आपत्ती व्यवस्थापनाचे व्यवस्थापन

-
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

संपादकीय

प्रत्येक आपत्तीतून काहीतरी शिकता येतं असं म्हणतात. सांगली–कोल्हापूरसह अवघ्या महाड-चिपळूण पट्ट्याला आणखी एकदा उद्धस्त करणाऱ्या महापूर आणि भूस्खलनांनी जो हाहाकार माजविला आहे त्यातून मिळणारा धडा, किंबहुना धडे स्पष्ट आहेत. शब्दांचा फाफटपसारा टाळून बोलायचं तर दोन मुद्दे स्पष्टपणे सांगता येतात, एक आहे तो भूतकाळापासून शिकण्याचा. आपत्तीतून आपण फार काही शिकत नाही ही बाब या महापुरानी, कोसळलेल्या दरडींनी आणखी एकदा स्पष्ट केली आहे. दुसरा मुद्दा आहे तो आपत्ती व्यवस्थापनाचाच. आपत्ती व्यवस्थापनाच्या एकंदरच व्यवस्थापनाकडे आपण बदलत्या काळाच्या संदर्भात पुन्हा पाहणार आहोत की नाही, असाही प्रश्न या महापुरानी आणि भूस्खलनांनी उभा केला आहे.

गेल्या आठवड्यापासून मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात थैमान घालणाऱ्या पावसाने नऊ-दहा जिल्ह्यांमध्ये मिळून तीनशेपेक्षा जास्त बळी घेतले आहेत, पशुधनाचे मोठे नुकसान केले आहे. अडीच लाखांहून अधिक लोकांना तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये हलवलेलं आहे. महाड जवळच्या तळयेसारख्या काही गावांचा आक्रोशही दरडींखाली दबून गेला आहे. कोरोनाच्या महासाथीतून सावरण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या सगळ्या भागातले लोक आणखी एकदा  मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अशा तिन्ही पातळ्यांवर नुकसान करणाऱ्या आपत्तीचा सामना करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून जगाच्याच वेगवेगळ्या भागांमध्ये कमी वेळात प्रचंड पाऊस पडण्याच्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसते आहे. तापमानवाढीमुळे सृष्टीचक्रावर होत असलेल्या परिणामांचा तो केवळ एक भाग आहे, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. आकाश फाटल्यासारखा कोसळणारा हा पाऊस अवघं जनजीवन विस्कटून टाकतो; डोळ्यासमोर होत्याचं नव्हतं करून टाकतो, असा सगळ्या जगाचा अनुभव आहे. केवळ आजचाच नव्हे तर गेल्या दशकभराहून अधिक काळचा.

मात्र आताच्या या परिस्थितीचे खापर केवळ हवामानातल्या बदलांवर आणि त्याच्या परिणामांवर फोडून आपण नामानिराळे राहू शकत नाही. या बदलांचे संकेत मिळत असताना, हे बदल होत असताना, बदल प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरही त्या सगळ्या अनुभवांमधून आपण फारसं काही शिकलो नाही, हे अस्वस्थ करणारं सत्य उरतंच.

महापूर येऊन गेल्यावर, दरडी कोसळल्यावर त्याच्या कारणांची चर्चा होते. पुन्हा असं होऊ नये म्हणून काय करता येईल याबद्दल मतप्रदर्शन होतं. त्यावर अहवाल तयार होतात. त्या सूचनांचं, अहवालांचं पुढे काय होतं? दर आपत्तीनंतर, लाखमोलाचे जीव  गमावल्यानंतर, वित्तहानीनंतर त्याच त्या कारणांचा कोळसा का उगाळला जातो? संकट पुन्हा येऊ नये म्हणून सुचवलेल्या उपायांमुळे यंत्रणांच्या आणि त्या यंत्रणा ज्या लोकांसाठी आहेत त्या लोकांच्या वागण्यात काही फरक पडतो का? पडत असेल तर त्यामुळे होणाऱ्या बदलांचा वेग पुरेसा आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचे प्रयत्न होतात का, याची कल्पना नाही. पण नेमेची येणारे पूर आणि कोसळणाऱ्या दरडी, त्या खाली दबणारी गावं, अनिश्चिततेची आणखी एक तलवार डोक्यावर लटकत असताना जगण्याचा प्रयत्न करणारी माणसं ह्या सगळ्याला नेमकं उत्तर शोधण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापन नावाच्या एकंदरच प्रक्रियेची पुन्हा मांडणी करण्याच्या गरजेपर्यंत आपण आलो आहोत. तीनशेपेक्षा जास्त लोकांचे बळी घेणाऱ्या आणि काही लाख मुलं, बायका, पुरुषांना भीतीच्या सावटाखाली जगायला लावणाऱ्या या महापुराच्या निमित्ताने आता या पुनर्मांडणीचा विचार करायला हवा. तो करत असताना बाधित होणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार जसा झाला पाहिजे तशीच केवळ जात्यातल्याच नव्हे तर सुपातल्याही प्रत्येकाने या पुनर्मांडणीतली आपली भूमिका समजून घ्यायला पाहिजे. 

विकास, विकासाच्या प्रक्रियेत होणारे बदल थांबवता येणार नाहीत हे एका बाजूला खरं असलं तरी त्या प्रक्रियेच्या परिणामांची पूर्ण कल्पना असायला हवी. मग कदाचित काही ठिकाणी आपल्या उत्साहाला, हव्यासाला मुरड घालावी लागेल, काही तात्कालिक फायद्यांवर पाणी सोडावे लागेल, काही बदलांच्या परिणामांना तोंड देण्यासाठी म्हणून उपाय करावे लागतील. हे केलं म्हणून संकटं येणार नाहीत असं नाही, पण या महापुरातूनही आपण काही शिकलो नाही तर आपली सगळी शहाणीव या पुराने धुऊन नेली एवढाच निष्कर्ष काढता येईल.

संबंधित बातम्या