चिकित्सक दृष्टिकोन

-
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

संपादकीय

‘असं का?’ या द्विशब्दी प्रश्नाने माणसाच्या आयुष्यात आजवर अनेक उलथापालथी घडवून आणल्या आहेत. याच प्रश्नाने माणसाला असंख्य घटितांमागचा कार्यकारणभाव उलगडायला मदत केली, आणि त्यातून समजत गेल्या आधी अतर्क्य वाटलेल्या घटना. न्यूटनची सफरचंदाची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली असते. एका रात्री जेवणानंतर सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना न्यूटनने एक सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहिलं, आणि पडणाऱ्या त्या सफरचंदाने न्यूटनला मात्र कोड्यात टाकलं. सफरचंद खालीच का पडलं या विचारात गुरफटलेल्या न्यूटनने पुढे गुरुत्वाकर्षणाच्या नियमांवर संशोधन केलं. 

न्यूटनच्या आयुष्यात हा प्रसंग असाच्या असा खरोखरच घडला का? न्यूटनचा विषय निघाल्यानंतर आजही हटकून सांगितली जाणारी कथा खरी का खोटी? याविषयी मतभेद असले, तरी या कथेतून अधोरेखित होणारा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा मुद्दा मात्र साधारणतः सर्वांनाच मान्य असतो. आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहताना न्यूटनला काही प्रश्न पडत गेले, आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रवासात त्याने माणसाच्या प्रगतीला हातभार लावणारं केवढं तरी काम केलं.

एकविसावं शतक विज्ञान-तंत्रज्ञानाचं शतक आहे, असं वेळीअवेळी स्वतःला आणि इतरांनाही बजावताना, ‘असं का?’ हा द्विशब्दी प्रश्न मात्र आपल्यापैकी अनेकांच्या विस्मृतीत गेलेला असतो.  आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला असतानाही, आपल्यापैकी अनेक जण वैज्ञानिक दृष्टिकोन या कल्पनेपाशी अडतात. विज्ञानाचे फायदे घेऊन जगण्याची आपली लढाई सुकर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं ही पूर्वअट नसल्याने, वैज्ञानिक दृष्टिकोनाची अनुपस्थिती, किंवा त्या अनुपस्थितीची साधी जाणीवही नसण्याची जाणीवही नसणं हे काही फारसं वावगं वाटतही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन हा काही आपला प्रांत नव्हे, असाच समज घेऊन आपल्यापैकी अनेकजण वावरत असतात.

विज्ञान ही विचारपद्धती आहे, हे समजावून घेतलं तर ती रोजच्या जगण्यातल्या अनेक मुद्द्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची संधी असू शकते. ही विचारपद्धती आपल्याला प्रश्नांच्या मुळापर्यंत जायलाही मदत करते, आणि तिथून कार्यकारणभावासह प्रश्नाच्या उत्तराकडेही. चिकित्सक वृत्ती हा भारतीय  परंपरांचा भाग आहे. पुराणकाळापासून ते आधुनिक जगातल्या अनेक विचारवंतानी, समाजधुरिणांनी चिकित्सा करण्याच्या गुणाची पाठराखण केलेली दिसते. ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ या वृत्तीला यापैकी प्रत्येकाने प्रश्न विचारला आहे. ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता ।।’ किंवा ‘विचारले आधी आपुल्या मनासी’ अशीच जगद््गुरू तुकोबारायांची शिकवण आहे.

कुणीतरी दिलेल्या, कोणाताही आधार सांगू न शकणाऱ्या माहितीवर प्रश्न न विचारता विश्वास ठेवणं, ही आताच्या काळातली सर्वात आधुनिक अंधश्रद्धा म्हणावी लागेल. प्रश्न विचारा, मुद्दे तपासा, समजून घ्या, विचार करा आणि मग स्वीकारा ही साखळी जर आपण विसरून गेलो, तर निसर्गातला बुद्धिमान घटक हे बिरुद मिरवण्याचा अधिकार आपल्याला कितपत उरतो, याचा विचार ज्याचा त्याने करावा.

गेले काही दिवस आपला जीव टांगणीला लावणाऱ्या कोविड विषाणूच्या निमित्ताने हे मुद्दे अधिक प्रकर्षाने पुढे आले. कोविडच्या संकटाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर संपूर्ण जगातल्या वैज्ञानिकांनी कंबर कसली आणि माणसाच्या जातीला काहीसा दिलासा मिळाला. कोरोना विषाणूचे सांप्रतचे अवतार तुलनेने कमी हानिकारक ठरले, त्याचे श्रेय या संशोधनाला द्यायला हवे. पण याच काळात विज्ञानाचीच भाषा वापरून आपली दिशाभूल करणाऱ्या ‘कृतक विज्ञाना’लाही नजरेआड करून चालणार नाही. चिकित्सेची गरज असते ती अशा प्रसंगात. याच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर आपल्यापैकी अनेक जण गेले कित्येक दिवस, आहेत तिथून त्यांची कामे करत आहेत, अर्थचक्र सुरळीत ठेवण्याचे बऱ्यापैकी यशस्वी ठरलेले प्रयत्न करत आहेत; पण विज्ञानाचा हाच तोंडावळा वापरून, आणि मुख्यतः चिकित्सेशी फारकत घेणाऱ्या मानसिकतेचा फायदा घेत फसवणूक आणि लुबाडणुकीचेही प्रसंग अनेकांच्या वाट्याला येत आहेत, हे चिकित्सक समाजाचं लक्षण असू शकणार नाही.

विज्ञानाचा एक चांगुलपणा म्हणजे विज्ञान आपल्या मर्यादा मान्य करतं आणि स्वतःच्या निष्कर्षांमध्ये दुरुस्त्याही करतं, त्याचमुळे चिकित्सेला प्राधान्य देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं महत्त्व खरंतर अधिकच वाढतं.

वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सा या मुद्द्यांशी मैत्री करणं, हाच या आठवड्यातल्या विज्ञान दिनाचा संकल्प असायला हवा!

संबंधित बातम्या