आस्वाद

-
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

संपादकीय

माणसाच्या हृदयापर्यंत पोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग पोटातून जातो म्हणतात, आणि हृदयाला हात घालण्याचा थेट संबंध आहे उत्तम स्वादाशी. आपल्या जगण्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या गुणसमुच्चायातल्या शब्द, स्पर्श, रूप यांच्याइतकेच महत्त्वाचे स्थान स्वादाच्या आस्वादाशी थेट जोडलेल्या रस आणि गंधाचेही आहे. वाचत गेलो तर बहुतेक शास्त्रकारांचे याविषयी एकमत दिसते. 

माणसाच्या आजवरच्या प्रवासात खाद्यसंस्कृतीचा वाटा मोलाचा आहे, हे मान्य केलं, तर या खाद्यसंस्कृतीच्या विकासाला ‘चव कळणे’ या प्रक्रियेने मोठा हातभार लावला आहे, याविषयी शंका असण्याचे कारण नाही. आदिम अवस्थेतल्या माणसाची ‘काय खावं?’ याची पहिली यादी तयार झाली असणार ती चवींच्याच आधारे. ‘मोहाच्या झाडाच्या फळा’सारख्या काही चवींनी त्याचा घात केला असला तरी अन्य असंख्य चवींनी माणसाच्या जगण्याचा स्वाद वाढविला आहे; किंबहुना जीवनाचा आस्वाद घेण्याच्या माणसाच्या प्रवासात ‘चव’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. 
आग पेटवण्याच्या कलेनं माणसाच्या स्वादाच्या कल्पनेत भर घातली. शिजवणे, उकडणे, भाजणे, परतणे, वाफवणे या क्रियांनी खाद्यसंस्कृतीला नवनव्या वळणांवर नेऊन उभे केले असणार. खाद्यसंस्कृतीला पुढच्या प्रवासात स्वादकारकांची जोड मिळाली आणि जगण्याचाही स्वाद, चव, रुची, लज्जत समृद्ध होत गेली.

माणसाच्या जगण्याचाही प्रवास काहीसा या खाण्याच्या प्रवासासारखाच आहे. पोटातून थेट हृदयाला हात घालणारी पाककृती समृद्ध आयुष्यासारखीच असंख्य गोष्टींचा समुच्चय असते. वेगवेगळ्या स्वभावांच्या जिन्नसांना ‘पक्वान्न’ या स्थितीपर्यंत नेण्यासाठी त्या जिन्नसांना आपापल्या गुणधर्मांसह, क्वचित ते गुणधर्म दुय्यम स्थानी ठेवून, दुसऱ्या जिन्नसांमध्ये विरघळावे लागते, मिसळावे लागते, एकजीव व्हावे लागते; आणि तेदेखील प्रमाणात. हे प्रमाण जमावे लागते, कारण ते जमले तरच चव सांभाळली जाते आणि मगच आस्वाद शक्य असतो. असंख्य गोष्टी असतात. मीठ ‘चवीपुरते’ म्हणजे किती ते समजावे लागते, अळू खाजरा असेल तर त्याचा तो खाजरेपणा कमी करण्यासाठी आंबट चिंचेची जोड द्यावी लागते आणि चिंचेचा आंबटपणा भाजीत उतरू नये म्हणून गूळ किती वापरायचा तेही कळावे लागते. मूळ मुद्दा असतो चव सांभाळण्याचा. ‘द ओन्ली कॉन्स्टंट इन् द लाइफ इज चेंज…’ हे जगण्याचं न बदलणारं सूत्र इथं फारच जपून वापरावं लागतं, कारण एखादा न कळता बिघाडही चव, स्वाद, रुची, लज्जत वगैरे शब्दांना निरर्थक करून टाकत असतो; आस्वादाची चव घालवत असतो. मिळालेलं यश राखण्याइतकंच अवघड आहे हे.

अखेरीस चव राखणं म्हणजे तरी काय… त्याचं शास्त्र खरंतर अवघड नाही. प्रमाण सांभाळणं ही मुख्य किल्ली. गेले काही महिने ही चवच बिघडल्यासारखी झाली होती. स्वादाची जाणीव करून देणाऱ्या रुचीकलिकांवर जणू आघात झाला होता. पण चव अशी बिघडून चालणार नाही. प्रमाण पुन्हा एकदा जमवावे लागेल. बिघडलेली चव पुन्हा मिळवण्यासाठी काळजीपूर्वक काही प्रयोग करावे लागतील, नव्या दिशा धुंडाळाव्या लागतील. आपल्या विजिगिषूवृत्तीची ती परीक्षाच एका अर्थाने.

संबंधित बातम्या