जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा..!

-
सोमवार, 11 जुलै 2022


संपादकीय

शेवटी व्हायचं तेच झालं. कुण्या बिराण्यानं आभाळ हिसकून नेलं पुन्यांदा. आभाळाकडं नदर लावून बसलो तरी एक कुलुंगी ढग शिवाराकडं फिरकला नाही. ‘शेतकऱ्याचा जल्मच भिकार’, हे दरवर्षीचं वाक्य स्वतःशीच उच्चारत त्यानं तिरीमिरीतच गठुळं आवाळलं, नि गावकऱ्यांच्या वारीत पाऊल घातलं. काहीही झालं तरी तो वारी चुकवत नाही. अस्तुरी-औत- पोरं-पेरण्या सगळं बैजवार मार्गी लावून तो निघतोच. गेली दोन वर्ष वारी चुकली, तेव्हा त्याला किती वाईट वाटलं होतं.

दिंडीतल्या वारकऱ्यांसंगे तो आपल्या विचारगुंत्यातच पावलं उचलत  राहिला. पावलागणिक पंढरी जवळ येत होती...

आता उरलेली कुणबीक देवानंच करावी. त्यालाही दुबार पेरणी करावीच लागंल. कुठून बीबियाणं, पैका, मजूर आणतो ते पाहू. सरकारी जित्राबं वेटोळं घालून बसलेलीच हायेत. त्यांचं डंख कसं चुकवतो ते पाहू. देवा पांडुरंगा, आता पतपेढी, काप्रेटिव, सावकार समदं तूच पाहून घे. आपल्याच्यानं आता काही ही कुणबिक झेपत नाही. सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलण्याची भाषा करणारं सरकार पाण्यातल्या म्हशीवाणी बसून हाये. त्यांच्या आधी निसर्गराजानंच उभा-आडवा सोलला, त्याचं काय? इठुराया, आता तूच उरला आहेस...

जगावं कसं?

स्वतःशीच पुटपुटत त्यानं चालण्याचा वेग वाढवला. नशिबाला, देवाला, आयुष्याला शिव्याशापांचे फटकारे लगावत तो भराभरा निघाला होता. भवतापाच्या गुंत्यात अडकलेलं मन कधी वाट मंद करत होतं. कुणीतरी विचारलं, ‘‘माऊली, थकले काय? फुडच्या शिबिरात सुई घ्या टोचून!’’ घाट वलांडून उतार लागला, तशी त्याच्या हुर्दाची उलाघाल कमी होत गेली. दुरूनच राऊळाचे कळस दिसायला लागले. हिरमुसल्या मनानं त्यानं हात जोडले. 

अथांग माणूस पसरलेला.

राऊळ जवळ आलेलं पाहून अवघी वारी हरखली होती.  ‘जय हारि विठ्ठल, जय जय विठ्ठल’, ‘ज्ञानोबामाऊली तुकाराम’च्या गजरानं परिसर दुमदुमला होता. पाहावं तिथं वैष्णवांचे जथे...

पांढरे, भगवे, तांबडे, जांभळे, हिरव्या काठपदराचे रंगच्या रंग उधळलेले. मृदुंग, एकतारी, टाळ-चिपळ्यांचा घुळघुळ नाद आसमंतात भरून राहिलेला. पांढरी कापडं घालून डागतर मंडळींचे गट गर्दीतून फिरत होते. कार्यकर्त्यांचं मोहोळ घोंघावत होतं. फटफट्या, जिपा, स्कॉर्पिओ, इनोवा... नुसता गजबजाट.

प्रत्येकाच्या डोळ्यात अवघ्या हंगामाचं सुख दाटलेलं. पावसानं हात द्यावा, काळ्या आईनं आपल्या लेकरांना महामूर पीक द्यावं, जल्माची कुणबीक सार्थकी लागावी असं समाधान नुसत्या या राऊळाच्या दर्शनानं होतं. कळस डोळ्याचं पारणं फेडतात, प्रत्येक्ष मूर्ती काय करेल?

कळसाच्या वर त्याचं ध्यान गेलं. काळे, घनगर्द मेघ ओथंबून आले होते. त्या काळ्याकरड्या मेघांमध्ये एखादी बिजली चमके. वातावरण कुंद झालं होतं. कुठल्याही क्षणी पर्जेन्य बदाबदा कोसळू लागेल. अंग ओलंचिंब हुईल. त्याचं शेतकरी मन उचंबळून आलं. डोळ्यांमधून धारा वाहू लागल्या. मनातल्या दूषणांचा क्षणार्धात विलय झाला, आणि त्याच्या देहमनात अष्टसात्त्विक भाव उमटले.  

कळसाकडे पाहात पुन्हा पुन्हा हात जोडत तो मोठ्यांदा म्हणाला, ‘‘देवराया, चुकलं-माकलं घे पदरात. अकाळ-दुकाळ वारी चुकिवली नाही. आषाढी एकादस वाया घालिवली नाही. जिमीन तुझी, बीज तुझं आणि दाणंही तुझंच. मनासारखं कर... काही मागण्याचा विषयच नाही, विठुराया!’’

त्याला एकदम गदगदून आले. तेवढ्यात आभाळातल्या जांभळ्या मेघांनी ठाव सोडला, आणि त्यांच्या पोटात साठलेल्या पर्जन्यधारा पंढरीकडे धावल्या. झिम्माड पावसाच्या सरीनं अवघे वैष्णव भिजून गेले. अंतर्बाह्य.
 

संबंधित बातम्या