तंत्र-जत्रा

-
सोमवार, 10 जानेवारी 2022


संपादकीय

‘द  मोस्ट इन्फ्ल्युएन्शिअल टेक इव्हेन्ट इन द वर्ल्ड’ -जगातला सर्वाधिक दबदबा असणारा तंत्र-महोत्सव -अशी ज्याची जाहिरात केली जाते तो कन्झ्युमर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा (सीटीए) कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीइएस) नुकताच अमेरिकेत लास वेगासमध्ये पार पडला. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ उद्योग क्षेत्रातल्या रथीमहाराथींच्या दृष्टीने हा शो म्हणजे  कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातल्या नावीन्याचे दर्शन घडविणारी आणि नव-उद्यमींच्या नव-कल्पनांना जगाच्या उद्योगमंचावर नेऊन ठेवणारी तंत्र-जत्राच. कोविडच्या महासाथीमुळे दोन वर्षे हा महोत्सव ऑनलाइनच होत होता. यंदा मात्र ओमायक्रॉनचे सावट असूनही ही तंत्र-जत्रा प्रत्यक्ष सहभाग आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींनी भरली होती. सॉफ्टवेअरच्या दुनियेतील मायक्रोसॉफ्ट, गुगल वगैरे दादामंडळी गेल्या बुधवारपासून सुरू झालेल्या जत्रेत प्रत्यक्ष सहभागी झाली नव्हती आणि एरवी चार दिवस चालणाऱ्या या शोचा एक दिवस कमी करून तो तीन दिवसांवर आणला, हे खरं असलं तरी त्यामुळे संयोजकांच्या उत्साहावर फारसा परिणाम झाला नसावा, असं या महोत्सवाबद्दलच्या बातम्यांवरून जाणवतंय. उपलब्ध माहितीनुसार हायपरलिंक इन्फोसिस्टीम या भारतीय कंपनीसह जगभरातल्या तब्बल बावीसशे उद्योजकांनी महोत्सवासाठी प्रत्यक्ष उपस्थितीसाठी नोंदणी केली होती, आणि यात एकशे चाळीसहून अधिक उद्योजक नव्यानेच सहभाग नोंदविणार होते. आपले रोजचे जगणे अधिक सुखकर बनविणाऱ्या कल्पनांवर चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ, अशा शब्दांत सीटीएचे अध्यक्ष आणि सीईओ गॅरी शापिरो यांनी या महोत्सवाचे वर्णन केले आहे.

सध्या सगळ्या जगभर ज्या तंत्रज्ञानाची चर्चा आहे, आणि आपला नजीकचा भविष्यकाळ व्यापून उरणारे फाइव्ह जी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्स यासारखे तंत्रज्ञान स्मार्ट शहरांमधल्या नागरिकांसाठी कशा पद्धतीने वापरले जाईल, जगावर घोंगावणाऱ्या महासाथीच्या आणि हवामान बदलाच्या संकटांमध्ये या तंत्रज्ञानाचा किती वेगवेगळ्या पद्धतींनी उपयोग करून घेता येईल, या अनुषंगाने होणाऱ्या काही सादरीकरणांबरोबरच या तंत्र-जत्रेत जगणं बदलून टाकणाऱ्या स्वयंचलित मोटारी, डिजिटल आरोग्यसेवा, अत्याधुनिक ड्रोनसारखी काही उत्पादने आणि सेवांचे प्रथम सादरीकरण हे यंदाच्या या तंत्र-जत्रेचे आणखी एक वैशिष्ट्य.

हिवाळी आणि उन्हाळी अशा दोन सत्रांत होणाऱ्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोचा गेल्या पंचावन्न वर्षांचा प्रवास हा एका अर्थाने तंत्रज्ञान विकासाचा आणि तंत्रज्ञानाने मानवी आयुष्यात घडवून आणलेल्या बदलांचा इतिहास आहे. 

कन्झ्युमर टेक्नॉलॉजी असोसिएशनने  पहिली तंत्र-जत्रा भरवली ती १९६७मध्ये. पंचावन्न वर्षांपूर्वीच्या त्या तंत्र-जत्रेत सादर झालेलं त्यावेळचं आधुनिक उपकरण होतं पॉकेट रेडिओ आणि इंटिग्रे़टेड सर्किट असणारे टीव्ही सेट. त्यानंतर तीन वर्षांनी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात आणखी एक क्रांती झाली. फिलिप्सनी त्यांचा पहिला घरगुती व्हीसीआर या तंत्र-जत्रेत सादर केला. हा व्हीसीआर प्रत्यक्षात उपलब्ध होईपर्यंत व्हीसीआर हे प्रकरण फक्त टीव्ही स्टेशनांपुरतंच मर्यादित होतं, कारण स्वस्तातला स्वस्त व्हीसीआरही तेव्हा पन्नासएक हजार डॉलरच्या घरात जायचा. फिलिप्सनी तो हजार डॉलरच्याही आत आणून ठेवला. आज अक्षरशः हातात आलेल्या ओटीटी प्लॅटफार्ममुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात झालेल्या प्रचंड बदलाची ती एक नांदी होती. सत्तरीच्या दशकाच्या शेवटी बिल गेट्सनी त्यांच्या अॅपल टूसाठीचा बेसिक कंपायलर पहिल्यांदा सादर केला तो याच तंत्र-जत्रेत. सर्वाधिक खपाचा संगणक म्हणून गिनिज बुकमध्ये नोंद झालेला सी-64 किंवा कमोडोर-64 हा घरगुती वापराचा संगणक जगानी पहिल्यांदा पाहिला तोही इथेच.

ही तंत्र-जत्रा नव्वदीच्या दशकात पोचली तेव्हा कॉम्प्युटर गेमिंगचा उदय होत होता. जॉन मॅडन फुटबॉल १९९०मध्ये सादर केला गेला आणि त्यानंतर दोन वर्षांनी शिकागोत झालेल्या शोवर वर्चस्व होतं ते कॉम्प्युटर गेमचं. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचं अवघं विश्व बदलून टाकणारी अनेक उत्पादनं -आज प्रत्येक खिशात असणाऱ्या मेमरी स्टीक, आता कालबाह्य होत चाललेल्या डीव्हीडी, अॅडोबचं फोटोशॉप, दूरचित्रवाणी संचांचे अनेक अवतार याच तंत्र-जत्रेतून जगासमोर ठेवले गेले. 

एका अर्थानी तंत्रज्ञानाचं त्या त्या काळात जगाशी असणारं नातं उलगडणाऱ्या ह्या जत्रेत गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनं आणि इंटरनेट सिक्युरिटी क्षेत्रातल्या नव-उद्यमींचाही वावर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांतला आरोग्य आणीबाणीचा काळ पाहता, यंदाच्या नव्या उत्पादनांच्या यादीत आरोग्याशी निगडित अनेक उत्पादने आहेत. त्याचबरोबर भर आहे तो स्मार्ट, सस्टेनेबल आणि रेझिलियंट टेक्नॉलॉजीवर.

उद्याच्या गर्भात कोणते बदल असू शकतात याचा वेध घेताना, आज जग कुठे चाललं आहे, हे जोखण्याचं याचं एक परिमाण आपल्यासमोर ठेवणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून जगभरात वेगवेगळ्यावेळी होणाऱ्या अशा तंत्र-उद्योग-जत्रांकडे पाहणं क्रमप्राप्त ठरतं.

संबंधित बातम्या