प्रश्नसाखळी...

-
सोमवार, 17 जानेवारी 2022

संपादकीय

प्रदूषण म्हणजे दहा तोंडांचा राक्षस असतो, असं प्रदूषणाशी लढणारे सगळेचजण नेहमी सांगत असतात. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर प्रदूषणाला तोंड द्यावं लागतंच, पण प्रदूषणाच्या एका मुद्द्याला उत्तर शोधताना, काहीवेळा ते उत्तर आणखी कोणत्या प्रश्नसाखळीला जन्म देईल याचा अंदाज घेऊन उत्तराचा शोध घ्यावा लागतो. मात्र नव्याने सामोऱ्या येणाऱ्या प्रश्नसाखळीला तितक्याच तातडीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारी माणसाची विजिगिषू वृत्तीही त्या प्रश्नसाखळीसोबतच सामोरी येते, हे देखील खरेच. 

विश्वाच्या उत्पत्तीमध्ये आणि चराचराच्या जगण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मूलतत्त्वांना मानवी संस्कृती पंचमहाभूतांच्या स्वरूपात पाहते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या प्रत्येक घटकाचा प्राणिमात्रांच्या जगण्याशी असलेला अन्योन्य संबंध माणसाला कधीच नजरेआड करता आलेला नाही. न उमगलेल्या घटितांचा शोध लावताना माणसाने आजवरच्या प्रवासात या पंचमहाभूतांच्या शक्तीच्या आधारे जगण्याचे अधिकाधिक सोपे आधार शोधले, निर्माण केले. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणसाच्या अस्तित्वाचेच आधार असणारी ही मूलतत्त्वेच गढूळत गेली. याची जाणीव झालेल्या काही मूठभर माणसांनी मग त्या गढूळलेपणावर उत्तरं शोधायला सुरुवात केली, आणि आता अलीकडच्या काळात उत्तरं शोधण्याचा हे प्रयत्न अधिकाधिक सगजपणे होताना दिसताहेत. हवेचं प्रदूषण रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भाने सध्या चर्चेत असणारा एक नवाच मुद्दा नेमकी हीच बाब अधोरेखित करतो.

जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातल्या हवेच्या प्रदूषणाच्या संदर्भाने काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली. ‘लाखो जीव वाचवण्यासाठी’, अशा उपशीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने, हवेचं प्रदूषण हा हवामान बदलाच्या पाठोपाठ माणसाच्या आरोग्याला असणारा सर्वात मोठा धोका आहे असा इशारा दिला आहे.

हवेच्या प्रदूषणाबद्दल वाटणाऱ्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय होत असलेली वीजेवर चालणारी वाहनं ही कल्पना तशी दीड शतकापूर्वीची. अन्य जगाप्रमाणेच भारतातही इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाचे काही प्रयत्न याआधीही झाले. मात्र स्वच्छ इंधनाकडे वळण्याची तातडी आणि वापरकर्त्यांच्याबाजूने विचार करायचा झाल्यास इंधनाचा, देखभालीचा परवडण्याजोगा खर्च यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना आता जगभर पसंती मिळते आहे. आपल्याकडे सरकारनेही अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनखरेदीला प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. एकंदरच एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव आकाशाला भिडत असताना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वापरकर्त्यांना सुखावून जातो आहे, असं चित्र आहे. वाहनउद्योग क्षेत्रातले दिग्गज उत्पादक आता जगातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांसह भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची वेगवेगळी मॉडेल लाँच करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवर सुरू असलेले संशोधन, त्यात होत असलेल्या सुधारणा या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर जनरल मोटर्सने येत्या दहा-बारा वर्षांत पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या त्यांच्या वाहनांची विक्री थांबवली जाईल अशी घोषणा केली आहे. या शतकाच्या चौथ्या दशकात प्रवेश करीत असताना जगात विकली जाणारी दोनतृतीयांश प्रवासी वाहने इलेक्ट्रिक वाहने  असतील, असा ‘ब्लूमबर्ग एनईएफ’चा अंदाज आहे.

या वाहनांना लागणाऱ्या वीजेचा मुद्दा लक्षात घेतला तर अपारंपरिक स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या हरित किंवा स्वच्छ विजेच्या उत्पादनाचा मुद्दाही आता जगाच्या प्राधान्य यादीत आलेला दिसतो. नामीबियासारख्या देशानेही आता अपारंपरिक स्रोतांपासून मिळणाऱ्या विजेच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.

हरित वीज, पेट्रोल पंपांसारखी चार्जिंग स्टेशनांची किंवा जिथे बॅटरी बदलून पुढचा प्रवास सुरू करता येईल अशा ठिकाणांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नांबरोबरच संशोधक सध्या आणखी एका आव्हानाला तोंड देण्यात गुंतले आहेत. प्रश्न आहे तो लिथियम आयन किंवा एलआय बॅटऱ्यांच्या पुनर्वापराचा! इलेक्ट्रिक वाहने अधिक पर्यावरणस्नेही करण्यासाठी ह्या प्रश्नाला शाश्वत आणि कमी खर्चिक उत्तर मिळणे आवश्यक असल्याने जगभरातल्या अनेक प्रयोगशाळा सध्या लिथियम आयन बॅटरीसाठी अधिक कार्यक्षम पुनर्वापर पद्धत विकसित करण्यात गुंतल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराबरोबरच वाढणारी एलआय बॅटऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पर्यावरणस्नेही आणि प्रमाणित मार्ग शोधण्याच्या दिशेने हा प्रवास आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमधल्या बॅटऱ्यांच्या कार्यक्षम पुनर्वापरामुळे प्रश्नसाखळीतील आणखी एका प्रश्नाला उत्तर मिळेल एवढेच नव्हे तर जगभरातल्या इंधन वापराचा आणि जगभरातल्या वाहतुकीचा चेहरा बदलण्याऱ्या प्रयत्नांच्या अर्थकारणाचा विचार करता तो एक महत्त्वाचा टप्पा असेल.

संबंधित बातम्या