कौतुक

-
सोमवार, 2 मे 2022

संपादकीय

आंब्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य कधी जाणवलंय का तुम्हाला? या प्रश्नाच्या उत्तरादाखल अस्सल आंबाप्रेमी जनांकडून, ‘हा काय प्रश्न झाला? असा प्रतिप्रश्नच येण्याची शक्यता अधिक. आंब्याची वैशिष्ट्ये म्हटल्यावर एखादा अस्सल आंबाप्रेमी एकामागोमाग एक अशी आंब्याच्या वैशिष्ट्यांची यादी हा प्रश्न विचारणाऱ्याच्या तोंडावर फेकून, ‘यातलं जे कुठलं वैशिष्ट्य हवंय ते घ्या,’ असं म्हणून प्रश्नाचा पार निकाल लावून टाकेल. ही शक्यता लक्षात घेऊनही हा प्रश्न विचारावासा वाटतो.  आपल्या आजूबाजूच्या इतर अनेक फळांच्या तुलनेत आंब्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य कधी जाणवलंय का तुम्हाला?

आपल्या एकूणच पारंपरिक व्यवहारांमध्ये, रीतिरिवाजांमध्ये आंब्याला एक मानाचं स्थान आहे, हे तर खरंच. याचं एक कारण म्हणजे आपल्या खाद्ययात्रेचा एक महत्त्वाचा टप्पा असणारा आंबा आपल्या परंपरेने वृद्धीच्या, सुफलनाच्या,  सातत्याच्या भावनेशी जोडला आहे. प्रांतोप्रांतीच्या आपल्या लोकगीतांमधून, लोककथांमधून, महाकाव्यांमधून, मिथकांमधून, शिल्पकृतींमधून, खाद्यकृतींमधून आपल्या कथाकारांनी, कवी-गीतकार-कलाकारांनी आंब्याच्या आपल्याशी असणाऱ्या आंब्याइतक्याच रसाळ नात्याला अजरामर करून ठेवलं आहे. आणि आपलं आंब्याबरोबरचं हे जोडलेलं असणं हे कित्येक शतकांचं आहे. खाणाऱ्या माणसाला चवी कळायला लागल्यापासून त्याच्या रसनेला भुलवणारं ‘आंबा’ नावाचं दरवर्षी न चुकता अवतरणारं हे अजब गारूड आपल्याशी समरसून गेलंय. मनसोक्त आंबे खाणं हे कोणत्याही परिस्थितीत तृप्तीची परिसीमा गाठणारं असतं. कधीतरी कुठल्या तरी शेताच्या बांधावर, एखाद्या अनघड घाटवाटेनं जातायेताना अवचित सापडलेली बिटकी असो की रांगोळ्या-उदबत्त्यांच्या थाटात, चांदीच्या ताटातल्या चांदीच्या वाटीत चांदीच्याच डावानी वाढलेला अस्सल हापूस आंब्याचा घासागणिक गराची गुठळी असणारा आमरस असो. आंबा हे असं एक फळ आहे, ज्याचं आवडणं आपण गृहीतच धरलेलं असतं.

तरीही आंब्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आंब्याला या सगळ्याच्या पलीकडे घेऊन जातं. हे एकच फळ असं असावं ज्याच्या जोडलेल्या प्रत्येक गोष्टीचं फक्त कौतुक असतं. त्याच्या येण्याच्या चर्चा झडतात -मग ते येणं वेळेवर येणं असूदे की वेळ टळून गेल्यानंतरचं, त्याचं असणं जसं चर्चेत असतं तसं त्याच्या नसण्याच्याही चर्चा असतात. त्याच्या चवीचं कौतुक असतं, त्याच्या रंगाचं कौतुक असतं. कच्च्या आंबटढाण कैऱ्यांचही कौतुक असतं आणि पिकलेल्या आंब्याच्या गोडीचं कौतुक तर असतंच असतं. आंबा आवडतो याचं कौतुक असतंच, पण आंबा न आवडण्याचंही कौतुकच असतं. तेच कौतुक असतं त्याच्या परवडण्याचं आणि न परवडण्याचंही. 

हवामानाच्या लहरीवर  कमी-जास्त होत असलं तरी आजवर कधी त्याचं येणं चुकलेलं नाही, कधी चुकेल असं वाटतही नाही, तो येणार हे माहिती असतं तरीही त्याची वाट पाहिली जाते. मनातल्यामनात त्याच्या येण्याची एक उत्सुकता असते. तसं पाहिलं ग्रीष्माची चाहूल लागल्यापासून त्याच्या येण्याची द्वाही फिरलेली असते. उत्तरायण सुरू होताना निसर्ग कात टाकायला लागतो. ऋतू बदलाबरोबर त्याचं येणंही रानाला जाणवायला लागलेलं असतं. तो येणार याची खात्री असतेच. तरीही त्याचा प्रत्येक चाहता स्वतःच्याही नकळत त्याची वाट पाहण्याचा खेळ स्वतःशीच खेळत असतो. 

आंब्याची, ‘मँगिफेरा इंडिका’ची ही कौतुककहाणीही गावागणिक, डोंगरागणिक, जमिनीच्या पोतागणिक, पाण्याच्या गुणधर्मागणिक बदलत जात असते. कुठे त्याच्याशी जोडलेल्या भावना असतात, आठवणी असतात,  कुठे तो जगण्याचा आधार असतो. 

भारतभरामधल्या आंब्याच्या एकूण वाणांचा विचार केला, तर फळ म्हणून आंबा वर्षभर आपल्या आजूबाजूला असतो. पण त्याच्या एकाएका वैशिष्ट्यपूर्ण वाणांचा वावर जेमतेम दोनचार महिन्यांचाच. आपल्या मनातल्या आंब्याच्या हंगामाची सुरुवात होते ती हापूसच्या येण्यानं. हापूसचं येणं काळाच्या एका तुकड्यातलं; त्याला जोडून आगेमागेच पायरी, केसर असे कितीतरी. एकामागे एक येणाऱ्या आंब्यांच्या वाणांचंही कौतुकच. ह्या कौतुकयात्रेत काळाबरोबर आंबाही बदलतो आहे, कात टाकतो आहे, बदलत्या हवामानाला तोंड देताना बदलतं तंत्रज्ञान स्वीकारतो आहे. उत्पादनवृद्धीपासून ते साठवणूक, वाहतूक, विक्री, प्रक्रिया या सगळ्यांमध्ये अडचणी होत्या, आहेतही. त्यावर मार्ग शोधण्याची धडपडही आहे. भौगोलिक मानांकनासारख्या नव्या कल्पना अंगीकारून भारतातला आंबा जगातल्या बाजारपेठांशी स्पर्धा करण्याची मानसिकता स्वीकारतो आहे. व्यापारीदृष्ट्या आंब्याचं उत्पादन करण्याविषयी पहिली चर्चा सापडते ती वनस्पतीशास्त्रज्ञ जॉर्ज मार्शल वुड्रो यांच्या ‘मँगो’ नावाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत. पुण्याच्या त्यावेळच्या बॉटनी कॉलेजमध्ये प्राध्यापक असणारे जॉर्ज वुड्रो रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीचे फेलो होते. त्यानंतरच्या एकशे अठरा वर्षांत आंब्यानी खूप मजल मारली आहे. भारतातून आफ्रिकेत, तिथून युरोपात, अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात गेलेला आंबा आता नव्या वाणांच्या रूपानं एक वर्तुळ पूर्ण करत परततो आहे, हेदेखील कौतुकच.

भारतातल्या कला आणि साहित्यात सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळवलेल्या फळाचं वैशिष्ट्य ते हेच, तुम्हाला आम्हाला असणारं कौतुक – त्याच्या गोडीचं आणि त्याच्या आंबटपणाचंही.

 

संबंधित बातम्या