खुलतच राहणारी मेंदी...

-
सोमवार, 9 ऑगस्ट 2021

संपादकीय

रंगांशी आपलं नेमकं काय नातं असतं? आणि ते केव्हा जमतं? सहज प्रयत्न करून पाहा. रंगांच्या प्रेमात आपण केव्हा पडलो ते नाही आठवणार. म्हणजे तो असा काही नेमका प्रसंग, नेमका क्षण नसणार, पण ते प्रेम ‘प्रथम तुज पाहता’च्या चालीवरच जमतं, हे मात्र खरं. माणसाच्या एकूणच वाटचालीत रंगांची सोबत कायमच राहिली आहे. आरक्त पहाटेच्या आश्वासकतेपासून ते भयाची जाणीव करून देणाऱ्या काळ्याकभिन्न अंधारापर्यंत वेगवेगळ्या रंगछटा आपल्याला हरघडी त्यांच्या विश्वात खेचून नेत असतात. आपल्या मनात उठणाऱ्या वेगवेगळ्या भावभावनांच्या तरंगांशी रंगांचा खूप जवळचा संबंध असतो, असं सगळेच चित्रकर्मी सांगतात. निसर्गातले हे सगळे रंग माणसाच्या हातात नेमके कधी आले ते रंगज्ञच सांगू शकतील, पण त्या रंगांनी आपल्या सगळ्यांचीच आयुष्यं रंगवून टाकली आहेत, याबद्दल दुमत नसावं. 

झाडांच्या साली, पाने, फुलांच्या पाकळ्या, फळांचे रस अशा अनेकविध गोष्टींमधून माणसाच्या हाताला रंग लागले त्याला आता पाच हजारांहूनही जास्त वर्ष होऊन गेली आहेत. रंगांच्या या शोधात,  एखाद्या आनंदाच्या प्रसंगी त्या आनंदात सहभागी असणाऱ्या मंडळींच्या उत्फुल्लतेत भर घालणारी शुभसूचक मेंदी अशी अवचितच हाती लागली असणार.  सुंदर दिसण्याची ओढ माणसाला कधीपासून लागली कोण जाणे, पण सौंदर्य खुलवणाऱ्या रंगसंभाराच्या पहिल्या काही प्रयत्नांमध्ये काहीसा उग्र असला तरी रंध्रांना सुखावणारा दरवळ असणारी मेंदी नक्की असणार.

विश्वकोशकारांच्या मते मेंदी मूळची भारतातली नसावी, तर इ.स. ११०० पूर्वी कधीतरी ती भारतात आली असावी. त्याचं कारण म्हणजे, ते सांगतात, भारतात इ.स. ११००च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या नित्यनाथ सिद्धाच्या  ‘रसरत्नाकर ’ या ग्रंथात ‘महिंदी’ हा मेंदीवाचक शब्द आढळतो. तत्पूर्वीच्या कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात मेंदीचा उल्लेख आढळत नाही. 

मेंदीचं कूळ कुठलंही असलं तरी मेहंदी, मदरंगा, मेंदिका, नखरंजका, गोरंटे, रक्तगर्भा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मेंदीने आजवर असंख्य नवपरिणीतांच्या आयुष्यात रंग भरले असतील. सणासमारंभांमध्ये रंग भरणारी ही मेंदी केवळ वैयक्तिक आयुष्यांचा भाग नसून गेली कित्येक दशके मेंदी एक महत्त्वाची व्यापारी आणि औषधी वनस्पती म्हणूनही ओळखली जाते.

मेंदीच्या एकूण उलाढालीची सहज कल्पना येत नाही. पण लग्नसराई, रमजान ईद, दिवाळी यांसारख्या मेंदीच्या ‘सीझन’ पुरता विचार केला तर एका एका शहरामधलीच मेंदीची उलाढाल काही क्विंटलची असते. मेंदीची पूड जितकी सुपरिचित असते तितकीच मागणी मेंदीच्या फुलांपासून तयार होणाऱ्या अत्तरालाही असते. अत्तरांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कन्नौजच्या गुलाबाच्या अत्तरांबरोबर हिना म्हणजे मेंदीच्या अत्तराचाही बोलबाला असतो. पारंपरिक मेंदी व्यावसायिकांच्या बरोबरीने गेल्या काही वर्षांमध्ये सौंदर्यप्रसाधन उद्यागातल्या काही बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनीही विशेषत्वाने केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांसाठी आता मेंदी उद्योगात पाय रोवले आहेत. नेमके आकडे मिळणं कठीण असलं तरी एका अंदाजानुसार भारतातली मेंदी उद्योगाची वार्षिक उलाढाल काहीशे कोटी रुपयांच्या घरात असावी, आणि यात निर्यातीचा वाटा निम्म्याच्या आसपास आहे. भारताच्या बरोबरीने इराण, पाकिस्तान, येमेन आणि सुदानचाही मेंदीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग आहे. अमेरिका, कॅनडा, युके, जर्मनी, फ्रान्स, चीन, जपान, द. आफ्रिका, ब्राझील ही जगातली मेंदीची बाजारपेठ.

जगाच्या बाजारपेठेत भारतीय मेंदीला ‘सर्वात उत्तम रंगणारी मेंदी’ म्हणून भाव असला तरी मेंदी उद्योगाला सध्या काही अडचणी भेडसावताहेत. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम म्हणून मेंदी पिकाखाली असणारी जमीन आक्रसते आहे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारभाव ही मेंदी उद्योगाला जाणवणारी आणखी एक अडचण असल्याचे जाणकार सांगतात.

गेले काही महिने हाताला मेंदीपेक्षा सॅनिटायझरच जास्त वेळा लागलं असलं तरी मेंदीच्या औषधी गुणधर्मांमुळे शुभकार्याच्या आनंदाशी जोडलेल्या मेंदीचा रंग खुलतच राहणार, असा या जाणकारांचा विश्वास आहे. औषधी वनस्पतींपासून बनलेल्या उत्पादनांना वापरकर्त्यांकडून मिळणारी पसंती हे या विश्वासाचं एक कारण.

अलीकडच्या काळात वैयक्तिक पातळीवर मेंदी कलाकारांसाठी मेंदी रेखाटन हा एक उत्तम व्यवसाय म्हणून पुढे आला आहे. कलाकाराची नजर आणि सातत्याने शिकण्याची सवय या भांडवलासह मेंदीने कित्येक कलाकारांच्याही जगण्यात रंग भरले आहेत. 

उद्या रविवारी होणाऱ्या दीप पूजेनंतर सणवारांची द्वाही फिरवणारा श्रावण सुरू होतो आहे. या सगळ्या सोहळ्यांचा आनंद वाढवणारी मेंदी आपलं जगणं खुलवत राहो, याच सदिच्छा!

संबंधित बातम्या