द जन्टलमन’स् गेम

-
रविवार, 31 जानेवारी 2021

संपादकीय

यश मिळवणं कदाचित सोपं ठरेल इतकं मिळवलेलं यश पचवणं अवघड असतं. शोधली तर अगदी आपल्या आजूबाजूलाही अशी अनेक उदाहरणं सापडतील. काही माणसांना पिवळं व्हायला अर्धं हळकुंडही लागत नाही, आणि काहींना हळदीच्या पेवात टाकलं तरी त्यांच्या अंगा-मनावर हळद चढलेली दिसत नाही.

'गॅबा'च्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघावर शानदार विजय मिळवल्यानंतर क्रिकेटप्रेमी भारतीय मन सुखावून जाणे स्वाभाविकच. हा विजय अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहेच. पहिल्या कसोटीत सर्वबाद ३६ ही भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात नीचांकी धावसंख्या ते चौथ्या कसोटीत तीनशेवर धावांचे आव्हान पार करत तीन गडी राखून मालिकेवर विजयाचे शिक्कामोर्तब, या प्रवासात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची विजिगिषु वृत्ती, संघभावना, चिकाटी क्रिकेट विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. भारतीय क्रिकेटची मान अभिमानाने उंचावेल असे अनेक कंगोरे या विजयाला आहेत. ब्रिस्बेनच्या मैदानावरची ऑस्ट्रेलियाची सलग तीन दशकांपेक्षा जास्त काळाची विजय मिळवण्याची परंपरा भारतीय संघाने खंडित केलीच पण या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघातल्या अनेक दिग्गजांच्या अनुपस्थितीत तुलनेने नवख्या खेळाडूंनी हा विजय अक्षरशः खेचून आणला. ज्या परिस्थितीत भारतीय संघाने ही मालिका खेळली ती पाहता कर्णधाराला साजेशी कामगिरी करतानाच संघाचे मनोधैर्य टिकवून सहकाऱ्यांकडून स्मरणीय कामगिरी करून घेणाऱ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेट रसिकांच्या मनात मिळवलेले मानाच्या स्थानाला मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्याही त्याच्या संयत आणि समंजस वागणुकीमुळे जणू झळाळीच मिळाली आहे.

वंशद्वेषी शेरेबाजीनंतर, ‘हवं तर सामना सोडू शकता’, या पंचाच्या सूचनेला नकार देत सामना खेळण्यापासून ते विजयी फेरीच्यावेळी ऋषभ पंतच्या हातात भारताचा तिरंगा सोपवण्यापर्यंत अनेक कृतींमधून अजिंक्यने अगदी सहजपणे आपल्या मनाची प्रगल्भता दाखवली, तेवढीच ती घरी झालेल्या स्वागताच्यावेळीही दाखवली.

विजयी खेळाडूंच्या स्वागताच्या बातम्यांमध्ये घरी परतल्यानंतर कुटुंबीय, आप्तेष्ट आणि चाहत्यांच्या आनंदात सामील होताना कांगारूची प्रतिमा असणारा केक कापण्यास अजिंक्यने नकार दिल्याची बातमी 'सभ्य लोकांच्या खेळातल्या' अजिंक्य रहाणे नावाच्या 'सभ्य माणसाच्या' मनाचा मोठेपणा दाखवून गेली, हार-जीत ही मैदानापुरतीच असते हे पुन्हा एकदा अधोरेखित करून गेली. लेकीला कडेवर घेऊन कुटुंबीय, शेजारी आणि चाहत्यांबरोबर आनंद वाटून घेताना, क्रिकेटच्या पीचसारख्या दिसणाऱ्या केकवर बसवलेल्या कांगारूचा केक कापायला ठाम नम्रपणे नाही म्हणणाऱ्या अजिंक्यचा व्हायरल झालेला व्हिडिओ पहाणाऱ्या नेटकऱ्यांकडून अजिंक्यवर आणखी एकदा कौतुकाचा वर्षाव झाला.

सामना जिंकल्यानंतर सहजपणे होणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाची 'शिकार केली', 'नक्षा उतरवला' अशा राणा भीमदेवी थाटाच्या गर्जना खिलाडूवृत्तीच्या कोणत्याच व्याख्येत बसत नाहीत, हेच अजिंक्यने दाखवून दिले आहे. अजिंक्यच्या खिलाडूवृत्तीचा आणखी एक प्रसंग क्रिकेट चाहत्यांना कदाचित आठवत असेल. अफगाणिस्तानच्या संघाने क्रिकेटच्या इतिहासातली आपली पहिलीवहिली कसोटी खेळली ती अजिंक्यच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध. मार्च २०१८मध्ये बंगळूरमध्ये खेळला गेलेल्या या सामन्यात भारताने एक डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवला होता. विजेत्या संघाचा करंडक घेताना अजिंक्यने पहिलीच कसोटी खेळणाऱ्‍या अफगाणिस्तानच्या संघालाही करंडकाबरोबर छायाचित्र घेण्यासाठी आमंत्रित करून दोन्ही संघांसाठीचा तो ऐतिहासिक क्षण टिपून ठेवला. खिलाडू वृत्ती म्हणजे नेमकं काय, याचा प्रत्ययच या एका कृतीतून अजिंक्यने दिला होता. अजिंक्य रहाणेच्या वाटचालीचा मागोवा घेणाऱ्या क्रीडा क्षेत्रातल्या जाणकारांच्या मते मैदानावरचा अजिंक्य नेहमीच शांत असतो, संयम राखून असतो. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करताना डोंगराएवढे आव्हान समोर उभे ठाकलेले असताना अजिंक्यचा हाच संयम ब्रिस्बेनच्या आणि त्या आधी सिडनी आणि मेलबर्नच्या मैदानावर ठळकपणे दिसला आणि भारतीय संघाने एक अविस्मरणीय कामगिरी साकारली. 'अजिंक्य रहाणे' हेच ज्याच्या भाळी सटवाईने लिहून ठेवले आहे, त्या अजिंक्यला मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्याही अमाप यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

संबंधित बातम्या