विषाणूछाया
संपादकीय
दाटून आलेलं मळभ दूर होऊन आभाळ स्वच्छ होतंय असं वाटे वाटेपर्यंत कुठेतरी दबा धरून बसलेली कृष्णमेघांची आणखी एक फौज चाल करून यावी आणि पुन्हा पालवू लागलेल्या आशा त्या उन्मत्त मेघांच्या आक्रमणाने पुन्हा कोमेजून जाण्याच्या भीतीने काळजाचा थरकाप व्हावा, अशा काहीशा परिस्थितीत भवताल झाकोळून गेला आहे. कोरोना नावाच्या माहिती असलेल्या विषाणूच्या कोविड-१९, डेल्टा या अपरिचित अवतारांच्या मगरमिठीतून जग बाहेर पडून सर्वकाही आलबेल होऊ शकते, असे संकेत मिळत असतानाच तीन आठवड्यांपूर्वी सार्स-कोव्ह-2चा B.1.1.529, ओमायक्रॉन किंवा ओमिक्रॉन नावाचा आणखी एक अवतार आता जगाला वेढतो आहे.
खूप जणांना अंधाराची भीती वाटते. एका विशिष्ट वयापर्यंत ती असणं हे काही फार वावगं नाही, पण त्यानंतरही ती राहिली तर तो मनाचा एक आजार मानला जातो. मानसशास्त्राच्या भाषेत स्कोटोफोबिया. अंधाराची ही भीती पिढ्यांकडून पिढ्यांकडे संक्रमित होत जाते, असं म्हणतात. म्हणजे ‘अंधाराला घाबरायला हवं,’ असं शिकवावं लागत नाही, ते घडतंच. काही तज्ज्ञांच्या मते अंधाराची भीती ही अज्ञाताच्या आणि अनिश्चिततेच्या पोटी आलेली असते. तिथे काय आहे/ असेल, याची नक्की कल्पना नसल्यामुळे अंधाराची भीती जन्म घेत असते. ओमायक्रॉन किंवा ओमिक्रॉन हा सगळ्या जगासाठी त्या अज्ञाताच्या भीतीचा ताजा अवतार आहे.
दक्षिण आफ्रिकेतल्या शास्त्रज्ञांना गेल्या महिन्याच्या शेवटाला हे प्रकरण पहिल्यांदा सापडलं, आणि त्यानंतर जगभरातल्या सरकारांनी महासाथीशी लढण्याच्या रणनीतीचा पुनर्विचार सुरू केला. आजही संपूर्ण शास्त्रीय जग विषाणूच्या या नव्या अवताराची उकल करण्याच्या प्रयत्नात आहे. ओमायक्रॉनबद्दल ठाम विधान अजून कोणी केलेलं नाही. मात्र, कोविड-१९ किंवा त्यानंतरच्या डेल्टा नावाच्या त्याच्या उत्परिवर्तीत रूपापेक्षा या विषाणूमुळे होणारी मनुष्यहानी कमी असली तरी या ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असेल, यावर सध्या तज्ज्ञांचं एकमत दिसतंय. कोरोना विषाणूच्या या अवतारावर सध्या उपलब्ध असलेल्या लशींचा नेमका काय परिणाम होईल, याविषयीही मतमतांतरे वाचायला मिळताहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्याच दिवशी ओमायक्रॉन विषाणू ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’, चिंताजनक असल्याचं जाहीर केलं, आणि त्यानंतरच्या गेल्या तीन आठवड्यांमध्ये ब्रिटन आणि युरोपातल्या अनेक राष्ट्रांसह डझनभर देशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. ओमायक्रॉनच्या बातम्यांनंतर अनेक ठिकाणी शेअर बाजार कोसळले, युरोपात आणि अन्य काही देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावर आणि रोजच्या व्यवहारांवर पुन्हा निर्बंध आणायला सुरुवात केली. कोरोना विषाणूच्या या नव्या संकटाचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर काही विपरीत परिणाम होईल का, आणि होणार असेल तर तो किती गंभीर असेल, याच्याही चर्चा आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून विविध स्तरांवर सुरू झाल्या आहेत.
वृत्तपत्रीय भाषेत बोलायचं तर ओमायक्रॉन सध्या ‘बातम्यांत’ आहे, किंवा नव्या माध्यमांच्या भाषेत ‘ट्रेंडिंग’मध्ये आहे. पण, सध्या आजूबाजूला ओमायक्रॉनबद्दल जी काही माहिती आहे, त्याचा सगळ्याचा फक्त एकच अर्थ असू शकतो आणि तो म्हणजे विषाणूच्या या नव्या अवताराबद्दल आपल्याला नीटशी काहीही माहिती नाही; तस्मात बेसावध, बेफिकीर, गाफील, निष्काळजी, बेपर्वा, बेदरकार, सुस्त राहून चालणार नाही.
पुनरुक्तीचा धोका पत्करूनदेखील ‘अजूनही काळजी हवीच’ हेच पुन्हा नव्याने अधोरेखित करण्याची गरज आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग जर अधिक असेल तर ती काळजी वाढविणारी बाब आहे, कारण पसरणारा विषाणू आपल्याला पुन्हा आजाराशी निगडित असणाऱ्या अनेक नकोशा बाबींच्या गर्तेत ढकलू शकतो. अर्थचक्र आता कुठे रूळावर येऊ पाहतं आहे, त्याला आता पुन्हा खीळ बसेल असं काहीही करणं आता समाज म्हणून आपल्याला परवडणारं नाही.
घरातला एक माणूस बाधित होतो म्हणजे काय, याचा अर्थ आपण गेल्या दीड वर्षांत अनुभवला आहे. आता पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकायचं का याचा विचार समाज आणि समाजातला एक घटक या दोन्ही पातळ्यांवर आपल्याला करावा लागणार आहे. कोरोना विषाणूचा हल्ला झाल्यानंतर संपूर्ण जग जगण्यासाठी स्वीकाराव्या लागणाऱ्या संभाव्य बदलांची, ‘न्यू नॉर्मल’ची, चर्चा करीत होतं. आज ती चर्चा संदर्भ हरवून बसल्यासारखी वाटते आहे.
ओमायक्रॉनच्या भोवतीचा स्पष्ट आणि पुरेशा माहितीचा अभाव लक्षात घेता मास्क, गर्दी टाळणे आणि लस याच त्रिसूत्रीवर सध्यातरी विसंबून राहायला लागेल, असंच सगळे तज्ज्ञ सांगताहेत. त्यांच्या या सांगण्याचं काय करायचं ते, आजवर ‘अनुभवांतून शिकणारा प्राणी’ अशा व्याख्येत बसण्याचा खटाटोप करणाऱ्या, आपल्यापैकी प्रत्येकाला ठरवावे लागेल.