संवर्धन आणि ब्लॅक रॉबिन  

-
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

संपादकीय

चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. न्यू झीलंडमधील निसर्गसंवर्धन तज्ज्ञ डॉन मेर्टन एका विशेष मोहिमेवर होते. प्रशांत महासागराच्या अथांगपणात हरवून गेलेल्या चॅथम बेटांच्या समूहातल्या लिटल मँगेरे बेटावर जवळजवळ दोनशे मिटर उंचीच्या उभ्या कड्यावर चढून डॉन मुठीएवढ्या एका छोट्या पक्ष्याला शोधत होते.

स्थानिक मारिओरी भाषेत ‘काकारुइआ’ अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या न्यू झीलंडमधल्या ब्लॅक रॉबिन (Petroica traversi) पक्ष्याने डॉन सारख्या निसर्ग संवर्धनाची काळजी करणाऱ्यांची झोप उडविली होती. १९७६मध्ये पृथ्वीच्या पाठीवर फक्त सात काकारुइआ उरले होते. तीन वर्षांनी ब्लॅक रॉबिनना वाचविण्याची मोहीम सुरू झाली त्यावेळी ही संख्या पाचावर आली होती आणि त्यातही फक्त एकच जोडी प्रजननक्षम होती.

या परिस्थितीत मेर्टन आणि वाइल्डलाइफ सर्व्हिसमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. ‘ओल्ड यलो’ आणि ‘ओल्ड ब्लू’ या शिल्लक असलेल्या एकमेव प्रजननक्षम जोडीने घातलेल्या अंड्यांपैकी काही अंडी अन्य पक्ष्यांच्या घरट्यांत ठेवून पिल्लं जगविण्याचा! हा खरं तर जुगारच होता. पण मेर्टननी तो खेळायचं ठरवलं.

निसर्गातला एक जीव नष्ट होण्यापासून वाचवायचा तर होताच, पण काकारुइआंना स्थानिकांच्या संस्कृतीतही महत्त्वाचं स्थान असल्याने या मोहिमेला एक सांस्कृतिक पदरही होता.

मेर्टनना साथ मिळाली ती वटवट्यांच्या कुलाशी नातं सांगणाऱ्या लिटल टॉमटीट पक्ष्यांची. लिटल मँगेरेवरील अंडी मँगेरेवरच्या लिटल टॉमटीट पक्ष्यांच्या घरट्यात अंडी नेऊन, तिथून पिल्लं पुन्हा लिटल मँगेरेवर आणण्याचा सव्यापसव्य टाळण्यासाठी मँगेरेवरच काकारुइआंची एक वस्ती वसवावी असं ठरलं. इथून सुरू झाली जगातली पक्षी संवर्धनाची एक यशकथा.

मुळातच पेट्रोइका कुलातल्या काकारुइआंचे अस्तित्व प्रशांत महासागराल्या चॅथम, पिट, रंगित्रा, मँगेरे आणि लिटल मँगेरे या पाच बेटांपुरतेच सीमित होते. आणि त्यांचे हे एन्डेमिक- एका विशिष्ट भूभागापुरतेच मर्यादित- असणे हे त्यांचे वैशिष्ट्यच एका अर्थाने त्यांच्या मुळावरही उठल्या सारखे होते; कारण या पक्ष्यांचे विशिष्ट अधिवास, खाण्याच्या सवयी, नैसर्गिक शत्रू नसल्याने विकसित न झालेल्या स्वसंरक्षणाच्या प्रेरणा आणि असंख्य पिढ्यांच्या इनब्रिडिंगमुळे निर्माण झालेल्या जनुकीय समस्यांमुळे त्यांच्या प्रजोत्पादनाचा वेग मंदावला होता. न्यू झीलंडच्या संवर्धन विभागाच्या एका अहवालानुसार त्यात भर पडली मानवी अतिक्रमणाची. माणसाबरोबर आलेले उंदीर, घुशी आणि मांजरांनी काकारुइआवर आणखी एक संकट आणलं. शिवाय आक्रसत्या अधिवासाची टांगती तलवार होतीच.

पण मेर्टन यांच्या प्रयोगामुळे गेल्या चार दशकांमध्ये काकारुइआंची संख्या पाच वरून अडीचशेवर गेली आहे. हे सगळे ‘ओल्ड यलो’ आणि ‘ओल्ड ब्लू’ या एकाच जोडीचे वंशज आहेत. न्यू झीलंडमध्ये माणसांचा वावर सुरू झाल्यापासून गेल्या हजार वर्षांमध्ये चाळीसएक स्थानिक प्रजाती नष्ट झाल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्वभूमीवर लिटल मँगेरेबरोबरच जवळपासच्या आणखी काही बेटांवरही काकारुइआंना वसविण्यातही वाइल्डलाइफ सर्व्हिसेसना यश आलं, ही देखील या यशकथेची एक जमेची बाजू.

पण लुप्त होण्याच्या काठावरून परतलेल्या आणि संवर्धनातला सर्वात यशस्वी प्रयोग म्हणून गणला गेलेल्या काकारुइआंची ही गोष्ट इथे संपत नाही. काकारुइआंची संख्या वाढत नाहीये, उलट ती काहीशी घसरते आहे, असं काही महिन्यांपासून वाइल्डलाइफ सर्व्हिसेसमधल्या तज्ज्ञांच्या लक्षात येतं आहे. क्रांती सारखंच यशही बहुधा आपल्या पिलांना खात असावं. मँगेरे बेटावरच्या काकारुइआंच्या वस्तीत आता फक्त तीसच पक्षी उरले आहेत. वाइल्डलाइफ सर्व्हिसेसच्या तज्ज्ञांनी आता पुन्हा कंबर कसली आहे.

माणसाने मांडलेल्या विकासाच्या खेळात आतापर्यंत कितीतरी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सरीसृपांच्या, माशांच्या, कीटकांच्या प्रजाती कायमच्या संपून गेल्या आहेत. गेल्या काही दशकांमध्ये वन्यजीव संवर्धनाचे प्रयत्न अधिक डोळसपणे होत आहेत. भारतातले वाघ, एकशिंगी गेंडे यांच्यासह काही प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविण्यात आपल्याला यशही आलं आहे. जगभरातल्या संवर्धनाच्या अशा अनेक यशकथा सांगता येतात. पण न्यू झीलंडमधल्या ब्लॅक रॉबिनची संवर्धन कथा पुन्हा एकदा एका चिंताजनक वळणावर आल्याने अशी प्रयत्नांच्या मर्यादा एका बाजूला स्पष्ट झाल्या आहेत की काय, याचेही उत्तर आता निसर्ग संवर्धनाविषयी आस्था असणाऱ्यांना शोधावे लागेल.

संबंधित बातम्या