कुठं गेली थंडी?

-
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

संपादकीय

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये नंदादेवी हिमनदीचा एक भाग धौलीगंगा नदीत कोसळून आलेला पूर आणि त्यापायी वाहून गेलेले शेकडोजण, यामागची कारणं शोधताना, या घटनेचं विश्‍लेषण करताना आता पुन्हा जागतिक तापमानवाढ, हवामान बदल यावर चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या तापमानामुळं हिम वितळून कडा नदीत कोसळला असावा, अशा शक्यता अभ्यासकांकडून वर्तवल्या जात आहेत. हे नेमकं कशामुळे घडलं याची यथावकाश चौकशी होईलच. पण बदलेलं हवामान केवळ मोठ-मोठ्या घटनांपुरतं मर्यादित न राहता आता आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपलं आहे, एवढ मात्र खरं!

मुद्दा आहे तो हवामानबदलाचा. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्याकडे थंडीला सुरुवात झाली खरी, पण काही दिवसांतच मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन ढगाळ हवामानामुळं थंडी पळाली. त्याचा परिणाम म्हणजे, गेल्या ४१ वर्षांतला उबदार जानेवारी पुण्यानं अनुभवला. आता पुन्हा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये थंडी पडली आहे. पण त्या थंडीलाही शिशिराच्या थंडीचा ‘फील’ नाहीच. आकाशसुद्धा आत्ता कुठं सलग खूप दिवस निरभ्र राहिलं आहे... नाहीतर कधी ढग दाटून येतील काय सांगावं? हे असं सतत होत राहिलं की मग वाटू लागतं, अरे काय चाललंय या हवामानाचं? 

गेली एक-दोन वर्षं हे असंच वातावरण अनुभवायला मिळतं आहे. पावसाळा लांबतो... एकदाची थंडी सुरू होते, पण पुन्हा कुठंतरी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि हवा उबदार होते. थंडी पडली म्हणे-म्हणेपर्यंत थंडी पुन्हा गायब झालेली असते आणि रात्रीच्या शांत झोपेची मदार पुन्हा पंखे, एसी आणि कूलरवरच ठेवावी लागते. 

या सगळ्याला कारणीभूत आहे हवामानाचं बिघडलेलं गणित आणि वाढत चाललेलं तापमान! २०२० हे वर्ष कोरोनामुळे खरंतर लॉकडाउनमध्येच गेलं; फक्त भारतातच नाही, तर जगात सगळीकडेच व्यवहार, उद्योग बंद होते, तरीही २०२०ची सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली आहे. आत्तापर्यंत २०१६ हे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलं आहे आणि २०१६च्या सर्वोच्च तापमानाबरोबर २०२०नं बरोबरी साधली आहे. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. २०१६मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होण्यामागचं कारण होतं एल निनो हा घटक. एल निनोमुळे तापमानामध्ये लक्षणीय वाढ होते. त्याउलट तापमान कमी करणारा ला निना २०२०मध्ये कार्यरत होता आणि तरीही २०२०मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय तापमान मोजणाऱ्या प्रमुख संस्थांच्या नोंदींमध्ये मोजण्याच्या पद्धतींमधल्या फरकामुळे थोडीबहुत तफावत आढळते. अमेरिकेच्या नासा संस्थेच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडिज संस्थेनं हे वर्ष २०१६ची बरोबरी करतं, असं म्हटलं आहे. तर, अमेरिकेच्याच नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉसफेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (नोआ) संस्थेच्या नोंदींनुसार २०२० अगदी किंचित फरकानं दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक हवामान संस्थेच्या नोंदींनुसारदेखील, २०२० सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलं आहे. 

ऑस्ट्रेलियामध्ये २०१९च्या शेवटाला सुरू झालेले बुश फायर २०२०मध्येही कायम होते. या जीवघेण्या आगीमध्ये सुमारे चार कोटी एकर क्षेत्र भस्मसात झालं होतं. नासाच्या म्हणण्यानुसार, आगीमुळं निर्माण झालेल्या धुरानं आणि धुलीकणांनी खूप उंचीपर्यंत आसमंत व्यापला आणि सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोचू शकली नाहीत. त्यामुळं तापमान काहीसं कमी झालं. तर, दुसरीकडे लॉकडाउनमुळं जगात खूप ठिकाणी कणीय प्रदूषण एकदम कमी झालं. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त सूर्यकिरणं जमिनीपर्यंत पोचली आणि तापमान वाढलं. तसंच कार्बन वायूचं उत्सर्जन कमी झालं खरं, पण मानवानं आधीच हवेत एवढा कार्बन सोडून ठेवला आहे, की यानं फारसा काही फरक पडला नाही. 

भारतापुरतं पाहायचं झालं, तर भारतामध्ये नोंदवलेलं तापमान सरासरीपेक्षा ०.२९ अंश सेल्सिअसनं जास्त होतं, पण भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २०२० हे आठवं उच्च तापमानाचं वर्ष होतं. २०१६मध्ये भारतातसुद्धा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. तेव्हा तापमान सरासरीपेक्षा ०.७१ अंश सेल्सिअसनं जास्त होतं. 

ही तापमानवाढ मानवनिर्मित हरित वायूंमुळेच होत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सरासरी तापमान १.२ अंशांनी वाढलं आहे. या वाढीमुळं हवामानाच्या तीव्र घटनांमध्येही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, वाढती चक्रीवादळं हे सगळं याचंच द्योतक आहे. बर्फ वितळणं, समुद्रपातळी वाढणं यांसारख्या, म्हटल्या तर दीर्घकालीन, पण वेगानं घडणाऱ्या घटना माणसापुढे नवीन आव्हानं घेऊन येणार आहेत!

संबंधित बातम्या