न्यू नॉर्मलची नवलाई 

-
सोमवार, 21 जून 2021

संपादकीय

कोरोना नावाच्या न दिसणाऱ्या विषाणूचे थैमान ओसरायची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या पंधरा -सोळा महिन्यात तिळभर पुढे आणि गहूभर मागे अशा गतीनं चालणाऱ्या अर्थचक्रांना वेग येतोय. दुकानं उघडली आहेत. रस्त्यांवरचे सिग्नल पुन्हा सुरू झाले आहेत आणि त्यांच्या बरोबर वाहतूक ‘मुरंबे’, धूर, धूळ आणि यासगळ्यां बरोबर कोरोना नसताना आपली साथ करणारं बरंच काही. पंधरा- सोळा महिन्यांपूर्वी ज्याच्या त्याच्या तोंडी असणाऱ्या ‘न्यू नॉर्मल’कडून आपण पुन्हा ‘नॉर्मल’कडे चाललो आहेत असं वाटण्याचा हा काळ आहे.

कोरोना काळानी आपल्याला खूप बदलवलं, हे सत्य मान्य करताना माणसातल्या बदलांचे कंगोरे या सगळ्या काळात पुढे येत पाहिले; काही अपेक्षित, काही अनपेक्षित, काही बोचणारेही!

खूप काही बदललं. भवताल बदलला. कालपर्यंत जे काही, जसं करत होतो ते करणं बदललं. ऑफिसचा कोपरा घरात आला. घराबाहेर जाण्यावर; लोकांना, सहकाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना भेटण्यावर मर्यादा आल्या. अनेक आयुष्य थबकली, थिजली. पहिल्या पाच-सहा महिन्यांत घराच्या चौकटीत पूर्णपणे अडकून पडलेले असताना अनेकांना ‘जीवनावश्यक’ या शब्दाचा अर्थ नव्याने गवसला. अनेकांनी नाती पुन्हा बांधली, आणि काहींना त्याच त्याच नात्यांचा तिटकारा आला. काही थोड्यांनी असहाय्य होऊन हार मानली, पण त्याहून कितीतरी अधिक जणांनी कंबर कसली, नव्या वाटा शोधल्या. तंत्रज्ञानाशी मैत्री केली. कोणत्याही संकटात स्वतःबरोबर इतरांना सावरणारे असंख्य हात पुढे आले, त्यांनी असंख्य मनांना आशेची उभारी दिली. संकटातही इतरांना नाडण्याचाच गोरख धंदा करणारेही होतेच.

या साऱ्या घुसळणीतून जगण्याशी थेट संबंध असणाऱ्या अनेक बाबी निमित्तानिमित्ताने लक्षात येत आहेत. आणखी काही जाणवताहेत; पण अजून उमगायच्या आहे. जगभर आता यावर सर्वेक्षणं, अभ्यास, चर्चा सुरू आहेत.

आर्थिक, सामाजिक जगण्यावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांबरोबरच माणसांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करणारे अनेक मुद्दे आता सामोरे येत आहेत. ‘न्यू नॉर्मल’सह जगणं हेच ‘नॉर्मल’ होण्याच्या प्रक्रियेत या मुद्द्यांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक ठरतं आहे.

यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे मानवी नातेसंबंधांचा. एका बाजूला नात्यांना ग्रासणारा ओव्हरएक्स्पोजर आणि दुसरीकडे निखळलेल्या दुव्यांचा अथांग एकटेपणा. बऱ्याचजणांना ‘तुझ्याबिगर करमेना...’चा राग संपून ‘रे तुझ्यावाचून काही, येथले अडणार नाही...’ कधी सुरू झाले, ते समजलेच नाही. नात्यांतल्या कलहांतून येणाऱ्या एकटेपणानी सहवासाचे मूल्य पुन्हा अधोरेखित केले.

पुढे जाताना यातल्या दोन घटकांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज नव्याने पुढे येते आहे. एक आहे, जगणं अनुभवलेले ज्येष्ठ आणि दुसरा घटक आहे, जगण्याच्या वाटेवर पावलं टाकायला सुरुवात करणारी आणि व्यवहारी जगाच्या उंबऱ्यावर उभी असणारी मुलं-मुली.

काल परवा ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन’ होता. या निमित्ताने ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेने एका ताज्या अहवालात ज्येष्ठांना छळणारे एकटेपण पुन्हा एकदा नव्याने स्पष्ट केले आहे. एका बाजूला मुलांकडून, सुनांकडून होणाऱ्या छळात वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवतानाच आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात घालवणाऱ्या अनेक ज्येष्ठांसारखीच, जगाच्या दृष्टीने मुलाबाळांमध्ये राहणाऱ्या अनेकांनाही कोणीतरी वेळ देण्याची, संवादाची आस आहे. नोकऱ्या गेल्याने, व्यवसाय ठप्प झाल्याने उत्पन्न घटले आणि अनेक ज्येष्ठांचे आर्थिक परावलंबित्व वाढले आहे, असेही निरीक्षण हा अहवाल नोंदवतो.

दुसऱ्या बाजूला आहेत शाळा बंद असल्याने घरात कोंडली गेलेली मुलं. कोरोनाच्या शारीरिक परिणामांइतकेच त्याचे मानसिक परिणाम गंभीर असू शकतात, याविषयी दुमत नसावे. समुपदेशन करणाऱ्या वेगवेगळ्या हेल्पलाइनवर येणाऱ्या फोनकॉलची संख्या पाहिली तरी ही गरज समजू शकेल. विद्यापीठ अनुदान आयोगानी तरुण मुलांच्या भावनिक कौशल्य विकासासाठी एक अभ्यासक्रम विकसित करून याविषयी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. मुलं काय, त्यांच आजीआजोबा काय किंवा आई-वडील काय, एकूटवाणेपणाच्या विळख्यात सापडणं कोणालाच परवडणार नाहीये.

म्हणूनच ‘न्यू नॉर्मल’ आता ‘नॉर्मल’ होत असताना नात्यांच्या ह्या सगळ्या भावनिक पुलांची पुन्हा नव्याने डागडुजी करायला हवी.

संबंधित बातम्या