क्लॅरिटी इज पॉवर

-
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

संपादकीय

हवामान बदलाचे आपल्या भवतालावर होणारे परिणाम आणि ते रोखण्याच्या प्रयत्नात आपण काय करू शकतो, यावर आपण गेले दोन आठवडे चर्चा करतो आहोत. जगभरातले सगळेच तज्ज्ञ आपल्याला सांगत आहेत, त्याप्रमाणे जगावर घोंगावणारे हवामान बदलाचे हे संकट पूर्णतः मानव निर्मित आहे, त्यामुळे ते रोखण्याच्या, किंबहुना आणखी नुकसान न होऊ देण्याच्या, प्रयत्नांचे यश हे देखील पूर्णतः आपण माणसं कशी वागतो यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याच राहण्या-वागण्यात काही बदल घडवून आणावे लागतील, हे उघड आहे. यातले काही बदल घडवून आणण्याकरता जगातल्या सरकारांच्या पातळीवर विचार होईल, धोरणं आखली जातील. गेल्याचवर्षी बारा विधिज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने ‘इकोसाइड’ म्हणजे सृष्टीसंहाराची नवी व्याख्या जगासमोर ठेवली. सृष्टीविध्वंस हा देखील युद्धगुन्हे आणि मानवतेच्याविरूद्धच्या गुन्ह्यांइतकाच गंभीर गुन्हा मानला जावा, अशी सूचना या गटाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला केली आहे. जागतिक पातळीवर जागरूक असणाऱ्या संस्था, व्यक्ती या पद्धतीचं काम करीत राहतीलच,  पण तरीही या संकटाचा सामना करण्यात आपल्यापैकी प्रत्येकाच्या वैयक्तिक भूमिकेचं मोल कमी होत नाही.

गेल्या अंकात म्हटल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूचे अनेकजण या विषयाचा केवळ विचार करताहेत एवढेच नव्हे तर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होणाऱ्या साधनसामुग्रीनिशी काही प्रयत्नही करीत आहेत. त्याविषयी आपण बोलत राहणार आहोतच.

पर्यावरण अभ्यासक `बटरफ्लाय इफेक्ट’ची कल्पना मांडतात. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातल्या एका लहानशा फुलपाखराने पंख फडफडवले म्हणून काही आठवड्यांनी जगाच्या आणखी कोणत्यातरी  कोपऱ्यात भलं मोठं वादळ येऊ शकतं, अशी ही केऑस थिअरी. गणितज्ज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांच्या अभ्यासाशी निगडित असणारी ही कल्पना. हवामान बदलाच्या अनुषंगाने या सिद्धांताकडे पाहताना आपल्यापासून शेकडो मैलांवर घडलेल्या, घडणाऱ्या अलीकडच्या काही घटनांच्या परिणामांचा आपल्याला भविष्यात कधीनाकधी सामना करावा लागेल, याची खात्री पटते.

यातली एक घटना आहे थेट आर्क्टिक्टवरची. तिथल्या एका ध्रुवीय अस्वलाचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात ट्विटरवर अनेकांनी पाहिला असेल. हे अस्वल एका रेनडिअरची शिकार करताना त्या व्हिडिओत दिसत होतं. अभ्यासकांच्या मते आर्क्टिक्टवरचं लवकर वितणारं बर्फ ध्रुवीय अस्वलांच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम करतं आहे. गेल्या काही काळात संशोधकांनी याअर्थाची निरिक्षणंही नोंदवली आहेत. त्यांच्यामते बदललेल्या या सवयींचा परिणाम ध्रुवीय अस्वलांच्या अस्तित्वावर आणि पर्यायाने ध्रुवीय प्रदेशाच्या एकंदर पर्यावरणावर होऊ शकतो.

दुसरीकडे घटनांची एक मालिका आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दोन्ही गोलार्धांमध्ये पसरलेली. कीटकांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या एका गटाच्या मते पर्यावरणीय बदलांच्या सध्याच्या गतीमुळे कीटकांच्या जगात मोठी उलथापालथ घडू शकते, आणि शेती उत्पादनासह माणसाच्या जगातल्या इतरही अनेक गोष्टींवर या उलथापालथीचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात. काही संशोधकांना या मुद्द्याबाबत अजून अभ्यास होण्याची गरज वाटत असली तरी असे परिणामांच्या शक्यतेवर मात्र त्यांच्यात एकमत आहे. वाढतं तापमान, वणव्यांची वाढती संख्या, पावसाचा लहरीपणा या सगळ्याचे परिणाम निसर्गाचा समतोल टिकवून ठेवणाऱ्या घटकांवर होत राहणार, आणि माणसाला तो परवडणारा नाही.

इस्रायली इतिहासलेखक युवाल नोवा हरारी त्यांच्या ‘ट्वेन्टी लेसन्स फॉर ट्वेन्टीफर्स्ट सेंच्युरी’ या अलीकडच्या पुस्तकाची ओळख करून देताना, नुसती भारंभार माहिती हाताशी असण्यापेक्षा असलेल्या माहितीविषयी स्पष्टता असण्याच्या आवश्यकतेवर भर देतात. त्यांच्यामते ‘क्लॅरिटी इज पॉवर’. हरारी यांचा हाच मुद्दा हवामान बदल या विषयालाही जोडायचा म्हटला तर मूळ प्रश्न, त्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या बाजू आणि त्याविषयीची आपली वैयक्तिक म्हणून आणि समाजाचा भाग म्हणून असलेली भूमिका आणि जबाबदारी याविषयी बोलत राहून, ही स्पष्टता वाढवत नेणं आवश्यक ठरतं.

संबंधित बातम्या