एका मतदानाची गोष्ट

-
सोमवार, 21 मार्च 2022

संपादकीय

काल-परवाच आणखी एका मतदानाची मुदत संपली. हे मतदान होतं या वर्षासाठी ‘सर्वात लोकप्रिय’ मोलस्क म्हणजे मृदुकाय प्राणी कोणता हे निवडण्यासाठी. या वर्षासाठीचा जगातला सर्वात लोकप्रिय मोलस्क असण्याचा मान मिळवण्यासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. सी बटरफ्लाय, सागरी फुलपाखरू (Cymbulia peronii), पेन्टेड स्नेल (Polymita picta), नेव्हल शिपवर्म (Teredo navalis), टेलिस्कोप स्नेल (Telescopium telescopium) आणि बार्ज-फूटर (Fustiaria rubescens). मतदानाच्या आधीच्या फेऱ्यांनंतर हे पाच मृदुकाय प्राणी अंतिम मतदानासाठी निवडले गेले आहेत. फ्रँकफर्ट (जर्मनी)मधल्या 'सेन्कनबर्ग निसर्ग इतिहास संग्रहालय', 'लोव सेंटर फॉर ट्रान्सनॅशनल बायोडायव्हर्सिटी जिनॉमिक्स' आणि मृदुकाय प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या 'युनिटास मालकोलॉजिका' या संस्थांनी मिळून गेल्या वर्षीपासून हा उद्योग आरंभला आहे. या उपक्रमात ज्या मोलस्कला मतदारांची सर्वाधिक पसंती लाभेल त्याच्या उत्क्रांतीचा अधिक खोलवर अभ्यास होईल, त्यासाठी त्याचा डीएनए मिळवला जाईल आणि त्या मोलस्कच्या जनुकीय संरचनेचा (जिनोम सिक्वेसिंग) अभ्यास होईल. हा अभ्यास म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून अजूनही न उलगडलेली अनेक कोडी सोडविण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा असेल, कारण गेल्या पाच कोटी वर्षांपासून अस्तित्वात असणाऱ्या मृदुकाय प्राण्यांच्या अफाट दुनियेतले जेमतेम काही डझन सदस्य सोडले तर या दुनियेचा जनुकीय संरचनेच्या दृष्टिकोनातून अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही.

पाच कोटी वर्षांपासून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मृदुकाय किंवा अपृष्ठवंशी प्राण्यांपैकी गोगलगायी, शंख, कवड्या, पाणीदार मोत्यांची निर्मिती करणारी कालवं असे काही जीव सोडले तर काही थोड्यांशीच आपला परिचय असतो. सेन्कनबर्ग निसर्ग इतिहास संग्रहालयाच्या प्रा. ज्युलिया सिग्वार्ट यांच्या शब्दांत सांगायचं तर यातल्या बऱ्याच प्रजातींचा अभ्यास होत नाही, पण त्यातल्या प्रत्येकाची स्वतःची अशी एक कथा आहे. यातले काही माणसाच्या लेखी उपयोगी आहेत, आणि काही उपद्रवी.

या वर्षासाठी अंतिम यादीत आलेल्या पाचजणांचाच विचार करायचा म्हटला, तर नव्या भूमीच्या शोधात महासागर पालथे घालणाऱ्या  कोलंबसाच्या जहाजांच्या तळाचे भाग कुरतडून त्याला जमैकाच्या किनाऱ्यावर अडकवून ठेवणारे नेव्हल शिपवर्म भविष्यात अत्यंत पौष्टिक खाद्यान्न म्हणून उपयोगात येऊ शकतात, असं तज्ज्ञांना वाटतं. किंवा सी बटरफ्लाय, सागरी फुलपाखरू म्हणजे महासागरांच्या आम्लीकरणासारख्या सागरी अरिष्टांची पूर्वसूचना देणारा जागल्याच आहे.  

गेल्यावर्षी लोकप्रिय मृदुकाय प्राणी ठरलेल्या पेपर नॉटिलसने (Argonauta spp.) तर विज्ञानकथांचा जनक ज्यूल्स व्हर्नपासून अनेकांना भुरळ घातली होती. 

तुमचा आवडता मोलस्क किंवा फुलपाखरू निवडा किंवा तुमच्या भवतालाचे मानचिन्ह म्हणून कोणते फूल, झाड किंवा प्राण्याची निवड कराल? किंवा तुमच्या मते लुप्त होत जाणाऱ्या कोणत्या प्रजातीला तातडीच्या संरक्षणाची गरज आहे? असे प्रश्न विचारणारे हे उपक्रम निसर्गात माणसाबरोबर राहणाऱ्या, पण बऱ्याचदा माणसाच्या प्राधान्ययादीत नसणाऱ्या वन्यजीवांकडे लक्ष वेधण्याचा एक मार्ग आहे, याविषयी बऱ्याच तज्ज्ञांचे एकमत आहे. एखाद्या वनस्पतीबद्दल, प्राण्याबद्दल बोलले जाऊ लागले, सर्व स्तरांतल्या लोकांपर्यंत तो प्राणी, ते झाड, ते फूल पोचले की त्या प्रजातींच्या असण्याबाबत, आणि पर्यायाने संरक्षण-संवर्धनाबाबत लोकांमध्येही सजगता निर्माण होण्याच्या शक्यता वाढीस लागतात, असा या मागचा विचार.

निसर्गाबरोबर जगताना निसर्गातल्या प्रत्येक घटकाची -प्राण्यांची, पक्ष्यांची, सरीसृपांची, अगदी डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या कृमी, कीटकांचीही -निसर्गात काही एक निश्चित भूमिका असते; तो प्रत्येक घटक निसर्गचक्राचा एक भाग असतो, हे आपण समजावून घेतले तरच या सहचरांबरोबरच्या आपल्या सहजीवनाला काही अर्थ प्राप्त होऊ शकतो. ‘सर्वात लोकप्रिय...’ अशा पद्धतीच्या निवडीतून कदाचित निसर्गातल्या आपल्या सहचरांना समजावून घेत, अर्थपूर्ण सहजीवनाच्या दिशेने आणखी एखादे पाऊल पडू शकेल.

संबंधित बातम्या