लोकप्रयत्न

-
सोमवार, 4 जुलै 2022

संपादकीय

तेशिमा हे जपानच्या कागावा प्रिफेक्चर मधलं एक छोटसं बेट. छोटं म्हणजे किती? तर तेशिमाचं क्षेत्रफळ अवघं साडेचौदा चौरस किलोमीटरचं आणि लोकसंख्या जेमतेम हजारभर. म्हणजे आपल्या महानगरांमधल्या कित्येक नव्या हाउसिंग कॉम्प्लेक्ससुद्धा या इटुकल्या बेटापेक्षा मोठ्या असतील. तेशिमा जगाला माहिती आहे ते एकीकडे तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण कला-संग्रहालयासाठी, खास सायकलींगसाठीच्या तिथल्या रस्त्यांसाठी, दर तीन वर्षांनी होणाऱ्या सेटौची कला महोत्सवासाठी आणि दुसरीकडे (गेल्या काही काळापर्यंत अस्तित्वात असणाऱ्या) समुद्रालगतच्या एका छोट्या भागात एकेकाळी असणाऱ्या काळजीकरण्याजोग्या प्रदूषणकारी औद्योगिक कचरा डेपोसाठी. 

इथलं मुलखावेगळं संग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संग्रहालयात केवळ एकच कलाकृती आहे. मॅट्रिक्स किंवा जपानी भाषेत बोकेई. अस्तित्वाच्या गूढाचा शोध घेणारे शिल्पकार रेई नाईटो यांची ही शिल्पकृती या आगळ्यावेगळ्या बांधणीच्या कला-संग्रहालयात मांडलेली आहे.

तेशिमा अलीकडे बातम्यांमध्ये होतं ते त्याच्या दुसऱ्या ओळखीच्या निमित्ताने; खरंतर ती पुसण्याच्या निमित्ताने. गेल्या तीस वर्षांपासून तेशिमावासीय आपल्या ओळखीतला इंडस्ट्रिअल डम्प किंवा ‘कचऱ्याचे बेट’ हा भाग पुसण्यासाठी धडपडत होते. ह्या लोकचळवळीला यश आल्याचे वृत्त ‘द गार्डियन’ने नुकतेच दिले आहे. एकेकाळी तेशिमावर बेकायदा आणून टाकला जाणाऱ्या, परिसराच्या पर्यावरणावर घातक परिणाम करणाऱ्या कचऱ्याचा काही भाग आजही बघायला मिळतो –तोही त्याविषयीच्या  संग्रहालयात. लोकचळवळीची स्मृती म्हणून हे संग्रहालय उभारण्यात आल्याचं ‘द गार्डियन’च्या वृत्तात म्हटले आहे.

प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन याच मुद्द्यांशी निगडित असलेल्या अलीकडच्या लक्ष वेधून घेणाऱ्या आणखी दोन बातम्या होत्या प्लॅस्टिकविषयी. ‘द जर्नल फॉर नेचर कॉन्झर्व्हेशन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाने वन्यप्राण्यांच्या पोटात जाणाऱ्या प्लॅस्टिक आणि मानवनिर्मित अन्य घातक कचऱ्याकडे लक्ष वेधले आहे. उत्तराखंडातल्या संरक्षित वनांमधून अभ्यासकांनी गोळा केलेल्या हत्तीच्या विष्ठेत प्लॅस्टिक, काचांचे आणि धातूंचे तुकडे, रबर बॅण्ड अशा वस्तू सापडल्याचे हा अभ्यास सांगतो. या वनांलगतच्या भागातल्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये अन्न शोधणाऱ्या हत्तींच्या खाण्यात अशा घातक वस्तू येत असणार, असा वन्यजीव अभ्यासकांचा कयास होताच. मात्र या स्वरूपाचे नेमके निष्कर्ष मांडणाऱ्या या पहिल्याच अभ्यासाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. न खाल्लेले अन्न प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून कचऱ्यात फेकण्याच्या माणसांच्या सवयीतून ते प्लॅस्टिक वन्यप्राण्यांच्या पोटात जाते, असा ह्या अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. वनांमधल्या अन्य प्राण्यांसाठीही हे  धोकादायक ठरू शकते. कचऱ्यात टाकलेल्या अन्नपदार्थांसाठी वन्यप्राणी माणसांच्या वस्तीजवळ आल्याच्या घटना यापूर्वीही घडल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात.
अंटार्क्टिकावरील हिमकणांमध्येही प्लॅस्टिकच्या कणांनी घुसखोरी केल्याचे आपण याआधी वाचले आहेच. (प्लॅस्टिक कोटेड जगाची घुसमट, सकाळ साप्ताहिक, २५ जून, २०२२) अंटार्क्टिकावरील हिमनग वितळण्याचा वेग वाढण्यास हे प्लॅस्टिक कारणीभूत ठरू शकते, असे ‘क्रायोस्फिअर’ या विज्ञाननियतकालिकातील संशोधन-लेखात म्हटले आहे. संशोधकांच्या मते ही मोठ्या धोक्याची घंटा आहे.
प्लॅस्टिकला इकोफ्रेंडली पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे याच लेखात म्हटले होते. त्या प्रयत्नांचे भवितव्य नेमके काय असेल, याबाबत काही ठोस उत्तर देणे आजमितीस तरी शक्य नाही, असे सांगितले जाते. शिवाय अशा प्रयोगासाठी आणि प्रयोग यशस्वी झाले तर अशा इकोफ्रेंडली प्लॅस्टिकच्या प्रत्यक्ष उत्पादनासाठी येणारा खर्च, त्याच्या वापरासाठी मोजावी लागणारी किंमत या सगळ्याच बाबींचा विचार करावा लागेल.

इथे लोकप्रयत्न कळीचे ठरू शकतात. निसर्गात फेकला जाणाऱ्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून; ओला आणि सुका, सेंद्रिय आणि असेंद्रिय कचरा वेगवेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न अधिक प्रमाणात केले गेले तर शहरोशहरी दिसणाऱ्या ‘कचऱ्याच्या बेटांवर’ काही नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आत्तापेक्षा अधिक परिणामकारक व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करताना; कचरा करायचा सगळ्यांनी मिळून आणि त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी फक्त कोण्या एका यंत्रणेवर टाकायची ह्या प्रवृत्तीचाही पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे, हेदेखील समजावून घ्यायला हवे. वैयक्तिक पातळीवरचे कचरा-व्यवस्थापन म्हणजे तो कचरा येन-केन-प्रकारेण आपल्या नजरेआड करायचा –मग तो शेजारी ढकलायचा, रस्त्याकडेला, कोणत्याही मोकळ्या जागेत, ओढ्या-नाल्यांत, नदीत, तळ्यात, समुद्रात टाकून मोकळे व्हायचे याही वृत्तीतून स्वतःची सुटका करून घेणे आवश्यक ठरत आहे. 

कचऱ्याचे प्रमाण किती आहे? जागतिक बँकेच्या एका अंदाजानुसार २०२५पर्यंत फक्त महाराष्ट्राच्या फक्त शहरी भागातून रोज ५७,६०० टन कचरा निर्माण होणार आहे. ह्या सगळ्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण केल्याशिवाय गत्यंतर नाही, ही माहिती असलेली गोष्ट आता अमलातही यावी यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून शिक्षणाची सुरुवात करायला हवी. तरच नजीकच्या भविष्यात आपण या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने एखादे पाऊल टाकलेले असेल. अन्यथा कचऱ्याचा हा भस्मासुर त्याच्या निर्मात्याच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याच्या बेतात आहेच!

‘सकाळ साप्ताहिकाच्या’ या अंकात आपल्या घरात, परसात बाग फुलवणाऱ्या दोघीजणींनी आपले अनुभव लिहिले आहेत. घरातला ओला, सेंद्रिय कचरा बाहेर जाणार नाही, याची खात्री देण्याबरोबरच आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाणारा हा प्रयोग आपल्यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांनी, जेवढा म्हणून शक्य आहे तेवढा, करायला हरकत नाही.

संबंधित बातम्या