प्लवनाम संवत्सरे...

-
सोमवार, 12 एप्रिल 2021

संपादकीय

ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील एक ओवी आहे. "सांगे प्लवेंचि काय बुडिजे। कां मार्गीं जातां आडळिजे।", असा त्या ओवीचा पूर्वार्ध आहे.

कुरूक्षेत्रावर पसरलेल्या कौरव आणि पांडवांच्या सेनासागराच्या मधोमध रथ उभा केल्यानंतर दोन्ही बाजूंना आपलेच आप्तस्वकीय उभे असलेले पाहून उद्विग्न झालेल्या आणि धनुष्याचा त्याग करून बसलेल्या अर्जुनाला त्याच्या क्षत्रियधर्माने सांगितलेल्या कर्तव्याची जाणीव करून देताना श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात संत ज्ञानेश्वर ‘प्लव’ म्हणजे नावेचा दृष्टांत देताना म्हणतात, ‘‘नावेत बसणारा कधी बुडेल का? चांगल्या रस्त्याने जाणारा कधी ठेच लागून पडेल का?’’ भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तुमच्या कर्तव्यांचा मार्ग योग्य तुम्ही सोडला नाहीत तर तुम्ही कशातूनही तरून जाल. ‘‘परी विपायें चालो नेणिजे | तरी तेंही घडे ॥’’ असा त्या ओवीचा उत्तरार्ध आहे. चांगल्या वाटेने जाताना ठेच लागणार नाही, हे खरे़; पण चालताच येत नसेल तर तसेही घडेल! 

''प्लव''. संस्कृतातल्या ''प्लु'' या तरंगणे अशा अर्थाने वापरल्या जाणाऱ्या धातूपासून बनलेल्या या शब्दाचा अर्थ तराफा किंवा होडी. ऋग्वेदामध्ये वादळात टिकू शकणारी व मजबूत अशा ‘प्लव’ नावाच्या नौकेचे वर्णन आहे, असा उल्लेख विश्वकोशाच्या आठव्या खंडात सापडतो. महाभारताच्या शल्यपर्वातल्या गदापर्वावर आधारलेल्या महाकवी भासाच्या ''उरुभंगम्'' नाटकाच्या सूत्रधाराने साक्षात श्रीकृष्णालाच प्लव म्हणजे नावेची उपमा दिली आहे. ‘कृष्णरूपी नावेमुळे अर्जुनाला जसा विजय मिळाला तसा तुम्हालाही मिळो’, अशी प्रार्थना महाकवी भास सूत्रधाराच्या तोंडून करतात.

हतबल झाल्याच्या भावनेने लपेटलेल्या जात्या वर्षानंतर, गुढीपाडव्यापासून सुरू होणारे ''प्लव'' नावाचे संवत्सर जणू पलीकडच्या किनाऱ्यावर सुखरूप नेणाऱ्या नावेचा दृष्टांत घेऊन येत आहे. शालिवाहन शकाच्या कालगणनेत प्रभव ते अक्षय अशा साठ संवत्सरांच्या चक्राच्या तिसऱ्या चरणाच्या अखेरीचे हे संवत्सर. दाक्षिणात्य परंपरांमधील पंचांगकर्त्यांच्या मते या येणाऱ्या संवत्सराचा अर्थ आहे, ज्ञान आणि बुद्धी. ‘जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेती, भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती...’ अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता आपल्या ज्ञानाचा आणि बुद्धीचा वापर करून एक नौका बांधावी लागणार आहे. पुराणांमधल्या मत्स्यावताराच्या कथेतल्यासारखी किंवा बायबलमधल्या नोहाचा आर्कसारखी. सगळ्या पृथ्वीवासियांना गिळून टाकणाऱ्या प्रलयकाळातून माणसासह प्राणी, पक्षी, झाडे वाचवून जगरहाटीची पुन्हा सुरूवात करणारी.

चाकाचा शोध लागला आणि माणसाच्या पायाला गती आली असे मानले जाते, पण पाण्यावर तरंगणारे तराफे हा माणसाने चाकाच्याही आधी वापरलेला वाहनप्रकार. जगातील पहिली नौका कोणी व कधी तयार केली हे समजण्यास काहीच मार्ग नाही, असं विश्वकोशाच्या आठव्या खंडातली नोंद सांगते. अन्य एका नोंदीनुसार पहिल्या ज्ञात नावेचे वय ख्रिस्तपूर्व आठ हजार वर्षे इतके मागे जाते. नौकांचा पूर्वेतिहास उपलब्ध नसल्याने दूरदूरच्या व एकमेकांशी काहीही संबंध न आलेल्या लोकांत नौकांविषयी जवळजवळ सारख्याच कल्पना कशा उद्‌भवल्या हे एक विलक्षण कोडेच आहे, असाही उल्लेख वाचायला मिळतो. पहिली नाव कोणी बांधली, जगाच्या वेगवेगळ्या भागांमधल्या लोकांना पाण्यावर तरंगून नद्या ओलांडायला उपयोगी पडणाऱ्या तराफ्यांची, नौकांची कल्पना कशी सुचली वगैरे प्रश्नांची उत्तरे आपण कधीतरी शोधूच पण ''किनारा तुला पामराला...'' असे अथांग असण्याची प्रौढी मिरवणाऱ्या समुद्राला ठणकावून सांगण्याऱ्या माणसाच्या विजिगिषूवृत्तीला बळ देणाऱ्या; आपल्या वाटा अडविणाऱ्या, सहनशक्तीची परीक्षा पहाणाऱ्या लाटांचे तडाखे अंगावर घेणाऱ्या नौका आता नव्याने बांधण्याची वेळ आली आहे. उद्याच्या गुढीपाडव्यापासून उगवणारे प्लवनाम संवत्सर अवघ्या मानवजातीला पुन्हा एक नौका नव्याने बांधण्याची उमेद देईल, आणि ही नव्या उमेदीची नाव आपल्याला सर्वांना या कठीण काळातून सुखरूप पार नेईल, अशीच आशा आहे. 

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि प्लवनाम संवत्सराच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

संबंधित बातम्या