दोन चाकांवरचं जग

-
सोमवार, 27 सप्टेंबर 2021


संपादकीय

माणसाचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या दहा महत्त्वपूर्ण शोधांची यादी करायची ठरली तर आपल्यापैकी प्रत्येकाची यादी वेगळीवेगळी असेल यात शंका नाही, पण यादी कोणीही केली तरी चाकाचा शोध आणि आग निर्माण करण्याची युक्ती हे दोन शोध प्रत्येकाच्या यादीत कोणत्या ना कोणत्या क्रमांकावर असतीलच यात शंकाच नाही.

आग निर्माण करण्याची युक्ती सापडल्यानंतर माणसाच्या आत्मविश्वासात भर पडली, असं म्हटलं जातं. तद्वतच चाकाने माणसाच्या आयुष्याला गती मिळवून दिली. मेसोपोटेमियात सापडलेले इसवी सन पूर्व ३५००च्या सुमाराचे अवशेष हा चाकाचा सर्वात जुना पुरावा असेल, तर गेली साडेपाच हजार वर्षं ही चाकं असंख्य वेगवेगळ्या रूपांत आणि आकारांत माणसाच्या प्रगतीची (आणि क्वचित अधोगतीचीही) साक्षीदार आहेत.

चाक आपल्या आयुष्यात नक्की केव्हा प्रवेश करतं ते नेमकं सांगणं कठीण आहे, पण आपल्या नियंत्रणात येणारं पहिलं चाक सायकलचं असतं, असं मात्र नक्की म्हणता येईल. ऐन भरात असताना स्थैर्याच्या शोधात निघणाऱ्या माणसाच्या पायाला भिंगरी लागण्याच्या आधी, किशोरावस्थेच्या उंबरठ्याच्या आतबाहेर असताना स्वातंत्र्याच्या पहिलेपणाचा खराखुरा आनंद देणारी सायकल हाच ‘सकाळ साप्ताहिका’च्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध होत असलेल्या या अंकाचा मध्यवर्ती विषय आहे.

पालथं पडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळाला एक दिवस जसे पाय फुटतात आणि आपल्याला आता आपल्या मर्जीने घरभर फिरता येतं हे समजल्यावर त्या चिमुकल्या जिवाला जो आनंद होतो, त्याच आनंदाचा समजत्या वयात पाऊल ठेवताना येणारा पुनःप्रत्यय म्हणजे हातात आलेली सायकल.

पहिली सायकल अवतरली त्याला आता सव्वातीनशेहून अधिक वर्षं उलटून गेली आहेत. विश्वकोशातल्या नोंदीनुसार सायकलचे मूळ रूप एका दांड्याने जोडलेली दोन लाकडी चाके एवढेच मर्यादित होते. तोल सावरण्याची कसरत करीत पायाने रेटून चालविता येणाऱ्या त्या पहिल्यावहिल्या सायकलीत आजमितीला विलक्षण फरक पडला असला, तरी सायकल चालविण्याचा त्या काळचा आनंदही आजच्याइतकाच ताजा असणार.

वैयक्तिक आरोग्याविषयी वाढत्या सजगतेच्या जाणिवेच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ साप्ताहिक’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सायकलवर नव्याने एक दृष्टिक्षेप टाकताना, आपल्या हातातला हा अंक आपल्यापैकी प्रत्येकाला आपापल्या ‘सायकल अॅडव्हेंचर्स’च्या रोमांचक आठवणींच्या दालनात घेऊन जाईल. आपणही सायकलशी कधी ना कधी जोडलेले असाल. अनेकांसाठी सायकल हे पहिलं प्रेम असेल, काहींच्या दृष्टीने सायकल हे मनपसंत भटकंतीचे पहिले तिकीट असेल, स्वतःशी कायमस्वरूपी जोडली गेलेली पॅशन असेल आणि काहींसाठी सायकल हा जगण्याच्या शर्यतीतला महत्त्वाचा जोडीदारही असेल. फारसे कष्ट (आणि खर्चही) न करता मनाला आलेली मरगळ दूर करण्याचे जे काही हाताच्या बोटांवर मोजता येतील असे मार्ग आपल्याला उपलब्ध असतात, त्यातला, सायकलवर टांग टाकून (मनातल्या मनातच) ‘बनके पंछी गाये प्यारका तराना’ सारखी एखादी मनपसंत धून छेडत, चक्कर मारून येणे हा एक खात्रीलायक मार्ग आहे.

या अंकातल्या सायकल विषयावरील विशेष विभागात ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ जिंकणारे पहिले भारतीय सायकलिस्ट बंधुद्वय –डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन, सायकल आणि सायकल चालवण्यावर मनापासून प्रेम करणारे, त्याविषयी स्वतःची अशी एक फिलॉसॉफी असणारे उल्हास जोशी, श्रीनिवास निमकर, मिलनकुमार परदेशी, सायकलींचा संग्रह करणारे विक्रम पेंडसे; हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये उमटलेल्या सायकलींच्या दुनियेची आठवण करून देणाऱ्या अंजोर पंचवाडकर, त्याशिवाय नेहमीचे स्तंभलेखक डॉ. अविनाश भोंडवे, ज्योती बागल, किशोर पेटकर यांच्या/ यांच्याविषयीच्या लेखांमधून सायकलींचे अनेक नवेजुने चेहरे आपल्यासमोर येतील.

वापरणाऱ्याला वापराच्या आधी तोल सांभाळायला शिकविणारे सायकल हे आपल्या वापरातले एकमेव उपकरण असेल. आणि नंतर आयुष्यभर तो तोल सांभाळणे गरजेचे असते. तोल सांभाळण्याच्या आपल्या कौशल्याची परीक्षा म्हणूनही कधीतरी आनंद आणि आरोग्यदायी सायकलकडे वळायला हरकत नाही!

***

‘सकाळ साप्ताहिक’ आता ३५व्या वर्षात प्रवेश करीत आहे. गेल्या साडेतीन दशकांच्या प्रवासात ‘सकाळ साप्ताहिक’ने वैशिष्ट्यपूर्ण सदरांमधून अनेक विषय हाताळले, नामवंतानी तर लिहिलेच, पण अनेक नव्या लेखकांनाही ‘सकाळ साप्ताहिक’ने लिहिते केले. या साऱ्या प्रयत्नांना आपणासारख्या सजग वाचकांबरोबरच, जाहिरातदार, वितरक आणि असंख्य हितचितकांची मोलाची साथ लाभली. आपल्या सर्वांच्या सहकार्याने भविष्यातील वाटचाल करीत असताना ‘सकाळ साप्ताहिक’चे स्वरूप कसे असावे, कोणते विषय आपल्याला वाचायला आवडतील ते आम्हाला www.saptahiksakal@esakal.com या ई-मेल पत्त्यावर लिहून जरूर कळवा.

संबंधित बातम्या