यंत्रमानव!

-
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

संपादकीय

त्या  निरुपद्रवी भासणाऱ्या कारच्या आकारात अचानक बदल होऊ लागतात. जिवाच्या कराराने नायिकेला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायकासमोर आता एक अजस्र धूड उभे ठाकलेले असते. काही क्षणांपूर्वीपर्यंत निर्जीव असणाऱ्या कारच्या दरवाजांचे आता जीवघेणे पंजे झालेले असतात आणि त्यांच्या टोकांशी असते विंचवाची नांगी, कोणत्याही बेसावध क्षणी डंख मारायला तयार असणारी. हॉलिवूडच्या गेल्या दशकातल्या कोणत्याही यंत्रमानवी चित्रपटात हमखास दिसणारे हे दृश्य अनेकांच्या परिचयाचे असेल. न्यू यॉर्कच्या रस्त्यांवरून जड जड पावलं टाकत चालणारं ते चित्रपटगृहाचा पडदा व्यापणारं धूड, किंवा नायिकेच्या प्रेमात पडणाऱ्या चिटी सारख्या आवृत्त्यांनी चित्रपट रसिकांना कित्येक दशके खिळवून ठेवले आहे. हे आठवायचं कारण म्हणजे यंदा आणखी एक, जराशी वेगळी, शताब्दी आहे. रोबो किंवा रोबॉट या शब्दाची. 

कॅरेल कॅपेक या नाटककाराने त्याच्या रोसम्स् युनिव्हर्सल रोबोज् किंवा आर.यू.आर या नाटकात हा शब्द पहिल्यांदा वापरला १९२० साली. हे नाटक प्रत्यक्षात रंगमंचावर सादर झालं ते १९२१मध्ये. झेक भाषेतल्या रोबोटा म्हणजे गुलाम किंवा वेठबिगार या शब्दावरून कॅपेकनी त्याच्या नाटकाच्या नायकाने, रोसम नावाच्या शास्त्रज्ञाने, तयार केलेल्या माणसासारख्या दिसणाऱ्या यंत्रांसाठी नाव योजले रोबोट. नाटकाची कथा 'जे न देखे रवी ते देखे कवी' या उक्तीच्या जवळ जाणारी आहे. रोसम रोबोटचा कारखाना उघडून जगभर त्याची मानवसदृष यंत्रे पाठवायला सुरुवात करतो. त्याच दरम्यान आणखी एक शास्त्रज्ञ या रोबोटना आणखी मानवी स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो आणि रोबोटला पहिली मानवी जाणीव मिळते ती वेदनेची. पुढे मग माणसाची गुलामी करण्यासाठी तयार केलेली ती यंत्रे माणसालाच आपल्या कह्यात आणण्याचा प्रयत्न करतात. 

माणसानीच निर्माण केलेली बुद्धिमान यंत्रे माणसावरच मात करतील ही शंभर वर्षांपूर्वी केवळ कल्पनेच्या राज्यात असलेली परिस्थिती शक्यता म्हणून आपल्या समोर उभी राहू शकते असे स्टिफन हॉकिंग यांनी एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीलाच सुचवले होते. आजच्या पिढीसाठी रोजच्या अस्सल कथा वाटणाऱ्या अनेक गोष्टी केवळ एका शतकापूर्वी विज्ञानकथाकारांचे, अभ्यासाची थोडीफार जोड असलेले, कल्पनाविलास होते, हे लक्षात घेतले तर मानवी बुद्धिमत्तेची अचाट झेप पाहून स्तिमित व्हायला होते. ज्यूल्स व्हर्न यांची ‘फ्रॉम दी अर्थ टू दी मून’ ही विज्ञान-काल्पनिका पहा. नील आर्मस्ट्रॉंग यांच्या 'ग्रेट लीप'च्या एक शतक आधी ज्यूल्स व्हर्न यांच्या 'बाल्टीमोर गनक्लब'च्या सदस्यांनी चांद्रवारी नुसतीच आखली नव्हती, तर ती पूर्णही केली होती. आज यंत्रमानवांनी माणसाच्या जगण्यात कितीतरी बदल घडवले आहेत, सौदी अरेबियाने त्यांचे सन्माननीय नागरिकत्व बहाल केलेली(?), ऑड्री हेपबर्नच्या तोंडवळ्याची ‘सोफिया’ ह्युमोनाइड, जपानी ‘पेपर’, अमेरिकी ‘रूमबा रोबोट’ आणि ‘बोस्टोन डायनॅमिक्स रोबोट’, चिनी बनावटीचा ‘लिंक’ असे कितीतरी यंत्रमानव आज माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नुसतीच मदत करत आहेत असे नाही, तर काही क्षेत्रात माणसाच्या असण्याची गरजही त्यांनी संपवली आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसह ते संरक्षण क्षेत्रातल्या अवघड कामगिऱ्यांपर्यंत अनेक गोष्टी माणसाने आज या यंत्रमानवांवर सोपवली आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेले यंत्रमानव माणसावर मात करतील, अशी भीती प्रा. हॉकिंग यांच्याप्रमाणेच स्पेस-एक्स रॉकेटचा निर्माता अॅलन मस्क यांच्यासह आणखीही काही जणांना वाटते. अनुभवातून शिकत जाणाऱ्या क्लेव्हरबोट सॉफ्टवेअरचे निर्माते रोलो कार्पेन्टर ही भीती थोडी कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते माणूस आणखी बराच काळ तंत्रज्ञानाला कह्यात ठेवू शकेल. 

प्रत्येक नवा बदल संपूर्ण मानव जातीसमोर आव्हाने उभी करत असतो, तशी दिवसागणिक प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानानेही उभी केली आहेत. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत, काहींची उत्तरे वैज्ञानिक शोधत आहेत. वैज्ञानिकांच्या मते मानवी प्रतिभा, मानवी तर्क, माणसामधल्या नैसर्गिक सहजप्रेरणा आणि स्वत्वाची जाणीव माणसाला तारून नेईल. यंत्रांकडे नसलेल्या या भावना माणूस स्वतःसाठी किती सजगपणे वापरतो, एवढाच मुद्दा आहे.

संबंधित बातम्या