कथा एका अरण्याची…!

-
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

संपादकीय

पर्यटक म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या प्रत्येकाच्या ‘नॉट टू बी मिस्ड्’च्या यादीत उत्तर ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँडमधल्या ग्रेट बॅरियर रिफ मरीन पार्कचा समावेश असतोच असतो. किंबहुना पृथ्वीवरच्या सात निसर्गनिर्मित आश्चर्यांपैकी एक असलेल्या ग्रेट बॅरियर रिफला भेट दिल्याशिवाय तुमची ऑस्ट्रेलियाची सफर पूर्ण होऊच शकत नाही, असंच समजलं जातं. या ‘नॉट टू बी मिस्ड्’ ग्रेट बॅरियर रिफला लागूनच ऑस्ट्रेलियातलं आणखी एक जागतिक वारसा स्थळ आहे. डेनट्री वर्षावन. वर्षाकाठी चारएक लाख पर्यटक या उष्णकटीबंधीय वर्षावनाला भेट देत असतात.

एकोणीसाव्या शतकातला ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ छायाचित्रकार रिचर्ड डेनट्रीला अजरामर करणारं हे वर्षावन अरण्यप्रेमींच्या दृष्टीने ‘खास’ आहे, कारण हे जगातलं सर्वात जुनं वर्षावन आहे. संशोधकांनी निश्चित केलेलं या अरण्याचं वय आहे, एकशेऐंशी दशलक्ष, म्हणजे अठरा कोटी वर्षे.  निसर्गरम्य समुद्र किनारा लाभलेलं हे अरण्य गेल्या महिन्यात तिथल्या मूळच्या इस्टर्न कुकु यालांजी जमातीच्या लोकांना परत करण्यात आलं. ब्लूमफिल्ड नावाच्या छोटेखानी गावात झालेल्या एका कार्यक्रमात अरण्याची मालकी ‘परंपरागत मालकां’ना परत करण्यात आली. इस्टर्न कुकु यालांजी आणि क्वीन्सलँडच्या सरकारदरम्यान या संदर्भात झालेल्या एक कराराचं वर्णन आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ‘ऐतिहासिक’ अशा शब्दात केलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या उलूरू आणि काकाडूसारख्या  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या ऑस्ट्रेलियन लँडमार्कप्रमाणेच पारंपरिक रहिवासी आता डेनट्री अरण्याबरोबरच न्गाल्बा बुबल, कालकाजाका आणि होप आयलंड नॅशनल पार्कचेही पालक झाले आहेत. दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त भूभागावर पसरलेल्या या सगळ्या पर्यटनस्थळांच्या देखभालीत इस्टर्न कुकु यालांजी आता क्वीन्सलँड सरकारचे भागीदार असतील.

प्राणी, पक्षी, सरीसृपांच्या तीन हजारांपेक्षा जास्त प्रजातींचे वास्तव्य असणाऱ्या अरण्याच्या व्यवस्थापनातली भागीदारी ही जगातल्या एका सर्वात जुन्या संस्कृतीचे वारस असणाऱ्या इस्टर्न कुकु यालांजी लोकांसाठी मोठी संधी आहे, पण या संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी आता आम्हाला व्यवसाय व्यवस्थापन, आदरातिथ्य उद्योग, पर्यटन अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर खूप काम करावे लागणार आहे, असं युनेस्को इंडिजिनस पिपल्स् फोरम फॉर वर्ल्ड हेरिटेजच्या प्रमुख क्रिसी ग्रांट यांनी म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियातल्या निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या गटांनीही या कराराचे स्वागत केले आहे. क्वीन्सलँड कॉन्झर्व्हेशन काउन्सिलचे सदस्य अन्ड्र्यू पिकॉन यांच्या मते या परिसराचे नैसर्गिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्याचा हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे.

पृथ्वीवरचं सगळ्यात जुनं म्हणून गणलं जाणारं डेनट्री वर्षावन तिथल्या जैवविविधतेमुळे महत्त्वाचं ठरतंच, पण ते जगातले आकाराने सगळ्‍यात मोठं सखल भागातलं वर्षावनही आहे, आणि या अरण्याने ऑस्ट्रेलियाच्या त्या भागातलं पावसाचं तानमानही सांभाळलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या एकूण वन्यजीवांपैकी सर्वाधिक वन्यजीव या अरण्यात आहेत, आणि त्यातले काही प्रदेशनिष्ठ म्हणजे जगाच्या फक्त त्याच भागात आढळणारे आहेत. मात्र असं असलं तरी जगभरातल्या अरण्यांना असणारे धोके डेनट्री समोरही आहेत. वृक्षतोड, खाणकाम यांसारख्या प्रश्नांना तोंड देणाऱ्या या वर्षावनासमोर पर्यटकांची वाढती संख्या हादेखील एक मोठा प्रश्न आहे. या वर्षावनातल्या प्राण्यांच्या दोनशे प्रजाती आत्ताच धोकादायक प्रजातींच्या यादीत आहेत. यामुळेच क्वीन्सलँडचं सरकार आणि डेनट्री अरण्यातले स्थानिक लोक यांच्यात झालेला व्यवस्थापनातला भागीदारीचा करार, हा या सगळ्या गोष्टीतला कळीचा मुद्दा ठरू शकतो. आणि म्हणूनच कदाचित भागीदारीच्या कल्पनेसोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांच्या चौकटी यांच्यामुळे स्थानिकांच्या सहभागाने वनव्यवस्थापनाच्या मूळ विचाराला आणखी काही नवे पैलू जोडले जातील, अशी आशा करायला हरकत नाही.

संबंधित बातम्या