इदं न मम...

-
सोमवार, 3 मे 2021

संपादकीय

दिवस असे आहेत ना की कुठलंही संकट टळल्याची बातमी वाचण्यात-ऐकण्यात आली की हायसं वाटतं. संकट कोणावरचेही असो, कशाचेही असो. जवळचे असो की लांबचे. दिसणारे असो की अदृश्य -नाहीतरी आत्ता आपल्याला घेरून उरलेले संकट तरी किती लोकांनी ‘पाहिलंय’, दिसताहेत ते फक्त त्याचे परिणाम!

अगदी काहीच दिवसांपूर्वी टळलेलं हे जे संकट आहे, तेसुद्धा असंच सगळ्या जगाच्याच गळ्याला नख लावणारं ठरू शकणार होतं, अवघ्या पृथ्वीला त्यानं वेठीला धरलं असतं. पण आता पुढच्या किमान शंभर वर्षांसाठी तरी हा धोका टळलाय. भीती पूर्णपणे ओसरलीय असं नाही, पण पुढची शंभर वर्षे तरी आपल्याला त्यापासून धोका नाही. आणि त्या नंतर? माहीत नाही!

खगोलशास्त्रज्ञांनी या संकटाला नाव दिलंय ‘अॅपोफिस’. साधारण ३४० मीटर म्हणजे साहेबाच्या देशातल्या तीन फुटबॉल ग्राउंडांइतक्या लांबीचा लघुग्रह. काही दिवसांपूर्वी हे संकट आपल्यापासून सतरा दशलक्ष किलोमीटर अंतरावरून निघून गेलं. ग्रीक पुराणकथांनुसार ‘अॅपोफिस’ हा सूर्याचा, प्रकाशाचा शत्रू अर्थात अंधार आणि अनागोंदीचा देव.

अमेरिकेतल्या किट पिक नॅशनल ऑब्झर्व्हेटरीमधून अथांग अवकाशाची निरीक्षणे घेणाऱ्या रॉय टकर, डेव्हिड थोलन आणि फॅब्रिझिओ बर्नार्डी या निरीक्षकांना त्याचं अस्तित्व जाणवलं सतरा वर्षांपूर्वी. खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने ‘अॅपोफिस’ पृथ्वीवासीयांसाठी सगळ्यात धोकादायक असणाऱ्या लघुग्रहांपैकी एक आहे. 

प्रकाशाला गिळू पाहणाऱ्या ‘अॅपोफिस’च्या सूर्यभ्रमणाच्या कक्षेचा अभ्यास झाल्यानंतर तो पहिल्यांदा २०२९मध्ये, मग २०३६मध्ये आणि त्यानंतर २०६८मध्ये धोकादायकरीत्या पृथ्वीच्या जवळ येईल असं भाकीत शास्त्रज्ञांनी केलं होतं. मात्र या तिन्ही वेळी तो आपल्या जवळ आला तरी त्यामुळे काही धोका होण्याच्या शक्यता आता दुरावल्या आहेत, असं ‘नासा’साठी लघुग्रहांचा अभ्यास करणारे डेव्हिड फर्नोची यांनी म्हटलं आहे. अर्थात ‘अॅपोफिस’चा धोका तात्पुरता टळलाय म्हणून वैज्ञानिकांनी त्याचा पिच्छा सोडलेला नाही; त्यांना आता प्रतीक्षा आहे १३ एप्रिल २०२९ या दिवसाची. त्या दिवशी ‘अॅपोफिस’ पृथ्वीपासून फक्त बत्तीस हजार किलोमीटरवर म्हणजे चंद्र आपल्यापासून जेवढा लांब आहे त्याच्या फक्त एक दशांश एवढ्या अंतरावर असण्याची शक्यता आहे. त्या दिवशी ‘अॅपोफिस’ची आणखी निरीक्षणे घेता येणार आहेत.

अशनीपात माणसाला नवीन नाही. आपल्याकडचे लोणार सरोवर अशाच एका प्रचंड मोठ्या उल्कापातामुळे निर्माण झाले असावे, असे वैज्ञानिकांना वाटते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर नांदणाऱ्या  सजीवांच्या संहारालाही असाच एखादा अशनीपात कारणीभूत असावा असे मानले जाते.

‘अॅपोफिस’चा बाऊ वाटायला नको हे तर खरंच! पण जगभर थैमान घालणाऱ्या न दिसणाऱ्या एका विषाणूच्या असंख्य अवतारांसारखीच ‘अॅपोफिस’नी पण सर्वसाधारण डोळ्यांना न दिसणाऱ्या संकटाची आणखी एक चुणूक दाखवून दिली आहे; कधीकाळी चाकापासून सुरू झालेला तंत्रविज्ञानाचा प्रवास आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वळणावरून पुढे जात असताना माणसाला त्याच्या भविष्याबद्दल सतत जागरूक ठेवणारी. 

ही संकटं एका अर्थाने, पृथ्वी आपल्यासाठी आहे; ती असेल तर आपण असणार आहोत या वास्तवाला समस्त मानवजातीला सामोरं नेणारी आहेत. माणूस या प्रत्येक संकटावर मात करेलच. पण त्याबरोबर आणखीही एक लक्षात ठेवायला हवं, माणसांची प्रत्येक पिढी पृथ्वीच्या फक्त विश्वस्तांच्या भूमिकेतच होती, आहे, असणार आहे; मालकाच्या नव्हे. मागच्या पिढीने ही पृथ्वी या पिढीच्या हातात दिलीय ती पुढच्या पिढीच्या हातात सोपवण्यासाठी, तो पर्यंत आपल्याला 

पृथ्वी जपायची आहे, ‘इदं न मम’ या भावनेने...

संबंधित बातम्या