एकेका झाडासाठी

-
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

संपादकीय

सोमालिया म्हटल्यावर पटकन डोळ्यासमोर येतो तो अनेक दशके सातत्याने दुष्काळाशी आणि अंतर्गत यादवीशी सामना करणारा प्रदेश. आणखी काही जणांना सोमाली चाचेही आठवतील. एका बाजूला गल्फ ऑफ एडन आणि हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या या प्रदेशाची तीही एक ओळख आहे. आफ्रिकेतल्या देशांमध्ये सर्वात जास्त लांबीचा समुद्रकिनारा या देशाला लाभलेला आहे. मध्ययुगात अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेला हा देश हवामान बदलापासून ते यादवीपर्यंतच्या संकटांना तोंड देत आता नव्या बांधणीच्या दिशेने वाटचाल करतो आहे. नोकरीधंद्याच्या निमित्ताने जगभरात गेलेल्या सोमाली नागरिकांकडून येणाऱ्या पैशासोबतच पारंपरिक शेती, पशुपालन आणि आता गेल्या काही वर्षांत दूरसंचार क्षेत्र सोमालियाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनते आहे. 

अलीकडच्या एका बातमीमुळे सोमालियाने लक्ष वेधून घेतले. जुबा नदीच्या काठी वसलेल्या क्वामक्वाम गावची ही बातमी आहे. सोमालियात वर्षभर वाहणाऱ्या दोनच नद्या आहेत. जुबा आणि शाबल. शेजारच्या इथिओपियात उगम पावणारी जुबा नदी सोमालियातून वाहत जाते आणि किस्मायो गावी हिंदी महासागराला मिळते. हे क्वामक्वाम गाव या किस्मायो बंदराच्या परिसरातच आहे.

सोमालियाच्याही नकाशात पटकन न सापडणाऱ्या या गावात गेल्या काही तीन दशकांपासून झाडं कापण्यावर बंदी आहे. कुऱ्हाड बंदीच्या या नियमाचा अनादर करणाऱ्या गावकऱ्याला जबरदस्त दंड तर भरावा लागेलच पण त्याला गावबंदीलाही सामोरं जावं लागेल असं क्वामक्वामच्या गावपंचायतीनी ठरवलं आहे. अपुरा पाऊस आणि पाण्याअभावी नष्ट होत चाललेल्या शेतीच्या पार्श्वभूमीवर निसर्ग वाचवण्यासाठी या गावाने हा निर्णय घेतला आहे. आणि हा निर्णय नुसताच कागदोपत्री नसावा कारण कँटर हुसेन नावाच्या एका क्वामक्वामवासियाला झाडाची हत्या केल्याबद्दल भराव्या लागलेल्या दंडाबरोबर गावही सोडून जावे लागले, असे या बातमीत म्हटले आहे. मात्र आता नऊ वर्षांनंतर कँटरला गावकऱ्यांनी पुन्हा स्वीकारलंय. स्थानिकांच्या भाषेत ‘दिया’ या नावाने ओळखला जाणारा हा दंड ‘ब्लडमनी’ म्हणजे एखाद्या माणसाची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून द्याव्या लागणाऱ्या रकमेसारखा आहे. स्वतःच्याच घरातले वठलेले झाड कापल्याबद्दल कँटरला दीड हजार अमेरिकी डॉलरच्या किंमतीएवढा दंड भरावा लागला होता, कारण गाव कारभाऱ्यांच्या मते झाडं ही पण त्यांच्या गावचे रहिवासीच आहेत, आणि म्हणून झाड कापणं हे गावाच्या लेखी हत्येएवढेच गंभीर आहे.

या निर्णयाला पार्श्वभूमी आहे ती सोमालियातल्या अवैध कोळसा उद्योगाची. संयुक्त राष्ट्रांनी सोमालियातून कोळसा आयात करण्यावर बंदी घातल्यानंतरही हा व्यापार सुरू आहे. जुबा नदीच्या काठचा क्वामक्वामचा प्रदेश जाड बुंध्याच्या बाभळीच्या एका स्थानिक प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. तीस वर्षांपूर्वी, १९९१मध्ये, झालेल्या यादवीत गावाने कोणाचीच बाजू न घेता तटस्थ रहायचे ठरवले होते. त्याच काळात गावाने हा नियम केला आणि आजतागायत तो पाळला जातो आहे. गावात नव्याने येणाऱ्या प्रत्येकाला हा नियम सांगितला जातो आणि येणारे लोकही तो विनातक्रार मान्य करतात, असा क्वामक्वामच्या रहिवाशांचा अनुभव आहे.

हवामान बदलाच्या परिणामांमुळे आजही स्थलांतरांना सामोरे जाणाऱ्या सोमालियातल्या एका छोट्या गावाच्या एका निर्णयामुळे गावची हिरवाई फक्त वाचलीच नाही तर हीच हिरवाई आता पर्यटकांचे आकर्षणही बनली आहे. गाव करील ते राव करील काय, ही म्हण क्वामक्वामने सार्थ ठरवली आहे.

आपल्याकडेही पर्यावरण रक्षणासाठी गावाने जोपासलेल्या प्रथांची अनेक उदाहरणे आहेत. परंपरेचा भाग म्हणून अनेक गावांनी, लोक समूहांनी वने राखली आहेत; प्राण्यांना, पक्ष्यांना अभय दिले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळातून धावणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांबरोबरच तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडातल्या गावांनी जोपासलेल्या देवराया हा याच परंपरांचा एक समृद्ध भाग. असे असले तरी वाढत्या नागरीकरणाच्या रेट्यात आज अनेक देवरायांच्या, पिढ्यानपिढ्या राखलेल्या परिसंस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे वास्तव अभ्यासक नोंदवतात, हे पर्यावरणाविषयी काही एक किमान आस्था असणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. 

हवामान बदलाचे परिणाम आता सगळ्या जगालाच जाणवू लागले आहेत. जगभरातले तज्ज्ञ वारंवार धोक्याचे इशारे देत असताना, पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव हा प्रत्येक सुजाण आणि सजग नागरिकाच्या जगण्याचा भाग असायला हवा, एवढेच.

संबंधित बातम्या