प्लॅस्टिक मुक्तीकडे...

-
सोमवार, 14 मार्च 2022

संपादकीय

मानव आणि इतर प्राण्यांमध्ये फरक काय? असा प्रश्न विचारला तर, मानवाचा मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत फार तेजतर्रार... असं त्याचं उत्तर देता येईल. माणसाचा मेंदू फार भारी चालतो. मेंदूचा वापर करून मानवानं उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवे शोध लावले आणि आपलं जगणं सुलभ केलं, आणि हे करताना बऱ्याचदा त्यानं भवतालाचा विचार न करता फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार केला. असाच एक शोध म्हणजे प्लॅस्टिक. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्लॅस्टिकचा शोध लागला, आणि अल्पावधीतच या प्लॅस्टिकनं संपूर्ण जगाला वेड लावलं. कारण हे प्लॅस्टिक आहेच तसं... स्वस्त आणि मस्त! त्याची उपयुक्तताही अफाट. वाट्टेल त्या आकारात, वाट्टेल त्या प्रकारात, वाट्टेल त्या उपयोगासाठी प्लॅस्टिक वापरता येऊ शकतं हे मानवाच्या लक्षात आलं आणि मग प्लॅस्टिकनं मानवाच्या आयुष्यात असा काही शिरकाव केला की आता प्लॅस्टिक आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच झाला आहे. 

औषधांच्या बाटल्यांपासून वाहनांपर्यंत आणि साध्याशा पेनापासून केसांच्या पिनेपर्यंत अनेक वस्तूंमध्ये, छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये सगळ्याच गोष्टींसाठी प्लॅस्टिकचा वापर होतो. 

काळाच्या ओघात ‘सिंगल युझ’ प्लॅस्टिकचे धोके लक्षात येऊ लागले, तशी त्यावर बंदी आली. पण कितीही बंदी असली तरी प्लॅस्टिकच्या पिशवीतून चहा आणणं आपण कुठं थांबवलंय? किंवा साधं कोथिंबीर आणायला जाताना आपण कापडी पिशवी विसरतो आणि भाजीवाल्याकडून प्लॅस्टिकची पिशवी आणतोच ना? आता या प्लॅस्टिकला आपण पूर्ण हद्दपार करूच शकत नाही, निदान सध्या तरी नाही! 

प्लॅस्टिकचा ‘टिकाऊपणा’ हा सुरुवातीला वाटलेला फायदा आता मात्र शाप ठरू लागला आहे. कारण जी रासायनिक प्रक्रिया प्लॅस्टिकला टिकाऊपणा देते, त्याच प्रक्रियेमुळं प्लॅस्टिकचं विघटनही होत नाही... आणि मग त्याचा होतो कचरा, अविनाशी कचरा! १९५० ते २०१७ या कालावधीत तयार झालेल्या ९२० कोटी टन प्लॅस्टिकपैकी सुमारे ७०० कोटी टन प्लॅस्टिक आता कचऱ्याच्या स्वरूपात आहे. त्यापैकी ७५ टक्के कचरा एकतर लँडफिलमध्ये पडलेला आहे किंवा जमिनीवर, समुद्रात असा निसर्गामध्ये कुठं कुठं जमा होऊन बसलेला आहे. अजूनही प्लॅस्टिकची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. सगळंच प्लॅस्टिक रिसायकल होतं असंही नाही (बहुतांश प्लॅस्टिक रिसायकल होतच नाही, असं तज्ज्ञ सांगतात). जमिनीवरून समुद्रात गेलेल्या प्लॅस्टिकची आता समुद्रांमध्ये बेटं तयार झालेली आहेत. प्लॅस्टिकच्या जाळ्यांमध्ये अडकलेले सागरी जीव, गाईगुरांच्या-पक्ष्यांच्या पोटांमध्ये सापडलेलं प्लॅस्टिक, हे आता सरसकट दिसणारं दृश्य झालं आहे. 

‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’ संस्थेच्या एका अहवालानुसार, प्लॅस्टिकची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण आणलं गेलं नाही, तर २०५०पर्यंत समुद्रांतील प्लॅस्टिक प्रदूषण चौपटीनं वाढण्याची शक्यता आहे. 

पण, ‘देर आए दुरुस्त आए’, या उक्तीप्रमाणं आता प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागतिक पातळीवरून प्रयत्न होणार आहेत. मागील आठवड्यात नैरोबी इथं झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेमध्ये प्लॅस्टिक प्रदूषणाचा प्रश्न सो़डवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याबाबत सुमारे १७५ सदस्य राष्ट्रांनी संमती दर्शवली. हा एक ऐतिहासिक आणि पॅरिस करारानंतरचा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. 

प्लॅस्टिकच्या निर्मितीपासून विघटनापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण येणार आहे. हे कसं करायचं? त्यासाठीच्या कायदेशीर बाबी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कसे उभे करायचे? यावर २०२४पर्यंत सदस्य देशांमध्ये चर्चा होतील, मग कृती कार्यक्रम आखला जाईल.  

प्लॅस्टिक प्रदूषण निर्मूलनाच्या दिशेनं जागतिक पातळीवर एक पाऊल तर पुढं पडलं, पण या प्लॅस्टिक प्रदूषण कराराची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईपर्यंत आणखी बराच काळ लागेल. मग तोपर्यंत आपल्या हातात काय आहे? कचरा वाट्टेल तिथं न टाकणं, प्लॅस्टिकचा वापर शक्य तेवढा कमी करणं, पुनर्वापर करणं आणि नियम पाळणं. शेवटी सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल!

संबंधित बातम्या