काळजी हवीच

-
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

संपादकीय

पश्चिम युरोप पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडतो आहे. ऑस्ट्रिया, द नेदरलँड्स आणि पश्चिम युरोपातल्या अन्य काही देशांमधून येणाऱ्या गेल्या काही दिवसांतल्या बातम्या पाहता हे सारे देश पुन्हा लॉकडाउन, नव्या बंधनांच्या विळख्यात अडकताहेत असं दिसतं आहे. ऑस्ट्रियाने तर गेल्या आठवड्यात पुन्हा कडक लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. द नेदरलँड्समध्ये लस न घेतलेल्या नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत, आणि त्या सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. युरोपातल्या अलीकडच्या घटनांनी ब्रिटन आणि अमेरिकेतल्याही आरोग्य तज्ज्ञांचीही काळजी वाढविली आहे. युरोपातला मृत्युदर वाढेल असाही इशारा जागतिक आरोग्य संघटनेने कालपरवाच दिला आहे. पूर्वेकडेही दक्षिण कोरियासारखा देश नव्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येला तोंड देतो आहे.

या पार्श्वभूमीवर होत असलेले कोरोनाच्या परिणामांचे अभ्यास आणि त्यांचे निष्कर्ष अस्वस्थ करणारे आहेत. त्यातही सर्वाधिक नुकसान झालंय ते स्त्रिया आणि मुलांचं. रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालाने ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. हे जगभर घडलंय, असं इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अॅण्ड रेड क्रिसेंट सोसायटीज्‌चा (आयएफआरसी) हा अहवाल सांगतो. कोरोनाच्या साथीने जगातल्या अनेक उद्योगांना मोठा फटका दिला आहे.

कोविडमुळे जगण्यावर झालेल्या परिणामांबाबत विविध मुद्दे अधोरेखित करणारे अभ्यास याआधीही झाले आहेत. घरूनच काम, मुलांच्या शाळाही घरूनच, अशा परिस्थितीत अंतिमतः घरातल्या बाईवरचा वाढलेला ताण यातल्या अनेकांनी ठळकपणे दाखवला. कुटुंबातली मिळवती व्यक्ती कोरोनाने ओढून नेल्यानंतर मागे राहिलेल्यांसाठी तीव्र होणाऱ्या जगण्याचा संघर्षाचे चटके जगभरातल्या असंख्यजणांना अजून कितीतरी काळ सोसायचे आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर युरोपातल्या नव्या लाटेकडे, विषाणूचे म्युटेशन होण्याच्या शक्यतेकडे, त्यातून येऊ शकणाऱ्या धोक्याकडे आणि सध्या आजूबाजूला जाणवणाऱ्या वैद्यकीय सुरक्षेविषयीच्या बेफिकीरीकडे पाहावे लागेल. तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला फारसा नाही, आपल्याकडची परिस्थिती जगातल्या इतर अनेक भागांच्या तुलनेत चांगली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मृत्युदर कमी आहे, ह्या सर्व बातम्या चांगल्याच आहेत; दिलासा देणाऱ्या आहेत यात शंकाच नाही. पण या सगळ्या वाक्यांमधल्या ‘फारसा’, ‘तुलनेत’, ‘आटोक्यात’, ‘कमी’ या शब्दांकडे आपले दुर्लक्षच होते आहे की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आजूबाजूला आहे.

लॉकडाउन, ठाणबंदी हे कायमस्वरूपी उपाय नाहीत हे जगभरातले वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक विषयांतले तज्ज्ञ सांगत होतेच. उपायच नसल्यामुळे सगळ्या जगाला एक मोठा काळ स्वतःला घरात कोंडून घ्यावं लागलं. त्या अठरा –एकोणीस महिन्यांच्या काळाने आपल्याला असंख्य गोष्टी शिकवल्या आणि कोरोना विषाणूबरोबर पुढचं आयुष्य जगताना आता आपल्याला आपल्या जीवनशैलीत खूप सारे बदल करावे लागतील, असेही हे तज्ज्ञ आपल्याला सांगत होते.

पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीसह जगात अनेक ठिकाणी नजर टाकली तरी आपल्या हाडीमाशी खिळलेल्या बऱ्याच सवयी बदलण्यास आपल्याला कोरोनाची, आपण सगळ्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वी जीव मुठीत धरून अनुभवलेली, भीतीही भाग पाडू शकत नाही, असंच चित्र आहे.

अर्थव्यवस्थेची चाकं फिरायला हवीतच. त्यासाठी कामधंदा केला पाहिजे, घराबाहेर पडलं पाहिजे, पण त्यासाठी स्वतःची आणि इतरांचीही आरोग्यसुरक्षा पणाला लावण्याचं काहीच कारण नाही. अगदी साधा मुद्दा आहे, मास्क वापरण्याचा. जवळच्या चौकात, कोपऱ्यावर (मास्क लावून) सहज उभे राहिलात तरी मास्कबाबतची सार्वत्रिक बेफिकीरी लक्षात येईल. दाखवायला मास्क सगळ्यांकडेच असतो पण अनेकांच्या बाबतीत तो हनुवटीपासून गळ्यापर्यंत कुठेही असतो, किंवा एकाच कानाला लोंबकळत असतो.

रुग्णसंख्या घटते आहे, हे खरे आहे. पण वर म्हटलं तसं या वाक्यातले ‘घटते आहे’ हे शब्द नजरेआड करून कसे चालतील? आपल्याला लशीचा बूस्टर डोस कदाचित लगेच लागणार नाही, असं काही वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे, पण म्हणून लशींचा पहिला आणि दुसरा डोस घेण्याचा वेग मंदावून कसा चालेल? 

तिसऱ्या लाटेविषयी सजगता बाळगायला हवी, हे मत केवळ शिळोप्याच्या गप्पांमध्ये नसावे एवढेच.

संबंधित बातम्या