यशोमार्ग व्हावा आनंदाचा मार्ग!

-
सोमवार, 27 जून 2022

संपादकीय

कोणीही कितीही म्हटलं तरी आपल्याकडे दहावी व बारावी हे दोन टप्पे लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता पुढे काय, या महत्त्वाच्या प्रश्नाच्या उत्तरांकडे नेणारे टप्पे आहेत, ह्यात शंका असण्याचे कारण नाही. कारण या टप्प्यांवरच्या दोन परीक्षांच्यानंतरच विविध अभ्यासक्रमांचे मार्ग खुले होत असतात. त्यामुळे पुढच्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचंय याचा निर्णय या टप्प्यांवर पोचतानाच होणे अनेक अर्थांनी आवश्यक ठरते. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आताच्या पिढीच्या दृष्टीने त्यांच्या आई-बाबांच्या किंवा आजी-आजोबांच्या तुलनेत करिअरच्या मार्गाची निवड काहीशी जटिल होऊन बसली आहे. 

जागतिकीकरणाने, खुल्या स्पर्धेने, बदलत्या तंत्रज्ञानाने आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात मोठे बदल घडवून आणले. आजूबाजूची परिस्थिती, राहणीमान, गरजा आणि त्याच्या जोडीला आपल्या आकांक्षामध्येही मोठे बदल झाले आहेत, होत आहेत, होणारही आहेत. याच बदलांचा परिपाक म्हणून अनेक व्यवसायांनी कात टाकली, अनेक व्यवसाय इतिहासजमा झाले आणि त्यांच्याच जोडीला कितीतरी नवे व्यवसाय निर्माण झाले, नव्या वाटा खुल्या झाल्या. या नव्या व्यवसायांना लागणारी नवी कौशल्ये आता आवश्यक ठरू लागली आहेत. एका कोणत्यातरी विद्याशाखेचे शिक्षण घ्यायचे आणि त्या बळावर नोकरी मिळवायची किंवा व्यवसाय थाटायचा आणि नाइलाजच झाला तर काही थोडेफार बदल स्वीकारत मार्गक्रमण करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. आजच्या काळातले करिअरचे निर्णय केवळ ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ पद्धतीने किंवा कोणत्यातरी अथवा कोणाच्यातरी प्रभावाखाली घेतलेल्या निर्णयापुरते उरलेले नाहीत. म्हणूनच दहावी-बारावीच्या गुणांचा भविष्यातली दिशा ठरविण्यातला वाटा अजूनही नजरेआड करता येत नसला, तरी आता त्या टप्प्यावर पोचण्याच्या आधीच हा पुढचा मार्ग स्वीकारण्याच्या दिशेने काही वाटचाल करण्याची तयारी ठेवण्याची वेळ आली आहे.

‘सकाळ साप्ताहिक’च्या या करिअर विशेषांकासाठी लिखाण करणाऱ्या सगळ्याच तज्ज्ञांनी अधोरेखित केल्याप्रमाणे यात मुलांपेक्षाही आताच्या या काळात त्यांच्या पालकाची भूमिका काहीशी महत्त्वाची ठरताना दिसते आहे. समुपदेशन तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख या अंकातल्या त्यांच्या लेखात लिहितात त्याप्रमाणे, आपल्याला वाटत असतात तेवढी मुलं लहान नसतात आणि आपल्या अपेक्षांना पुरी पडतील एवढी परिपक्वही नसतात. त्यामुळे इथे मुलांच्या बोटाला धरून, त्यांच्या आवडीनिवडी, कल यांविषयी त्यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा अंदाज घेऊन, आणि त्याबरोबर त्यांच्या बरोबरीने उभे राहण्याच्या आपल्याही क्षमतांचा अंदाज घेऊन मुलाला-मुलीला करिअर नावाच्या वाटेची ओळख करून देणे आवश्यक झाले आहे. करिअरचे कल्पनेच्या बाहेरचे ऑप्शन असताना, आणि निर्माण होत असण्याच्या काळात; आपल्या आयुष्यातल्या बदलांना तोंड देत असतानाच, मुलांच्या भविष्याला आकार देऊ शकणारे वर्तमानातले बदल समजावून घ्यायचे हा पालकांच्या आताच्या पिढीच्या प्रवासातला कदाचित सर्वात अवघड भाग ठरतो आहे. त्या दृष्टीनेही या सगळ्या प्रक्रियेकडे पाहायला हवे. त्यानंतरच करिअरबद्दलचे निर्णय घ्यायला हवेत. प्रयत्न मात्र कुठलेही करिअर निवडले तरी तो आनंदमार्ग व्हावा याच दिशेने असणे अधिक श्रेयस्कर.

आपली आवड आणि छंद याला अनुरूप नोकरी मिळणे किंवा त्या छंदाचं अथवा आवडीचं व्यवसायात रूपांतर करता येणे हे करिअरसाठी वरदानच असतं, पण प्रत्येकवेळी असं घडतंच असं नाही, त्यामुळे काय करायचंय यावर जेवढ्या वेळेत विचार करायला सुरुवात होईल तेवढी ती वाटचाल सुकर असेल. त्या दिशेच्या वाटचालीची सुरवात मात्र सजगपणे व्हायला हवी. 

मी डॉक्टर होणार, इंजिनिअर होणार किंवा नव्या तंत्रयुगावर स्वार होणार, असे नुसते म्हणून चालत नाही. त्यासाठी आपल्याला काय तयारी करायची आहे हे मुला-मुलींनी आणि त्याच्या पालकांनीही समजून घ्यायला हवे, तसेच त्यासाठी आपल्यात काय बदल करायला हवेत, याचीही नोंद घ्यायला हवी. करिअर एका रात्रीत घडत नसते. त्याला मेहनत लागते आणि आपल्याला ध्येयाची जाणीव ठेवून तसे सतत प्रयत्न करावे लागतात. ध्येय निश्‍चित करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हाच प्रवास असतो. तो प्रवास आज करिअरची वाट निवडताना सुरू होत असतो. तो आनंदमार्ग होण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. त्यासाठी लागते ते काटेकोर नियोजन आणि त्या नियोजनानुसार अंमलबजावणी.

तुमचा हा प्रवास जेव्हा गंभीरपणे होणाऱ्या सततच्या प्रयत्नाचा भाग होतो तेव्हा ती एक साधना होते. ही साधनाच तुम्हाला ध्येयापर्यंत नेते आणि मग यशाचे शिखर गाठता येते. यशोशिखराचा हा टप्पा गाठण्याचा निर्णय तुम्हाला सर्वांना अधिक सजगपणे घेता येवो, याच शुभेच्छा!

संबंधित बातम्या