विचार तर करूया...

-
सोमवार, 31 जानेवारी 2022

संपादकीय

‘हवामान बदल’, ‘तापमान वाढ’, ‘ओझोनच्या थराला पडणारी खिंडारं’, ‘वितळणारा बर्फ’, ‘समुद्राच्या पाण्याची वाढती पातळी’ वगैरे शब्द कानावर पडायला लागले त्याला आता चाळीसएक वर्षे होऊन गेली आहेत. ‘रिओ परिषद’, ‘क्योटो प्रोटोकॉल’, ‘कार्बन ट्रेडिंग’ हेदेखील याच काळात आपल्या कानावर येऊ लागलेले आणखी काही शब्द.

संयुक्त राष्ट्रसंघाने १९९२मध्ये पहिल्यांदा ‘पर्यावरण आणि विकास’ या विषयावर रिओ-डि-जानिरोमध्ये एक परिषद भरवली होती. या परिषदेत युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी) नावाचा वातावरण बदलावर काम करणारा संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांचा एक गट स्थापन झाला. पाच वर्षांनी जपानमधल्या क्योटो शहरात झालेल्या परिषदेत संपूर्णतः मानवनिर्मित असणाऱ्या हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज मान्य करण्यात आली. जगाने ही गरज जरी मान्य केली असली तरी क्योटो करारानंतरच्या वर्षांमध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने फार काही होऊ शकले नाही. अगदी अलीकडे ग्लास्गोमध्ये झालेल्या हवामान परिषदेमध्येही ह्या सर्व मुद्द्यांचा पुन्हा ऊहापोह घडून आला, त्यानिमित्ताने पुन्हा काही चर्चा झडल्या.

यात निरनिराळ्या पातळ्यांवर या सगळ्या बदलांच्या परिणामांना तोंड देणारे आपण सगळे सामान्य नागरिक कुठे आहोत? या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांच्या आणि हा प्रश्न समजावून घेऊन आपापल्या पातळीवर काही ना काही कृती करणाऱ्या नागरिकांच्या मदतीने शोधण्याच्या दिशेने या नव्या वर्षात काही लेखांचे नियोजन करावे, असा विचार पुढे आला. ‘हवामान बदलः आपण काय करू शकतो?’ हा त्या विषयावरचा पहिला लेख ‘सकाळ साप्ताहिक’च्या गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अंकात आपण वाचला. इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. गुरुदास नूलकर यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये काही मुद्दे आपल्यासमोर ठेवले. ‘सकाळ साप्ताहिक’च्या वाचकांनी या लेखाचे स्वागत केले आहे.

जगभरातली सरकारं या प्रश्नांवर चर्चा करत आहेत, त्यातून आणखी काही नवी धोरणं आखली जातील, कायदेही होतील पण त्याही पलीकडे जाऊन, हवामान बदलाचं संकट आता आपल्या दारात येऊन उभे राहते आहे, हे आता आपण कृतीच्या अनुषंगाने समजावून घ्यायला हवे.

या लेखाच्या निमित्ताने काही संदर्भ पाहत असताना गेल्याच  आठवड्यात जगातल्या बहुधा सर्वच महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी लक्ष वेधून घेतले. बातम्या होत्या अंतराळ संशोधन करणारी ‘नासा’ आणि महासागरांवर संशोधन करणारी ‘नोआ’ (म्हणजे  नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फिअरिक  अॅडमिनिस्ट्रेशन) या दोन अमेरिकी संशोधन संस्थांच्या हवामान विषयक ताज्या अभ्यासाविषयीच्या. अनेक आव्हानं समोर ठेवून तीन आठवड्यांपूर्वी संपलेलं २०२१ हे वर्ष सलग सहावे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. या संस्थांनी जागतिक स्तरावर तापमान नोंदी घ्यायला सुरुवात केल्यापासून २०२१मध्ये पुन्हा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.

भारताच्या संदर्भाने विचार करायचा तर त्या आधीचे म्हणजे २०२० हे वर्ष सलग आठवे उष्ण वर्ष ठरल्याचे भारतीय हवामान खात्याने गेल्या वर्षीचा हवामान आढावा घेताना नोंदवले होते. २०२०मध्ये भारतात भूपृष्ठावरील हवेचे तापमान सरासरीपेक्षा ०.२९ अंशांनी जास्त होते, असा निष्कर्ष १९०१पासून घेतलेल्या नोंदींच्या आधारे भारतीय हवामान खात्याने मांडला होता.

हवामानातले बदल जाणवायला आकडेवारीच्या जंजाळातच शिरायला पाहिजे, असे नाही. आपण सगळेच ते बदल अनुभवतो आहोत. गेल्या काही दशकांमध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळे, दुष्काळ अशा आपत्तींच्या नोंदींची संख्या वाढती आहे, हेदेखील आपण पाहतो आहोत. 

पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयी आतापर्यंत खूप काही लिहिले, बोलले गेले आहे, जाते आहे. डॉ. नूलकर म्हणतात त्याप्रमाणे आपले रोजचे जगणे पर्यावरणपूरक करण्यासाठी काही बदल करायला लागतील, यातले सगळेच बदल स्वीकारणे सोपे नाही. पण प्रयत्न निश्चित करता येतील. लेखात सुचविल्याप्रमाणे त्याप्रमाणे रोजच्या जगण्यासाठी ज्या साधनांचा वापर होतो, जी ऊर्जा वापरली जाते; त्याबाबत काय करता येईल? काही कमी करता येईल का? वापरपद्धतीत बदल करता येईल का? याचा वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर आढावा घेण्यापासून सुरुवात तर करता येईल. सौरऊर्जेचा, एलईडी दिव्यांचा वापर, कचऱ्याचे, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा काही सवयींचाही विचार करता येईल.

हे काही रॉकेट सायन्स नाही. जगभरात, अगदी आपल्या आजूबाजूलाही अनेकजण अशी जीवनशैली अंगीकारण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणत्याही टोकाला न जाता, फारसा बाऊ न करता आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. अवघड वाटेलही कदाचित, पण विचार तर करूयात...

संबंधित बातम्या