शिलंगणाचे दिवस...

-
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

संपादकीय

कधीकधी उजाडण्याआधीच लख्ख जाग येते. आळोखेपिळोखे देत अंथरुणाबाहेर डोकवावे तर हलक्या पावलांनी पहाट निघून जाताना दिसते. रात्रभर गरब्याची रासक्रीडा करून आपल्या टिपऱ्या उचलून एखाद्या नवोढेनं थकल्याभागल्या देहानिशी निघून जावे, तशी दिसते पहाट. आसमंतातला धूसर प्रकाश आणि कार्तिकाची चाहूल लागत असल्याची वर्दी देणारा किंचित गारवा अंगांगाला सुखावत असतो. वर बघावं तर, आभाळात पाण्याचे काही नाठाळ ढग उगीचच रेंगाळलेले असतात. पावसाळा आपला बाडबिस्तरा गुंडाळून प्रस्थानाच्या बेतात असतो. युद्ध संपल्यानंतर छावणी उठवून निघून गेलेल्या सैन्यातले हे काही थोडे योद्धे, अजूनही युद्धाची खुमखुमी न जिरलेले!... उरलेलं निळं आभाळ मात्र भराभरा रंगांनी खुलून येऊ लागतं. हे दसऱ्याचं आभाळ… पाहिलंय कधी? पहाच एकदा…

यंदाचा दसरा तर एक भयाण काळोखी रात्र मागे टाकून उजाडतो आहे. ही रात्र तब्बल दोन वर्षांची होती. ‘रोगराईचं कण्हणं मागे टाकून नव्या उत्साहानं आयुष्याला भिडण्यासाठी सीमोल्लंघन करा,’ असं उत्साहानं सांगत यंदाचा दसरा आलाय. दाराला तोरणं बांधून त्याचं स्वागत करायलाच हवं. जनातले, मनातले सगळे दहा तोंडी रावण भुईसपाट करत नव्यानं सुरुवात करायला हवी. महाभारतातल्या विराट पर्वाकडून उद्योग पर्वाकडे जाताना पांडवांनी याच दिवशी अश्मंतक वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रं पुन्हा हातात घेतली, अज्ञातवास संपवला. विराटाघरचा पाहुणचारही आटोपता घेतला. त्याचं पुन्हा नव्याने स्मरण करून आपणही आता आपली म्यान केलेली अस्त्रं पुन्हा परजायला हवीत. जीवघेण्या संकटाला हुलकावणी देण्यासाठी सगळे मानवी जीवनच दोनेक वर्षे जणू कुठल्याशा ढोलीत लपले होते. जीवनेच्छेचं ते अमोघ अस्त्र आता उपसून काढायला हवं.

शिलंगणाचा हा दिवस सर्वार्थानं कृषकांचा. या दिवसात धानाचं पीक ओणावलेलं असतं. हिरव्या सोन्यानं शिवार फुललेलं असतं. त्या मायंदाळ पिकातलाच पहिला तुरा फेट्यात किंवा टोपीत खोचून झोकात गावाची वेस ओलांडायची. ‘मला विजयी कर, सर्व्यांना सुखी ठेव’ अशी आपट्याच्या झाडाची प्रार्थना करायची, आणि परस्परांमध्ये सौहार्दाचं सोनं लुटायचं, अशी परंपरा आहे. विद्यार्थी दशेतल्यांनी सरस्वतीचं पूजन करायचं असे. यांत्रिकांनी आपापल्या यंत्रांना फुलं वाहायची असत. जीवनाच्या झगड्यात प्रत्येकाचं शस्त्र वेगळं असतं. नाही का?

सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।

बहीण काशी ओवाळी मग त्याला ।

दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ॥

…अशी पूर्वीच्या काळी एक कविता होती. आताशा ती कुठे गायब झाली कुणास ठाऊक. हे गमतीदार शेवटलं चरण तेवढं बऱ्याच जणांना ठाऊक असतं. मोरू आणि त्याची बहीण काशी कुठेतरी हरवले. काळ बदलला. मोरूचा ‘ड्यूड’ झालाय, आणि काशीची ‘कॅश’! ते हल्ली सोनंबिनं लुटायला कुठं जात नाहीत. मोबाइलवरूनच आपट्याच्या पानांचं रंगीत चित्र मित्रमंडळींना फॉर्वर्ड तेवढं करतात. ‘हॅपी दशहरा’ वगैरे मेसेजेस पाठवतात. तेही बरंच आहे. एखाद्या निरागस, हिरव्यागार झाडाचा पाला ओरबाडण्यापेक्षा ही अशी चित्र फॉर्वर्ड करणं ‘इकोफ्रेंडली’ वर्तनच म्हटलं पाहिजे.

बदलत्या काळात दसऱ्याचे संदर्भ बदलले आहेत. शिलंगणाचा अर्थही बदलून गेला आहे. आपला देह हेच आपलं शस्त्र आहे. ते परजून ठेवा. आरोग्यपूर्ण ठेवा. देहाचं शस्त्र तजेलदार राहिलं तरच शिलंगण सार्थ ठरतं. मोहीम फत्ते होणार. यंदाच्या विजयादशमीचा हाच तर खरा अर्थ आहे.

आरोग्याची काळजी घ्या, तंदुरुस्त रहा.

विजयादशमीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!

संबंधित बातम्या