बालहक्कांचा नवा अध्याय

-
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

संपादकीय

गेले काही दिवस दोन विषय चर्चेत आहेत. त्यातला एक आहे कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्याच्या तयारीचा, आणि दुसरा आहे, हवामान बदलांच्या संभाव्य परिणामांचा. या चर्चांच्या अनुषंगाने उद्याच्या पिढीच्या भविष्याशी थेट संबंधित असणारे काही मुद्दे पुढे आले आहेत. 

कोरोना उद्रेकाच्या काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित परिणामांना आता सारंच जग सामोरं जातं आहे. अठरा –वीस महिन्यांपूर्वी कोरोनाचा विळखा जसा घट्ट व्हायला लागला, एका पाठोपाठ एक देश जसे ठप्प व्हायला लागले तसे ठाणबंदीमुळे आर्थिक आघाड्यांवर आणि पर्यायाने माणसांच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल आडाखे बांधले जाऊ लागले. कोरोनाची विश्वव्यापी साथ लांबत गेली, तशी जगाला भेडसावणारी अनिश्चितताही वाढत गेली. अजूनही त्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यातून जगाची सुटका झालेली नाही.

जगभर जगण्याचे प्रश्न बिकट होत असतानाच, उद्या हे जग ज्यांच्या हातात द्यायचे आहे त्या पिढीवर होत गेलेल्या परिणामांविषयी आता जरा चर्चेला तोंड फुटते आहे. यातले काही परिणाम होणार हे जगाला माहिती होतं, काही परिणाम अनपेक्षित होते, आणखी काही परिणामांचे स्वरूप एवढे भयानक असेल हे समजेपर्यंत खूप नुकसान होऊन गेलं होतं.

गेल्या दीड -पावणे दोन वर्षात असंख्य मुलांचे शिक्षण विस्कळित झाले, थांबले; आर्थिक पडझडीमुळे जगाभोवतीचा बालमजुरीचा विळखा आणखी घट्ट झाला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि युनिसेफच्या अलीकडच्या एका अहवालात २०२२पर्यंत आणखी नव्वद लाख मुले बालमजुरीत ढकलली जाण्याची भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह भारतातल्या काही राज्यांमध्ये बालविवाहाच्या समस्येने गेल्या वर्षभरात पुन्हा फडा काढला. मुलांचे मूलपण हिरावून घेण्याऱ्या प्रश्नांच्या आघाडीवर गेले काही दशके सातत्याने काम केल्यानंतर जे काही चिमूटभर यश मिळाल्यासारखे वाटत होते तेदेखील या महासाथीच्या लाटेत वाहून गेले आहे, असेच चित्र आहे.

ज्या भागात कोरोनाची साथ आटोक्यात आहे अशा काही भागांतल्या मोठ्या वर्गांच्या शाळा सुरू झाल्यानंतर काही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी त्यांची लग्नं लावून दिल्याचे शिक्षकांच्या नजरेस आल्याच्या बातम्या दोन –तीन आठवड्यांपूर्वीच्या वृत्तपत्रांमध्ये होत्या. आर्थिक विवंचना हे या विवाहांमागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं गेलं. कोरोना साथीच्या काळात तब्बल पावणे आठशे बालविवाह रोखण्यात संबंधित अधिकाऱ्यांना यश आल्याचंही सांगितलं जातंय. ज्या शाळा सुरू झाल्यात तिथे अजूनही सगळी मुलं वर्गांमध्ये आलेली नाहीत, कारण त्या मुलांना कुटुंबाच्या निर्वाहासाठी काम करणं भाग पडतं आहे. मुलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते बालविवाहांची, बालमजुरीची जी प्रकरणं लक्षात आली आहेत/ येत आहेत ती म्हणजे निव्वळ हिमनगाचे टोक आहे. पाण्याखाली असणाऱ्या हिमनगाच्या आकाराचा अजूनही अंदाज आलेला नाही.

कोरोनामुळे आई -वडिलांचं छत्र गमावलेल्या मुलांचाही प्रश्न आता सामोरा येतो आहे. ‘लॅन्सेट’च्या ताज्या अहवालानुसार जगातल्या दहा लाख मुलांनी त्यांचे एक किंवा दोन्ही पालक गमावले आहेत. भारतातच ही संख्या एका लाखाहून अधिक आहे. या मुलांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी समाज म्हणूनही आपल्याला भूमिका करावी लागणार आहे.

गेल्याच आठवड्यात आलेल्या आणखी एका अहवालाने आपल्या मुलांपुढच्या आणखी एका संकटाकडे लक्ष वेधले आहे. युनिसेफने नुकताच हवामान बदलाचा मुलांना असलेल्या धोक्यांबाबतचा पहिलावहिला जागतिक निर्देशांक प्रसिद्ध केला. मोठ्यांच्या तुलनेत मुलं अधिक असुरक्षित असल्याने पर्यावरणातले बदल हा बालहक्कांवर  पडणारा घाला आहे अशी युनिसेफची भूमिका आहे. जगातल्या निम्म्या म्हणजे दोन अब्जांपेक्षा जास्त मुलांना भविष्यात या संकटाचा सामना करावा लागणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. हे संकट बहुपेडी आहे. ते पिण्याच्या पाण्याचं आहे, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांविषयीचं आहे आणि मुलांना मिळणं अपेक्षित असणाऱ्या एकंदरीत सुरक्षित वातावरणाचंही आहे.

उद्याच्या पिढीसाठी आश्वासक भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे, हा विचार मान्य असेल तर त्या अर्थाने केवळ विश्वस्तांच्या भूमिकेत असणाऱ्या आजची पिढीला अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागेल. 

मुलांच्या हक्कांबाबत जगभर फक्त उदासीनताच आहे, असा याचा अर्थ नाही, पण मुलांच्या हक्कांबाबत आपण पुरेसे गंभीर आहोत का, याची चर्चा या निमित्ताने करायला हरकत नाही. मुलांसाठी, त्यांच्या हक्कांसाठींच्या योजना, बालविवाह, बालमजुरी रोखणारे कायदे, मुलांच्या भल्याकरता आखल्या जाणाऱ्या योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि मुख्य म्हणजे आपल्यासह आपल्या मुलांचंही भविष्य सुरक्षित असेल यासाठी आज आपल्याला जे काही करावं लागणार आहे ते करण्याची तयारी याचाही विचार व्हावा.

आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी काम करण्याचे बळ आपल्याला मिळावे असे साकडे यानिमित्ताने संकटात पावणाऱ्या आणि निर्वाणीच्या क्षणी रक्षण करणाऱ्या विघ्नहर्त्याला घालूया!

संबंधित बातम्या