पुनर्निर्माण!

-
सोमवार, 20 सप्टेंबर 2021

संपादकीय

स्टीव्हन स्पिलबर्गचा ज्युरासिक पार्क आठवतोय. जगाच्या उत्पत्तीविषयक जाडजूड पुस्तकातल्या चित्रांमध्ये नाहीतर पुराणाश्मयुगीन वस्तूंच्या संग्रहालयांमध्ये हाडांच्या सापळ्यांच्या स्वरूपातच दिसणाऱ्या डायनोसोरांची ज्युरासिक पार्कने जगाला नव्यानी ओळख करून दिली होती. चोरलेला डीएनए वापरून जॉन हेमंड नावाच्या एका विक्षिप्त अब्जाधिशाने क्लोन केलेल्या डायनोसोरांपैकी एक ज्युरासिक पार्कमधल्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला करतो आणि तिथून चित्रपट सुरू होतो.

पुढे जे काही घडतं ती सगळीच विज्ञान काल्पनिका. पण ज्युरासिक पार्कने पुढच्या काळात चित्रपटसृष्टीत डायनोसोरचा एक ट्रेंड आणला, हे खरं. असं प्रत्यक्षात घडणं कितपत शक्य आहे? म्हणजे अगदी ज्युरासिक पार्कसारखं एखादं टुरिस्ट अॅट्रॅक्शन नाही, तरी आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने अशा एखाद्या नष्ट झालेल्या प्राण्याचं ‘पुनर्निर्माण’ शक्यतेच्या आवाक्यात असू शकतं का? पृथ्वीतलावर कधीकाळी वावरलेला, निसर्गातल्या उत्पातांमुळे म्हणा; माणसाच्या अस्तित्वासाठीच आता जो अगदी परवलीचा शब्द झाला आहे त्या हवामान बदलांमुळे म्हणा किंवा माणसाने निसर्गावर केलेल्या आक्रमणामुळे म्हणा, नष्ट झालेला आणि आता कुठकुठे सापडलेल्या अर्ध्यामुर्ध्या अवशेषांच्याच रूपात पाहायला मिळणारा एखादा प्राणी असा खरंच अवतरू शकतो?

अमेरिकी शास्त्रज्ञांचा एका चमू सध्या अशा प्रयत्नात आहे. प्रयोग आहे आजच्या हत्तींच्या पूर्वजकुलातल्या वूली मॅमथच्या (Mammuthus primigenius) पुनर्निर्माणाचा. पृथ्वीवरील प्लाइस्टोसीन ते हॅलोसीन कालखंडात म्हणजे सुमारे ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या कालखंडात हे मॅमथस प्रिमिजिनियस उत्तर गोलार्धातल्या अतिशीत प्रदेशांमध्ये वावरत होते. 

विश्वकोशातल्या नोंदीनुसार मॅमथस प्रिमिजिनियस ही मॅमथांमधली सर्वात प्रसिद्ध प्रजाती.  सायबेरीयाच्या बर्फात गाडले गेलेले मॅमथांचे अनेक सांगाडे आणि कलेवरे जशी संशोधकांना सापडली आहेत तशीच पुराणाश्मयुगातील मानवाने चितारलेली या केसाळ प्राण्याची रंगीत गुहाचित्रेही सापडली आहेत. अठराव्या शतकाच्या सुरूवातीपासून या महाकाय प्राण्यांची कलेवरे सायबेरियात आढळत होती, पण शास्त्रज्ञांच्या आधी त्यांची दखल घेतली ती हस्तिदंताच्या व्यापाऱ्यांनी, असेही ही नोंद सांगते.

मॅमथला पुन्हा जन्माला घालण्याच्या प्रयत्नांची चाचपणी तशी गेले दशकभर सुरू होती. अलीकडच्या वृत्तानुसार त्याला गेल्या आठवड्यात पुन्हा गती मिळाली आहे. जैवविज्ञान आणि अनुवंशशास्त्राच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘कलोसल बायोसायन्सेस’ या कंपनीने या प्रकल्पाला दीड कोटी डॉलरचे भरभक्कम साहाय्य देण्याची  घोषणा केल्याने आता हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. जीन एडिटिंग प्रक्रियेत काही नवे प्रवाह आणणारे, हार्वर्ड मेडिकल स्कूलमधले जेनेटिक्सचे प्राध्यापक जॉर्ज चर्च आणि टेक्नॉलॉजी व सॉफ्टवेअर उद्योजक बेन लाम यांनी मिळून कलोसलची स्थापना केली आहे. ‘डी-एक्सटिन्क्शन’ हेच विविध प्रजातींच्या विनाशावरचे उत्तर आहे, असे कलोसलचे म्हणणे आहे.

या प्रयोगाची जी माहिती उपलब्ध होते आहे, त्यानुसार प्रथमतः मॅमथचे डीएनए असणारे संकरित भ्रूण प्रयोगशाळेत तयार केले जातील. त्यासाठी आशियायी हत्तींच्या त्वचेतल्या पेशी वापरल्या जातील. या प्रयोगात अडथळे आले नाहीत तर येत्या सहा वर्षात प्रयोगशाळेत मॅमथची नवी पिढी जन्माला येईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या प्रयोगातून एका वेगळ्या अर्थाने आशियायी हत्तींबरोबर आर्क्टिक टुंड्रा प्रदेशाचेही संवर्धन होईल, असेही या प्रयोगकर्त्यांचे म्हणणे आहे.

प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विश्वामित्राची कथा आपल्याला परिचित आहे. काहीशी त्याच वळणाने जाणारी ही मॅमथची गोष्ट. या सगळ्या प्रयोगाबद्दल आजमितीला शास्त्रज्ञांच्या मनातही असंख्य वाजवी शंकाही आहेत. हवामान बदलामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती आणि संकटात असणारी वने आणि अन्य भूरूपे वाचविण्यासाठी आधुनिक तंत्राच्या मदतीने वेगवेगळे प्रयोग करावे लागतील, हे अनेकांना मान्य असले तरी अशा प्रयोगांमधून किती आणि काय साध्य होईल, याबाबतही संशोधकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

हवामान बदलाचे संकट गडद होत असताना सृष्टीसंहार रोखण्याबरोबरच विज्ञान, त्याच्या सतत शोध घेण्याच्या स्वभावानुसार, आणखीही काही प्रयोगांची कास धरते आहे. नष्ट झालेला मॅमथ या प्रयोगातून पुन्हा पृथ्वीतलावर अवतरेल आणि वावरेल का? आणि त्यातून मग गेल्या अनेक दशकांमध्ये आपण आपल्याच कर्माने जे घालवलं आहे, त्याची थोडीतरी भरपाई करण्याचा मार्ग सापडेल का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देणार आहे.

संबंधित बातम्या