घरातून की ऑफिसातून...

-
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

संपादकीय

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरातल्या अनेक उद्योगांची अवस्था शेक्सपिअरच्या हॅम्लेटसारखी झाली आहे. हॅम्लेटसमोर ‘करावे की करू नये’ असा प्रश्न होता; आज प्रगत अशा माहिती-तंत्रज्ञान उद्योगाशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांपासून अन्यही काही क्षेत्रांतल्या कंपन्यांसमोर काम घरूनच करावे की लोकांना ऑफिसात बोलवावे असा प्रश्न उभा ठाकला आहे.

जगभरातल्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये या संदर्भात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या बातम्या पाहिल्या तर बरंचसं जग, ‘वर्क फ्रॉम होम’ची संकल्पना आणखी काही काळ सुरूच ठेवावी, अशा मतापर्यंत पोचल्याचे जाणवते. विशेषतः ओमायक्रॉनच्या हल्ल्यानंतर कर्मचाऱ्यांना ‘चला, आता या पुन्हा ऑफिसला,’ असं म्हणण्याच्या तयारीत असणाऱ्या अनेक कंपन्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारल्याचे दिसते आहे. या मुद्द्याची दुसरी बाजू म्हणजे दीड वर्षांपेक्षाही जास्त काळ घरातून काम केल्यानंतर आता पुन्हा ऑफिसात जायचे अनेक मंडळींच्याही जिवावर आल्याचे दिसते. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘वर्किंग फ्रॉम वर्क इज हार्डर दॅन इट साउन्डस्’ ह्या लेखात ऑफिसात परतणाऱ्या मंडळींना जाणवणाऱ्या ‘नव्या अडचणीं’बद्दल चर्चा केली आहे. यातल्या सगळ्याच मुद्द्यांशी सगळेच सहमत होतील असं नाही, पण ‘न्यू नॉर्मल’ म्हणून स्वीकारलेले बदलच ‘नॉर्मल’ जगण्याचा भाग होत असताना पुन्हा त्या दोन वर्षांखालच्या वर्क अॅटमॉस्फिअरकडे परत जाण्याबाबत अनेकविध चर्चा सध्या आपल्या सगळ्यांच्याच आजूबाजूला झडताहेत, एवढं मात्र खरं.

काही दिवसांपूर्वी एका आयटीयन तरुणीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. कोरोना विषाणूमुळे अंगावर आदळलेले बरेचसे निर्बंध त्यावेळी सैलावायला लागले होते. तिच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही मुलगी व्हिडिओ पाहणाऱ्यांना त्या दिवशीच्या सकाळीच तिच्यावर गुदरलेल्या भयानक प्रसंगाविषयी सांगते... ‘मी सकाळी नेहमीप्रमाणे लॉगइन झाले तर ‘एचआर’चा मेल येऊन पडला होता… ‘पुढच्या आठवड्यापासून आपल्याला रोटेशनने ऑफिसला यायचंय,’ असं त्या मेलमध्ये म्हटलं होतं. कसं रिअॅक्ट व्हावं, मला कळेचना. ‘कशासाठी?’ एवढा एकच प्रश्न माझ्यासमोर उभा होता...’

अनेक क्षेत्रांतली अनेकविध कामं करणारी माणसं आपापल्या घरांतूनच त्यांची त्यांची कामं करतील, असं सांगणाऱ्या कोणावरही मार्च २०२०पूर्वी कोणीही विश्वास ठेवला नसता. पण अत्यंत वेगाने जगाला जखडून टाकणाऱ्या विषाणूने अत्यंत अल्पकाळात कामाच्या पद्धतीतच बदल करणे जगाला भाग पाडलं. टाळेबंदीमुळे सुरुवातीला गांगरून गेलेल्या उद्योग, व्यवसायांनी तंत्रज्ञानाची कास धरली; अनेक क्षेत्रांमध्ये अडखळत, क्वचित चुकत ऑनलाइन काम सुरू झालं. वैद्यकीय सेवांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळल्या तर ज्यांना ऑनलाइन जाणे शक्यच नव्हते त्यांना थांबावं लागलं. हे जगभर घडलं. मग लस उपलब्ध झाली. कोरोनाचा विळखा सैलावला, तसं सगळं जग अर्थचक्राला पुन्हा गती देण्याच्या मागे लागलं. ‘वर्क फ्रॉम होम’, ‘अभ्यास किंवा परीक्षा फ्रॉम होम’ हे शब्द जसे अंगवळणी पडत गेले तशीच जिथे शक्य होती तिथे कामाच्या बाबतीतही ‘हायब्रीड’ ही कल्पना स्वीकारली गेली. लोक आठवड्यातले एकदोन दिवस किंवा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे एखादा आठवडा असे कामाच्या ठिकाणी जाऊन उरलेले दिवस घरातूनच काम करायला लागले.

मधल्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ने घरांच्या पारंपरिक रचना बदलल्या, घरांमध्ये ऑफिसचा, शाळेचा असे ‘कोपरे’ तयार झाले. अनेकांनी अडचणींवर मात करत घरूनच काम करण्याची सवय लावून घेतली, इतर अनेकांनी, नाइलाज म्हणून घरून काम करण्याची सवय लावून घेतली. मग हे सगळं इतकं अंगवळणी पडलं की, अनेकांना ही साथ आटोक्यात येईल, संपूनही जाईल आणि आपल्याला पुन्हा ऑफिसला जावे लागेल हा विचारही करवेनासा झाला. 

स्थळ-काळपरत्वे परिस्थिती वेगवेगळी आहे. आर्थिक विवंचनांना सामोरे जाणाऱ्या काहींनी जागाभाड्याचे खर्च वाचवण्यासाठी ऑफिसच्या जागा सोडून दिल्या, त्यामुळे अनेक छोटे उद्योग आणि त्यातले कामकरी तूर्त तरी ‘वर्क फ्रॉम होम’शरणच आहेत. अनेकांना घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर असे कंटाळवाणे; थकवणारे प्रवास थांबल्याने दिलासा मिळालाय, तर माणसं समोर नसल्याने छोट्या छोट्या कामांतही येणाऱ्या अडचणींमुळे काहींना घरून काम करणं नकोसं झालंय. 

अजूनही जगातल्या बऱ्याचजणांना घरातच बसवणाऱ्या या ‘न्यू नॉर्मल’चे अनेकविध पैलू आहेत. काम कसं मोजायचं? इथंपासून माझ्या जास्तीच्या कामाचं काय? आणि आई आणि बाबाच्या कामाची विभागणी कोण लक्षात घेणार? इथपर्यंतच्या अनेक बाबी गेल्या दीड-दोन वर्षांत पुढे येत गेल्या. लक्षात न आलेल्या काही बाबी अजूनही असतील.

गेल्या महिन्याभरात जगातल्या अनेक राष्ट्रांसमोर नव्याने भीती उभ्या करणाऱ्या ओमायक्रॉनने नव्या वर्षाच्या शुभेच्छा देता-घेताना बरोबर एक नवा प्रश्नही आणलाय - ‘सध्या घरूनच की ऑफिसातून?’

संबंधित बातम्या