हे 

खरे असले तरी हे गूढही आपल्याला काळाच्या उदरात गुप्त झालेल्या आपल्याच कुठल्यातरी मुळापर्यंत नेईल, हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या