प्रत्येकाच्या आरोग्याचा मुद्दा

-
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

संपादकीय

‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज’च्या (आयपीसीसी) सहाव्या मूल्यांकन अहवालाचा पहिला भाग महिन्याभरापूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर वातावरण बदलाच्या धोक्यांबद्दल जगभर वेगवेगळ्या व्यासपीठांवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘हवामानात होणाऱ्या बदलांच्या परिणामांचे आणखी एक वर्ष’ अशी या २०२१ची माणसाच्या अलीकडच्या इतिहासात नोंद होत असताना, या बदलांचे पुढच्या पिढ्यांवर होणाऱ्या परिणामांबद्दल आता वैज्ञानिक चर्चा करू लागले आहेत. मोठ्या माणसांच्या तुलनेत मुलं कायमच अधिक असुरक्षित असतात, त्यामुळे पर्यावरणात होणारे बदल हा भावी पिढ्यांच्या हक्कांवर पडणारा घाला आहे, अशी भूमिका मांडत जगभरातल्या बालकांच्या हक्कांच्या दृष्टिकोनातून हवामान बदलांचा वेध घेणाऱ्या युनिसेफच्या पहिलावहिल्या जागतिक निर्देशांकाबद्दल गेल्या आठवड्यात याच स्तंभात ऊहापोह केला होता. 

आयपीसीसीच्या मूल्यांकन अहवालाच्या संदर्भाने वैद्यकशास्त्र, सार्वजनिक आरोग्य आणि नर्सिंग या विषयांवर संशोधनात्मक लिखाण करणारी जगभरातली दोनशे वीस नियतकालिके, हवामान बदलाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे जागतिक नेतृत्वाला आवाहन करणारे संपादकीय लिहीत आहेत. वाढत्या तापमानामुळे संपूर्ण जगाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, आणि आता दुर्लक्ष झाल्यास फार काही करणे हातात राहणार नाही, हा या संपादकीय मजकुराचा सारांश आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या मुख्य संपादिका डॉ. फियोना गॉडली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या संपादकीयाचा मसुदा लिहिला आहे.

वैद्यकीय क्षेत्रात त्या त्या देशातील संशोधकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, दबदबा असणाऱ्या नियतकालिकांच्या या संपादकीयाला निमित्त आहे, येत्या १४ तारखेपासून सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ७६व्या आमसभेचे, आणि नोव्हेंबरमध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होऊ घातलेल्या ‘ग्लोबल क्लायमेट ट्रिटी कॉन्फरन्स’, कॉप२६ या जागतिक पर्यावरणविषयक करार परिषदेचे. ‘ब्रिटिश मेडिकल असोसिएशन’, ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन’ आणि ‘रॉयल कॉलेज ऑफ नर्सिंग’सह एकवीस आरोग्य संस्थांचा सहभाग असणाऱ्या ‘यू.के. हेल्थ अलायन्स ऑन क्लायमेट चेंज’ने या संपादकीयासाठी पुढाकार घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रतिष्ठीत संशोधन नियतकालिकांनी एकत्रितपणे एखादी संपादकीय भूमिका मांडावी, हे पहिल्यांदाच घडते आहे. पण ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’चे संपादक डॉ. एरिक जे. रुबिन यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यामागची कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.

हवामान बदलामुळे होणारी तापमानवाढ औद्योगिकरणपूर्व जगातील तापमानाच्या सरासरीच्या दीड अंश सेल्सिअस पातळीच्या खालीच रोखणे, निसर्गाची हानी थांबवणे आणि आरोग्याचे रक्षण करणे या तीन मुद्द्यांवर जगभरातील सर्व नेत्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात यावर या संपादकीय भूमिकेचा मुख्यतः भर आहे. निसर्गाचा विध्वंस थांबविण्याच्या आणि तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नांना आजवर आलेले अपयश हा जागतिक आरोग्याला असणारा आजचा सर्वात मोठा धोका आहे, हा मुद्दा अधोरेखित करतानाच, जागतिक नेतृत्वाने या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निश्चित बदल घडविण्यास सुरुवात करावी आणि २०२१ या वर्षाची ‘धोरण बदलाचे वर्ष’ अशी नोंद होण्यास हातभार लावावा, अशी आम्हा सर्व संपादकांची इच्छा आहे, असे या संपादकीयात नमूद केले आहे. पर्यावरण बदलांना सामोरे जाताना दळणवळण, अन्नधान्य वितरण, आरोग्यसेवा आदींमध्ये बदल घडवून आणण्याच्या गरीब देशांच्या प्रयत्नांना श्रीमंत देशांनी निधीच्या स्वरूपातही हातभार लावावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली आहे. 

‘नॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडिया’सह ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’, ‘लॅन्सेट’, ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’, ईस्ट आफ्रिकन मेडिकल जर्नल’, चायनीज सायन्स बुलेटिन’, ‘मेडिकल जर्नल ऑफ ऑस्ट्रेलिया’ अशा मान्यवर नियतकालिकांनी ही भूमिका स्वीकारली आहे, असे ‘गार्डियन’ आणि ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने या संपादकीयाबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.

कोविड-१९च्या संकटाला तोंड देण्यात वैद्यकीय व्यावसायिक जसे आघाडीवर होते, तसेच ते हवामान बदलाच्या अधिक गंभीर असणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठीही एकवटतील, असे डॉ. गॉडली म्हणतात.

प्रत्येक सामान्य नागरिक हा जर पर्यावरणीय बदलांना तोंड देणारा पहिला घटक असेल तर ह्या अहवालांचे, इशाऱ्यांचे नेमके अर्थ समजावून घेऊन थेट आपल्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या या मुद्द्याबाबत आपली भूमिका काय असेल यावर प्रत्येक सामान्य नागरिकालाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.

 

संबंधित बातम्या