लक्ष्मीमुक्ती

-
सोमवार, 7 मार्च 2022

संपादकीय

परवा एक व्हिडिओ पाहण्यात आला. महर्षी व्यासांइतकीच किंबहुना काकणभर अधिकच प्रतिभा फक्त आपल्यालाच लाभली असल्याचा समज करून घेऊन एखाद्या विषयावर ‘सखोल’ टिपण्ण्या करणाऱ्या आभासी तज्ज्ञांचा समाजमाध्यमांवर सुळसुळाट झालेला असण्याच्या आजच्या काळात, क्वचितच हाताला काहीतरी बरं लागतं, त्यातला हा एक व्हिडिओ होता.

बहुधा चाळिशीच्या मध्यावर असावा असे वाटणारा एक तरुण बोलत होता. स्मृतींच्या हिंदोळ्यावर/ बगिच्यात/ उद्यानात/ वनात/ उपवनात/ रानात/ माळरानात/ अरण्यात/ वाळवंटात (आपल्याआपल्या अनुभवांच्या मगदुरानुसार शब्द निवडावा) फेरफटका मारताना अनेक आठवणी मनात फेर धरत असतात. पण स्मरणरंजनाच्या त्याच निसरड्या वाटेवर चालणाऱ्या ह्या तरुणाचा रोख मात्र काहीसा रोकडा होता. ‘आय विश, आय न्यू धिस’ -हे मला या आधीच माहिती असतं तर बरं झालं असतं, असं वाटण्याची वेळ आपल्यापैकी प्रत्येकावरच कधीना कधी येत असते. अशी वेळ आणणाऱ्या काही गोष्टी मला कोणीच का शिकवल्या नाहीत? असा या तरुणाचा प्रश्न होता. उद्योजगतेचं बाळकडू, पठडी सोडून विचार करण्याची सवय, शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मनाची तंदुरुस्ती आणि भावभावनांचं व्यवस्थापन असे काही मुद्दे घडत्या वयातच सामोरे आणले गेले असते, तर आज मी आहे त्यापेक्षा काहीसा वेगळा असतो, असा त्या सांगण्याचा सूर होता. त्या सांगण्यात आणखीही एक मुद्दा होता -अर्थसाक्षरता.

तुम्ही पैशाला किती महत्त्व देता, या प्रश्नाला तुमचं उत्तर काहीही असलं तरी तुम्ही अर्थसाक्षर असण्याच्या गरजेचं महत्त्व रतीभरही उणावत नाही. आणि आपली बस चुकली, हे समजेपर्यंत काहीसा उशीरच झालेला असतो.

जो पैसा मिळवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं, त्याच्यात्याच्या पद्धतीनं स्वतःला दिवसाच्या चोवीसही मात्रांना अक्षरशः बांधून घातलेलं असतं, तो पैसा दीर्घकालीन गरजांचा अंदाज घेऊन ‘उत्तम वेव्हारे’ वाढवून, गुंतवून, राखून अर्थ-स्वावलंबी होण्याच्या दिशेला होणारी आपल्यापैकी अनेकांची वाटचाल मात्र फारशी स्पृहणीय नसते. या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीवर नजर टाकली तर ‘आपल्यापैकी अनेकांची’ या दोन शब्दांचं आकडेवारीतलं भाषांतर आपल्याला थेट पंचाहत्तर टक्क्यांवर नेऊन ठेवतं. 

हीच आकडेवारी पुढे वाचत गेलं तर लक्षात येतं, ‘यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता’ या वचनावर परंपरेने विश्वास ठेवणाऱ्या आपल्या भवतालातल्या स्त्रियांमधल्या अर्थसाक्षरतेची आकडेवारी आज एकविसाव्या शतकातही समाज म्हणून आपल्याला शोभणारी नाही. आणि अर्थसाक्षरतेच्या पाठोपाठ येणाऱ्या अर्थस्वातंत्र्याच्या मुद्द्यावरही झालेल्या अनेक अभ्यासांमधून वारंवार पुढे आलेलं आणखी एक धक्कादायक वास्तव म्हणजे एखादी लेक, पत्नी, आई, बहीण, सून किती शिकली आहे? ती मिळवती आहे की नाही? तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बरी आहे का? ह्या मुद्द्यांना, तिच्याकडे तिचा म्हणून काही आर्थिक आधार आहे का आणि तो तिच्या पद्धतीनं वापरण्याचं स्वातंत्र्य तिला आहे का? या प्रश्नाच्या अनुषंगानं फारशी किंमत असतेच असं नाही.

मध्यंतरी एक जाहिरात दाखवली जात होती. तुम्हालाही आठवेल. वेगवेगळ्या वयोगटातल्या तीस स्त्री-पुरुषांसाठीचा एक प्रश्न-खेळ. प्रश्न रोजच्या जगण्याशी संबंधित असणारे. तुम्हाला चहा करता येतो का? उत्तर होकारार्थी असेल तर एक पाऊल पुढे टाकायचं, नकारार्थी असेल तर एक पाऊल मागं जायचं. प्रश्न जसे अर्थसाक्षरता आणि आर्थिक निर्णयस्वातंत्र्याकडे झुकायला लागतात तसा सुरुवातीला गमतीदार वाटणारा खेळ गंभीर होत जातो; आणि खेळाच्या शेवटी पुढे येते ती एक दरी -अर्थसाक्षरता, अर्थस्वातंत्र्य आणि बाई असण्यातली. 

या पार्श्वभूमीवर ऐंशीच्या दशकात शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी उभी केलेली लक्ष्मीमुक्तीची चळवळ महत्त्वाची ठरते. नवऱ्याच्या भरवशावर सासरी नांदणाऱ्या शेतकरी महिलेला, नवऱ्याच्या पश्चात सन्मानानं जगता यावं यासाठी शेतकरी पतीनं आपल्या नावावरच्या जमिनीपैकी काही जमीन आपल्या पत्नीच्या नावानं करून द्यावी, असं त्या चळवळीतलं एक सूत्र होतं. बाईच्या नावानं संपत्ती निर्माण होण्याचे कौटुंबिक-सामाजिक अर्थ बाईच्या दृष्टीनं बहुपेडी असतात, हे वास्तव लक्षात घ्यायला हवं.

समाजाचा अर्धा भाग असणाऱ्या स्त्रियांनी बहुतेक क्षेत्रांमधली पुरुषांची मक्तेदारी मोडून काढल्याचं चित्र असलं -अगदी परवाच अर्थगुंतवणूक व्यवहारांचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’ची धुराही महिलेकडे सोपवण्यात आली आहे -तरी अजूनही आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक स्तर जपणाऱ्या कुटुंबांतही  स्त्रियांच्या अर्थसाक्षरता आणि अर्थस्वातंत्र्याचे मुद्दे ही कोणाचीच प्राथमिकता का नसते, याचा समाज म्हणून आजवर विचार का होत नाही? ह्या प्रश्नाला आतातरी समाधानकारक उत्तर मिळवायला हवं.

संबंधित बातम्या