फुलपाखराची गोष्टी

-
शनिवार, 13 नोव्हेंबर 2021

संपादकीय

एका फुलपाखराची ही गोष्ट आहे, पण रंगबिरंगी पंखांचं, गवतफुलांवर उडणारं फुलपाखरू ते हे नव्हे! तेव्हा तो खूप लहानगा होता. शाळेत जायचा. सहामाही परीक्षा झाली की साईसुट्यो. मग धमाल. दिवाळीची सुट्टीच सुरू व्हायची थेट. परीक्षा चालू असताना जाम पेंगायला व्हायचं. पण सुट्टी लागल्यावर? टक्क जागा. झोपेत खूप वेळ वाया जातो, याची खंत उरात दाटून यायची.

अशा सुट्टीतच हव्याहव्याशा गारव्यासारखी दिवाळी यायची. 

‘धनतेरस कधी गं?’ किंवा ‘वसुबारस की गं त्या दिवशी’, असं काहीबाही आज्जी आईला उद्देशून बोलत राहायची. वाती वळता वळता आज्जीची ही बडबड त्याला धड कळायचीदेखील नाही. कसलं धनतेरस नि वसुबारस?

आईचं आणि बाबांचंही हलक्या आवाजात काही बोलणं व्हायचं. त्यातले ‘बोनस’, ‘उचल’, ‘बँकेचं पासबुक’ असले शब्द त्याच्या कानावर पडायचे. तेही त्याला धड कळायचे नाहीत. बरीच कुजबूज, किरकिर झाल्यावर बाबा एक दिवस खुशीत घरी यायचे. त्याच्या डोक्यावर टप्पल मारून म्हणायचे : ‘‘चल लेका, नुसता हुंदडतोस... सायकल घेऊ तुला!’’

बाबांना बोनस मिळाला आहे, हे आईला न सांगताच कळायचं. तिची लगबग आणि चेहऱ्यावरचं हसू वाढायचं. मग संध्याकाळी सायकलच्या दुकानात. कपडे नि साड्यांच्या दुकानात उगीचच वेळ घालवणाऱ्या आईचा त्यावेळी त्याला जाम राग यायचा. अर्थात त्यालाही नवाकोरा सदरा आणि पँट मिळे. 

आपला सदरा फारच चिटुकला आहे, मोठ्या माणसांसारखा मोठ्ठा नाही याचं त्याला मनातल्या मनात भारी वैषम्य वाटे. पण मोठयांच्या सदऱ्यावर मस्त नक्षी नसते. कार्टून्स नसतात. तेच ते नेहमीचं आडव्या रेघा, उभ्या रेघा, चौकोन नाहीतर एकदम प्लेन. श्‍यॅ! नव्याकोऱ्या सदऱ्याच्या कॉलरीच्या आत पुठ्ठ्याची पट्टी, आणि सतरा ठिकाणी टाचण्या टोचलेल्या असायच्या. सगळ्यात वरच्या बटणाला प्लास्टिकचं पारदर्शक फुलपाखरू असायचं. ते तसंच ठेवावं असं त्याला वाटे.

... मग हलक्या पावलांनी दिवाळी यायची. 

त्याला ती पहिली अंघोळ आठवत्येय. उटण्याचा तो खरखरीत स्पर्श शहारा आणी. गरमागरम पाण्याचे चार तांबे अंगावर पडले की मोती साबणानं सुगंधी फेस आणायचा. चिक्कार फेस. हातात न मावणारा तो वाटोळा साबण हुंगत हुंगत अंघोळ संपे…निरांजनाचं तबक घेऊन ओवाळताना आईचा उजळलेला तो हसरा, सुखी चेहरा त्याला आठवतोय.

पण या दिवाळ्या पुढे टिकल्याच नाहीत. कुठे गेल्या कुणास ठाऊक.

हातात न मावणाऱ्या त्या मोती साबणासारखंच आयुष्य सटकलं आणि कुठच्या कुठे घरंगळलं.

सदऱ्यावरची नक्षी आणि कार्टून्स हरपली. त्याच त्या मोठ्या माणसांच्या रेघोट्या नि चौकड्या आल्या. त्यांची कॉलर कधीच ताठ राहिली नाही.

ते प्लास्टिकचं फुलपाखरू गेलं तरी कुठं?

... कालपरवाच त्यानं थकलेल्या बाबांकडे नजर टाकली. या गृहस्थानं दरवर्षी जवळपास निम्मा बोनस आपल्यावर खर्च केला. पोटाला चिमटे काढत कसंबसं पायावर उभं केलं. आता भाजी निवडताना आई विचारत असते. ‘धनतेरस कधी गं?’ आपली पत्नी जमेल तशी उत्तरं देत असते.

खिशात क्रेडिट कार्ड आहे. बोनस झालाय की नाही, हेही कुणी विचारत नाही. सगळं ऑनलाइन मिळतं. न राहवून तो शेवटी पोराला म्हणाला, ‘‘चल, सायकल घेऊ तुला!’’

‘‘गिअरवाली?’’ पोरानं विचारलं. त्यानं हसून मान डोलावली. त्याच क्षणी एक प्लास्टिकचं अदृश्य फुलपाखरू त्याच्याभोवती झमझमत उडालं...

प्लास्टिकचं फुलपाखरू पारदर्शक असतं. सहजासहजी नाही दिसत. ते तुम्हा-आम्हाला गवसावं, हीच इच्छा.

दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संबंधित बातम्या