एकेक पान गळावया...

-
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

संपादकीय

शिशिरर्तुच्या पुनरागमें, एकेक पान गळावया,
कां लागता मज येतसे, न कळे उगाच रडावया

... कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेच्या ओळी आठवाव्यात असं उदास वातावरण सध्या झाकोळून टाकतंय. दर दिवसाआड कुणीतरी मोठं माणूस आपल्यातून गेल्याची बातमी येते. मनात काहूर उठतं. ज्यांनी बोट धरून आपल्या आणि आपल्या पुढच्याही पिढ्यांना पुढे नेलं, ज्यांनी अंगभूत प्रतिभेच्या जोरावर आपल्यासारख्या सामान्यांची जीविते धन्य केली, समृध्द केली, ज्यांचं साहित्य वाचून आपण एकेकाळी भारावून गेलो अशी कितीतरी माणसं शांतपणे निरोप घेती झाली. एक विलक्षण पोकळी जाणवू लागली आहे, असं वाटत राहतं. तसं पाहायला गेलं तर गेली दोन वर्षं जगभर मृत्यूचं थैमान सुरू आहे. कित्येकांनी आपले आप्तेष्ट गमावले, कित्येकांची आयुष्यं उजाड झाली. एका विषाणूनं केलेला हा संहार आता कुठं थोडी उसंत देतो आहे. विषाणूचा विषार ओसरला असला तरी आपलं वाटणाऱ्या कुणालातरी गमावल्याच्या बातम्या मात्र मनाला घरं पाडून जाणार आहेत. गेल्या दोन-अडीच महिन्यात अनेक दिग्गज आपल्याला सोडून गेले. विविध क्षेत्रांमधली ही उत्तुंग शिखरं होती. अगदी हा मजकूर लिहीत असताना एका भारतीय पिढीला डिस्कोसंगीताचा चस्का लावणारे संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांच्या निधनाची बातमी आली. वाहनउद्योगाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे तडफदार उद्योजक राहुल बजाज गेले. त्याआधी गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या महाप्रयाणाच्या दुःखातून रसिक धड सावरलेही नव्हते. आपल्या तरल पदन्यासानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारे कथ्थक कलावंत पं. बिरजू महाराजांच्या पायातले घुंगरू मुके झाले. आपल्या चित्रदर्शी शैलीतील प्रामाणिक लिखाणानं मराठी वाचकांना ‘शहाणे करून सोडणाऱ्या’ अनिल अवचटांचं निधन झालं. संगीत रंगभूमीवर निष्ठेनं पाय रोवून उभ्या राहिलेल्या कीर्ती शिलेदार आपल्याला सोडून गेल्या, आणि शास्त्रीय गायनानं मैफली गाजवणाऱ्या रामदास कामत यांचेही सूर कायमचे थांबले. कित्येक पिढ्यांना सदाबहार अभिनयानं रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं देहावसान झालं. जुन्या जमान्यातल्या अभिनेत्री रेखा कामत निवर्तल्या. प्रकाशक सुनील मेहता, अरुण जाखडे, पुस्तकमांडणीतील कुशल कलावंत बाळ ठाकूर अशा ग्रंथांच्या गावातले खंदे लोक आपण गमावले. सडेतोड भाषणांनी महाराष्ट्र गाजवणारे, संघर्षशील ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासारखा आधारस्तंभ आपण गमावला... अशी आणखीही नावं आहेत, ज्यांच्या जाण्याने आपल्यापैकी प्रत्येकाला आपलं वैयक्तिक काहीतरी गमावल्यासारखं वाटलं. 

...हे अपरिहार्य आहे, हे उमजूनदेखील, ही यादी कुठे थांबणार आहे? असा भाबडा विचार महाराष्ट्रातील कुठलंही संवेदनशील मन आत्ता करत असेल. ते स्वाभाविकच म्हणायला हवं. गेलं अर्धशतक याच मंडळींनी गाजवलं होतं. विविध क्षेत्रं आपल्या संचारानं समृध्द केली होती. एक समाज म्हणून आपल्या सांस्कृतिक, आर्थिक किंवा सामाजिक विकासात त्यांचं मोठं योगदान होतं. आधारस्तंभ कोसळून पडल्यानंतर निराधार अवस्था येते, हे खरं. पण अशा वेळीच त्यांची खरी शिकवण कामी येते, हेही लक्षात ठेवायला हवं. हीच मंडळी आज अपल्यात असती तर, त्यांनी दुःख गिळून पुढे कसं जायचं असतं, हेच सांगितलं असतं. कठीण प्रसंगात धीर न सोडता पुढे वाटचाल करायची असते, हेच तर त्यांनी आपल्या उदाहरणांनी दाखवून दिलं होतं. अशा महाजनांचा पंथ काटेरी असतो. या प्रत्येकाने आपापल्या आभाळाएवढ्या कारकिर्दी उभ्या केल्या, तेव्हा त्यांच्यासमोर तर वाटच नव्हती. ती त्यांनाच तयार करावी लागली. त्याच वाटांचे आज राजमार्ग झालेले आपल्याला दिसतात. याच दिग्गजांनी असे अनेक मार्ग आपल्याला काटेकुटे साफ करून आखून दिले आहेत. त्या मार्गानं आपण धीरानं जायला हवं. वाटचाल थांबता कामा नये, ध्येय सोडता कामा नये, हे स्वतःला बजावायला हवं. स्वतःचं सांत्वन करायलाच हवं. तीच या दिग्गजांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

शिशिरात पतझड होते. झाड ओकंबोकं होतं. पण पुन्हा पालवी फुटतेच. फळही धरतं. हिरव्यागर्द फांदोऱ्यांवर पाखरं किलबिलू लागतात. हे निसर्गाचं चक्र आहे.

संबंधित बातम्या