बर्फातलं भूत

-
सोमवार, 15 मार्च 2021

संपादकीय

हवामान बदलामुळे निसर्गावर आणि पर्यायाने माणसावर होणाऱ्या वेगवेगळ्या परिणामांचे वेगवेगळे पैलू सातत्याने समोर येत आहेत. निसर्गावर होत असलेले परिणाम आणि त्यामुळे घडलेले बदल दृग्गोचर होतात तो पर्यंत बऱ्याचदा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते, उशीर झालेला असतो.  मग त्या बदलांशी जुळवून घेत आणखी नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे एवढेच माणसाच्या हातात उरते. त्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना कधी थोडेफार यश येते, पण मधल्या काळात झालेली हानी मात्र भरून न येणारी असते. अलीकडच्या काळात हिमालयाच्या बर्फाळ रांगांमध्ये अशीच एक घटना घडते आहे. 

अजूनही वन्यप्राण्यांच्या विश्वातलं एक गूढ अशीच ख्याती असणारे हिम बिबटे, स्नो लेपर्ड (Panthera uncia), त्यांचे नैसर्गिक अधिवास सोडून कमी उंचीच्या प्रदेशांमध्ये दिसू लागले आहेत, खाली उतरू लागले आहेत.

''बर्फातले भूत'' अशी ख्याती असणाऱ्या हिम बिबट्यांना ''आययूसीएन''ने तीनएक वर्षांपूर्वी  ''विनाशाच्या उंबठ्यावर'' असणाऱ्या प्रजातींच्या यादीतून काढून ''असुरक्षित'' असलेल्या प्रजातींच्या यादीत समाविष्ट केले होते, मात्र त्याहीवेळी ''आययूसीएन''ने पुढच्या तीन पिढ्यांमध्ये हिम बिबट्यांची संख्या घटू शकते असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आक्रसणारा नैसर्गिक अधिवास आणि नैसर्गिक अधिवासातल्या त्यांच्या घटत्या संख्येबद्दल निसर्ग अभ्यासक, प्राणिशास्त्रज्ञ चिंता व्यक्त करीत असतानाच आता हा नवा प्रश्न उभा ठाकतो आहे.

सपाटीवरच्या बिबट्यांपेक्षा (Panthera pardus) आकाराने थोडा लहान असणाऱ्या या प्राण्याला निसर्गाने बर्फाच्छादित पर्वत रांगांमध्ये राहाण्याकरता आवश्यक ती सर्व कवचकुंडले बहाल केली असली तरी त्याच्या इतर भाईबंदांप्रमाणेच हिम बिबट्याही त्याच्या धुरकट राखाडी केसाळ कातडीपायीच शिकाऱ्यांचे लक्ष्य होत असतो. माणसाखेरीज दुसरा शत्रू नसणाऱ्या बृहत् मार्जार कुळातल्या या 'सर्वात दुर्मिळ आणि सर्वात देखण्या' प्राण्यासमोर शिकारी बरोबरचआता संकट आहे आक्रसत जाणाऱ्या अधिवासाचे. आणि त्याला वातावरणातले बदल कारणीभूत असल्याचे अभ्यासक सांगतात. 

समुद्रसपाटीपासून बारा ते तेरा हजार फुटांवर (३६६० ते ३९६५ मीटर - या उंचीवर हवामान विरळ होत जातं, माणसाच्या शरीरातली पाण्याची पातळी कमी होऊ लागते, असं अनुभवी गिर्यारोहक सांगतात.) वास्तव्य करणाऱ्या हिम बिबट्यांच्या नैसर्गिक सवयींबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे, असा उल्लेख एस.एच. प्रेटर यांच्या ''बुक ऑफ इंडियन अॅनिमल्स''मध्ये आढळतो. अमेरिकी नॅचरॅलिस्ट आणि एक्स्प्लोरर पीटर मॅथिसन आणि प्रख्यात प्राणिशास्त्रज्ञ जॉर्ज शेल्लर यांनी सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला हिम बिबट्याच्या शोधात हिमालयात दीर्घ भटकंती केली होती. दर्शन-दुर्लभ असणाऱ्या हिम बिबट्याचा शोध आणि झेन तत्त्वज्ञानात उल्लेखलेल्या आंतरिक शांतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न यांचा मेळ घालणारे मॅथिसन यांच्या ''द स्नो लेपर्ड'' ह्या पुस्तकानेही साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवले होते.

मुद्दा आहे तो हिम बिबट्यांच्या हिवाळी स्थलांतरातील नव्याने दिसणाऱ्या बदलांचा. हिवाळ्याच्या सुरुवातीला भक्ष्याच्या शोधात खाली उतरणाऱ्या हिम बिबट्यांचा वावर गेल्या काही वर्षांपासून नेहमीपेक्षा कमी उंचीवर दिसून आला आहे. हिमालयात झालेल्या प्रचंड हिमवर्षावानंतर गंगोत्रीच्या वाटेवरील हर्सिल गावाजवळ हिम बिबट्या दिसल्याच्या नोंदींबरोबरच सिक्कीम मधील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एकाच कॅमेरा ट्रॅपमध्ये हिम बिबट्या आणि सपाटीवरच्या प्रदेशातला बिबट्या कैद झाल्याचे आढळले होते. काही महिन्यांपूर्वी स्पिती व्हॅलीमध्ये काही पर्यटकांनी हिम बिबट्या पाहिला होता.

तज्ज्ञांच्या मते नैसर्गिक अधिवासातून इतकं खाली उतरल्याने हिम बिबट्यांना भक्ष्य मिळवण्यासाठी सपाटीवरच्या बिबट्यांबरोबर संघर्ष करावा लागेल. शिकारीचा धोका आणखी वाढेल. एका बाजूला शिकार आणि आक्रसणाऱ्या नैसर्गिक अधिवासामुळे उभ्या राहिलेल्या विपरीत परिस्थितीशी सामना करणाऱ्या हिम बिबट्यांसाठी हा अस्तित्वाचा आणखी एक नवा संघर्ष असेल.

संबंधित बातम्या