शुभकृत...

-
सोमवार, 4 एप्रिल 2022

संपादकीय

दोन वर्षांनंतर आजचा पाडवा एक मोकळा श्वास घेऊन येतो आहे. कोरोना विषाणूचा उद्रेक अजूनही संपलेला नसला आणि जगण्याच्या लढाईतले प्रश्न रोज नव्या रूपात सामोरे येत असले, तरी भवताल झाकोळून टाकणाऱ्या कृष्णमेघांच्या मगरमिठीतून आकाश मोकळं होत असल्याची हवीहवीशी भावना घेऊन आजचा पाडवा आला आहे. गेली दोन वर्षं सारं जग ज्या निर्बंधांचा सामना करीत होतं ते बहुतांश निर्बंध, जगातल्या काही भागांचा अपवाद वगळता, आता (अधिकृतपणे) सैलावले आहेत. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अजूनही सार्स-कोव्ह-2 विषाणू आणि त्याच्या सख्ख्या, चुलत अवतारांची दहशत असली तरी मधला तो सगळा जीवघेणा काळ वगळून आता पुन्हा नव्याने जगणं सुरू झाल्याचा दिलासा नव्याने देणारी भावना घेऊनच ‘शुभकृत’ नावाचं नवं संवत्सर आजपासून सुरू होतं आहे. 
]

दोन वर्षांपूर्वी आपल्या प्रत्येकाच्या तोंडी असणारी ‘न्यू नॉर्मल’ नावाची कल्पना आता रुळली आहे. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला नवा संदर्भ देणाऱ्या कोरोनाच्या संकटाने गेल्या दोन वर्षांत अनेक आयुष्य वरपासून खालपर्यंत बदलली, जगण्याची लयही बदलली, काही ठिकाणी बिघडवलीही. अनेक आयुष्य थबकली. थिजली. अत्यंत अनपेक्षितपणे आलेल्या या विषाणूला भांबावलेल्या मनःस्थितीतच तोंड देताना जगण्याच्या प्रवासातल्या अनेक कल्पना नव्याने गवसल्या, नात्यांचे अर्थ उमगले, जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला वेढून राहणारी अनिश्चितता नव्याने सामोरी आली. कालपर्यंत जे काही, जसं होत होतं ते होणं बदललं. अर्थचक्र रुतून पडलं. जगण्याला कुंपण पडलं. कोरोना विषाणूने आणलेल्या संकटाच्या विविधांगी परिणामांचे नवे नवे अर्थ दरदिवशी पुढे येत गेले. 

हजार हातांच्या या संकटाचं अक्राळविक्राळ रूप जसं कळायला लागलं तशी माणसाच्या माणूसपणात अनुस्यूत असणारी जिगीषा भानावर आली. मग माणसानी कंबर कसली, नव्या वाटा शोधल्या, आतापर्यंतचं ज्ञान; अनुभव पणाला लावलं, तंत्रज्ञानाशी मैत्र जुळवलं. कोणत्याही संकटात स्वतःबरोबर इतरांना सावरणारे असंख्य हात पुढे आले, त्यांनी असंख्य मनांना आशेची उभारी दिली.

या सगळ्या काळातलं सर्वात मोठं आव्हान होतं ते आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर गडद होत गेलेलं अनिश्चिततेचं सावट. ही अनिश्चितता तरुण मनांवर कळत-नकळत खोलवर परिणाम करत गेली, असं या दरम्यान झालेल्या अनेक अभ्यासांतून स्पष्ट होत गेलं आहे. जगण्याशी थेट संबंध असणाऱ्या अनेक बाबी या साऱ्या घुसळणीतून लक्षात आल्या, अजूनही येत आहेत. कोविडचा हा कोळसा फार उगाळायचा नाही हे तर खरंच, पण कोविडकाळानी माणसाला नेमकं काय शिकवलं 

याचा विविधांगी अभ्यास जागतिक पातळीवर  जसा होतो आहे, 

तसा तो आपल्यापैकी प्रत्येकानं आपापल्या पातळीवरही करायला हवा. 

गेलं जवळजवळ वर्षभर संपूर्ण जगातले भविष्यवेधी तज्ज्ञ त्यांच्या त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष जगासमोर ठेवत आहेत. यात वैद्यकशास्त्र आहे, वैयक्तिक आरोग्य आहे, तंत्रस्नेह आहे, समाजाचे आणि स्वतःचेही अर्थकारण आहे, नातेसंबंध आहेत, मावळतीकडे झुकलेल्या आणि उगवतीवर दिसायला लागलेल्या उद्योग, व्यवसायांच्या संधी आहेत, म्हणून औपचारिक, अनौपचारिक, संघटित अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये लागणाऱ्या नव्या कौशल्यांच्या गरजेचाही मुद्दा आहे.

कोविडनी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा हेराक्लिटस ऑफ इफेससच्या वळणाशी आणून उभं केलं आहे. ‘चेंज इज द ओनली कॉन्स्टन्ट इन द लाइफ’ -जगण्यात बदलच काय तो शाश्वत असतो- असं हा ग्रीक तत्त्वज्ञ काही हजार वर्षांपूर्वी म्हणाला होता. मनाच्या गाभ्यात आपल्याला मान्य असणारं हे शाश्वत सत्य आता आपल्या अंगवळणीही पडायला हवं. 

जगभरातले निर्बंध सैलावत असताना जागतिक आरोग्य संघटना मात्र कोविडबरोबरची लढाई संपल्याच्या आविर्भात न राहण्याचाच सल्ला जगाला देते आहे. विषाणूबरोबरचा हा संघर्ष दीर्घकाळ चालणार असल्यानं मुखपट्टी, गर्दीत वावरत असताना पाळावयाचे अंतराचे नियम, वैयक्तिक स्वच्छता आणि लसीकरण ह्या बाबींना पर्याय नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. आज आपल्याकडेही वावरावरची बाकी बंधने आता नसली तरी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर, सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहेच. गेल्या दोन वर्षांतले काळवंडलेपण खरवडून काढून टाकायचे आहेच, पण त्या दोन वर्षांच्याकाळात मुखपट्टीच्या वापरापासून ते वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या आता अंगवळणी पडलेल्या काही चांगल्या सवयी मात्र उतू जाणाऱ्या उत्साहातही सांभाळून ठेवायला हव्यातच.

आज शुभकृत नावाच्या नव्या संवत्सराचं स्वागत करताना, ‘सीदन्ति मम गात्राणि...’ असं म्हणत भर रणांगणावर हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला सांख्ययोग आणि कर्मयोग सांगताना श्रीकृष्णाने केलेला ‘क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।’ - अर्जुना, अंतःकरणातल्या क्षुद्र दुबळेपणाचा त्याग करून युद्धाला उभा राहा, हा उपदेश मार्गदर्शक ठरावा. 

आपणा सर्वांना गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संबंधित बातम्या