गाडं रुळावर येताना 

-
सोमवार, 11 एप्रिल 2022

संपादकीय

कोरोना महासाथीने लादलेल्या जगण्यावरच्या निर्बंधांतून बाहेर पडत सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मरगळलेल्या मनांना उभारी देणारं नोकऱ्यांच्या संदर्भातील एक वृत्त कदाचित आपल्याही वाचनात आलं असेल. या वृत्तानुसार देशातल्या नोकरदारांच्या संख्येत काही वाढ नोंदवली गेली आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेली ही आकडेवारी मावळलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीची असली, तरी अजूनही अस्थिर असणाऱ्या नोकऱ्यांच्या बाजारपेठेला या आकडेवारीने आता सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षाकरिता एक दिशा दाखवून दिली आहे, असं अभ्यासकांचं मत आहे.
जॉब मार्केटमध्ये, नोकऱ्यांच्या बाजारपेठेत, गेल्या महिन्यात झालेली वृद्धी साडेअठरा टक्क्यांच्या आसपास आहे, असे ही आकडेवारी सुचवत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. काही खासगी कंपन्यांनी प्रसिद्ध केलेली आकडेवारी नियमित वेतनधारकांची असल्याने ती महत्त्वाची आहे, असे अभ्यासक सांगतात. ही आकडेवारी प्रामुख्याने पर्यटन व आदरातिथ्य उद्योगांसह (ट्रॅव्हल अॅण्ड हॉस्पिटॅलिटी), खाद्य-पेये (फूड अॅण्ड बिव्हरेज), लॉजिस्टिक्स, वित्त, ऊर्जा, माहिती-तंत्रज्ञान, ई-कॉमर्स अॅण्ड डिलिव्हरी उद्योगांशी संबंधित असली तरी नियमित नोकऱ्यांच्या उपलब्धतेत येत्या काळात आणखी सकारात्मक बदल दिसतील, असा या आकडेवारीचा अर्थ लावला जातो आहे.

कोरोना महासाथीच्या काळात नोकऱ्यांच्या जगात प्रचंड उलथापालथ झालेली सगळ्या जगानेच अनुभवली. एका बाजूला विषाणूची भीती अजूनही संपलेली नाही. दुसरीकडे जागतिक राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईमुळे विविध अंगानी थेट जगभरातल्या असंख्यांपर्यंत येऊ पाहात असलेल्या/ आलेल्या आर्थिक संकटानी आणखी एक अनिश्चितता आपल्यावर लादली आहे. अशा परिस्थितीत जगाच्या अर्थव्यवस्थेचं गाडं पुन्हा रुळावर येऊ पाहात असताना, भविष्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठीच व्यवसायाच्या संधींच्या वाटांवर होणाऱ्या बदलांची दखल घेण्याची आवश्यकता गतकाळाच्या तुलनेत कदाचित आणखी वाढली आहे. आणि बदलांचा मागोवा घेताना; आपल्याला स्वतःला त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे, हा त्या बदलांची दखल घेण्याच्या प्रक्रियेतला पुढचा अटळ भाग. जगण्याच्या वाटेवर नव्याने पाऊल टाकणाऱ्या किंवा बदलाच्या लाटांचा अंदाज घेऊन जगण्याची वाट बदलणाऱ्या प्रत्येकालाच उद्योग -व्यवसायाच्या जगात होणाऱ्या बदलांचा आणि त्या बदलांसह उद्योग -व्यवसायात टिकून राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा, बदलांबरोबर बदलणाऱ्या उद्योग -व्यवसायाच्या गरजांचा आणि आवश्यक त्या तंत्रज्ञानाशी स्नेह जुळवण्याच्या गरजेचा अंदाज घेत राहावे लागणार आहे.

अगदी घरून काम करण्याच्या नव्या ट्रेंडचे उदाहरण घ्या. बैठ्या कार्यालयीन कामांसह असंख्य कामे, प्रत्यक्षात अगदी गुंतागुंतीची असणारीही काही कामे, प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये न जाता आपल्या घरूनच किंवा जिथे आहोत तिथूनच केली जाऊ शकतात; त्यासाठी खूप सारे उपद्‌व्याप करीत कार्यालयांमध्येच गेले पाहिजे असे नव्हे, अशी कल्पना दोन वर्षांपूर्वी कोणी मांडली असती तर असंख्यांनी त्यावर विश्वास ठेवला नसता. पण विषाणूच्या मगरमिठीत सापडलेल्या जगानी वर्क फ्रॉम होमचा, वैयक्तिक स्तरावरील रिमोट वर्क स्टेशनचा, पर्याय स्वीकारला. गेल्या दोन वर्षांतल्या अनुभवांच्या आधारे दूरस्थ कामाच्या, रिमोट वर्कच्या, फायद्या-तोट्यांवर जगभर चर्चा सुरू असली, अनेक कंपन्या आता आपापल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलावू लागल्या असल्या तरी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे संपणार नाही, असाच अभ्यासकांचा सूर दिसतो आहे. एकाबाजूने या परिस्थितीला कार्यालयीन जागांमधील गुंतवणुकीसह अनेक पदर आहेत. मात्र दुसरीकडे काम करणाऱ्या माणसांसाठीही हा मोठा बदल आहे. या बदलाच्या व्यावहारिक पैलूंपासून ते कौटुंबिक, भावनिक पैलूंपर्यंतच्या अनेक मुद्द्यांची आणि त्या अनुषंगाने अंतरावरून काम करणाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर झालेल्या बऱ्या-वाईट परिणामांची चर्चा अजूनही होते आहे. याच अनुषंगाने जगभर आता खासगी आणि व्यावसायिक जगण्याचा ताळमेळ घालणाऱ्या वर्क-लाइफ बॅलन्सवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पर्याय म्हणून दोन्ही पद्धतींचे ताळतंत्र राखत, काही काळ घरून आणि काही काळ कार्यालयातून काम करण्याचा -हायब्रीड पद्धतीचा पर्याय पुढे येतो आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी स्वतःचे काम करण्याच्या कौशल्याच्या बरोबरीने काही सॉफ्ट स्कीलही जाणीवपूर्वक अंगी बाणवणे आता पूर्वीच्या तुलनेत आवश्यक ठरते आहे, हा उद्योग -व्यवसायात टिकून राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा, उद्योग -व्यवसायाच्या बदलत्या गरजांचा आणि आवश्यक त्या तंत्रस्नेहाचा अंदाज घेत राहण्याचा अर्थ. उद्योजक, व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा दोन्ही बाजूंनी हा अर्थ समजावून घेणं आवश्यक असेल, असे अभ्यासक सांगतात.

मुद्दा आहे तो बदलांच्या रेट्यात रुळावर येत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या गतीशी आपली गती जुळवून घेण्याचा!

संबंधित बातम्या