इच्छाशक्ती हवी

-
सोमवार, 6 डिसेंबर 2021

संपादकीय

बार्सिलोना हे स्पेनमधलं एक छोटसं शहर. स्पेनमधल्या कॅटलोनिया प्रांताची राजधानी. क्षेत्रफळाच्या हिशेबाने आता आकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या पुण्यात पाच बार्सिलोना मावतील इतकं लहानसं शहर आहे हे. लोकसंख्या मात्र पुण्याच्या निम्म्याहून थोडी कमी. आपल्याला बार्सिलोनाचा परिचय असतो मुख्यतः दोन गोष्टींमुळे. एक म्हणजे जगभरातल्या असंख्य फुटबॉलप्रेमींच्या पसंतीक्रमात कायमच वरचे स्थान मिळवणारा बार्सिलोना फुटबॉल क्लब आणि दुसरं म्हणजे एकेकाळी पुण्याची जशी ‘सायकलींचे शहर’म्हणून ख्याती होती, तसे बार्सिलोना आजही सायकलींचे शहर आहे. कला आणि वास्तूंसाठीही हे शहर प्रसिद्ध आहे.

गेल्या महिन्याभरात दोन कारणांनी बार्सिलोनानी लक्ष वेधून घेतलं. सांडपाण्यापासून मिळणाऱ्या जैववायूचा शहर वाहतुकीच्या बससाठी इंधन म्हणून वापर आणि शालेय मुलांची ‘सायकल बस’ ही ती दोन्ही कारणं  शहरी वाहतूक आणि प्रदूषणाशी निगडित असल्याने आपल्या दृष्टीने जवळचीच. हवामान बदलावर या महिन्याच्या सुरुवातीला पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कर्ब उत्सर्जनावर प्रचंड चर्चा झाली. तापमानवाढ रोखण्यासाठी कर्ब उत्सर्जन एका विशिष्ट पातळीवर रोखायला हवं, या मुद्द्यावर जगाचं एकमत असलं तरी त्याबाबतचे अनेक तिढे अजूनही सुटलेले नाहीत. एकाबाजूला ऊर्जेचा वापर आणि म्हणून ऊर्जेची गरज वाढत असताना दुसरीकडे ऊर्जेसाठी जाळल्या जाणाऱ्या कोळशाचा तापमानावर होणारा परिणाम रोखण्याचे आव्हान जगासमोर आहे. जमिनीच्या पोटातले कोळशाचे साठे संपत चालले आहेत, आणि अतिरिक्त कोळशासाठी अतिरेकी वृक्षतोड करून आपण संकटाला निमंत्रण देतो आहोत, हे मुद्दे आहेतच. हे आव्हान पेलण्यासाठी अपारंपरिक स्रोतांमधून ऊर्जा निर्मिती, त्या ऊर्जेच्या व्यय-लाभाचे गुणोत्तर हे पेचदेखील प्राधान्याने सोडवावे लागणार आहेत. 

या पार्श्वभूमीवर बार्सिलोनात शहर वाहतूक करणाऱ्या ट्रान्स्पोर्ट मेट्रोपॉलिटन्स् डी बार्सिलोना ह्या कंपनीने सांडपाणी स्वच्छ करत असताना पाण्यावर जो साका जमतो त्यापासून मिळणाऱ्या बायोमिथेनवर शहरातल्या बस चालवण्याचा प्रयत्न आरंभला आहे. सार्वजनिक, आणि खासगीही, वाहतुकीसाठी पर्यायी आणि प्रदूषणात कमी प्रमाणात भर घालणारी इंधने वापरण्याचे प्रयत्न जगभर सुरू असले तरी वीज हा पेट्रोल, डिझेलला एकमेव पर्याय असू शकत नाही, कारण त्यासाठी फिरून कोळसा जाळण्यावरच अवलंबून राहावे लागणार, हे सत्यही समोर उभे ठाकल्याने अन्य अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरावर अनेक प्रयोग जगभर सुरू आहेत.

बायोमिथेन किंवा तत्सम नैसर्गिक वायूंच्या वापराची कल्पना नवीन नाही. आपल्याकडे तेलंगणा सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा महामंडळाने अशा पद्धतीचा एक प्रयत्न करून पाहाण्याविषयी आठ-दहा महिन्यांपूर्वी अहवाल तयार करायला घेतला होता. अशा प्रकारे दररोज चाळीस दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा पहिला प्रकल्प आपण हरिद्वार येथे बांधलाही आहे.  
कचरा अथवा सांडपाण्यापासून वायू मिळवून त्याचा इंधन म्हणून वापर करण्यावर काही अभ्यासकांचे आक्षेप आहेत. त्यांच्या मते हा काही शाश्वत ऊर्जास्रोत असू शकत नाही, कारण मग त्यासाठी रोज ‘पुरेसा’ कचरा किंवा सांडपाणी तयार होईल, याचीही ‘काळजी घ्यावी लागेल’. ह्या आक्षेपात काही तथ्य असले तरी सांडपाण्यावर आणि कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा अधिकाधिक पुनर्वापर करण्याची किंवा योग्य त्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता टाळता येण्याजोगी नाही. विशेषतः पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता लक्षावधी लिटर सांडपाणी दररोज नद्या, नाल्यांपासून ते समुद्रांपर्यंत वाहू देणे कोणत्याच अर्थाने, कोणासाठीही श्रेयस्कर नाहीच.  महाराष्ट्रातल्या सांडपाण्याच्या परिस्थितीचा विचार करायचा तर आकडेवारीचे जंजाळ अतर्क्य आहे. एका अंदाजानुसार राज्यात दररोज साधारण ९,१०७ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. सध्या त्यातल्या ६,८९० दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया करण्याची आपली क्षमता आहे. त्यातल्या ६,३६६ दशलक्ष लिटर एवढ्या प्रक्रिया क्षमतेचा वापर अपेक्षित असला तरी ४,२४२ दशलक्ष लिटर एवढीच क्षमता आपल्याला प्रत्यक्ष वापरता येते, आणि प्रत्यक्षात आपण प्रक्रिया करतो ती जेमतेम २,१२४ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर. या सगळ्या आकडेवारीचा एक दृश्य परिणाम म्हणजे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात प्रदूषित नद्यांची संख्या सर्वाधिक आहे.

बार्सिलोनाप्रमाणे एखाद्या शहरातल्या बस चालवता येतील एवढा जैववायू आपणही सांडपाण्यापासून मिळवू शकू की नाही याविषयी सध्यातरी अंदाजच बांधता येतील. मात्र पाणी, जमीन आणि हवेचे प्रदूषण आणि इंधनाच्या किमतींपासून ते उपलब्धतेपर्यंत जे प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहेत त्याच्या सोडवणुकीसाठी लागणाऱ्या सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीसाठी आग्रही राहाणे मात्र शक्य आहे.

संबंधित बातम्या