चराचराच्या तृष्णापूर्तीसाठी...

-
सोमवार, 25 जुलै 2022

संपादकीय
 

“यह बारीश अक्सर गीली होती हैं…
इसे पानी भी कहते हैं…
उर्दू में आब…
मराठी में पाणी…
तमिल में तन्नी…
कन्नड़ में नीर और बांग्ला में जोल कहते हैं…
संस्कृत में जिसे वारी-नीर-अमृत-पाए-अंबू भी कहते हैं…”
“... …”

“यह पानी आँख से ढलता है तो आँसू कहलाता हैं…
लेकिन न चेहरे पे चढ जाए तो रुबाब बन जाता हैं…”
पावसाबरोबर ‘थोडासा रूमानी हो जाए’मधला, आशा पुन्हा जागवणारा, धृष्टद्युम्न पद्मनाभ प्रजापती नीलकंठ बारिशकरही आठवतो. 
तत्त्वज्ञांनी, शास्त्रज्ञांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी माणसाची व्याख्या केली आहे; माणूसपणाची लक्षणं उलगडण्याचे ते प्रयत्न. आपल्या भवतालातल्या खूपशा गोष्टी गृहीत धरणारा निसर्गातला घटक म्हणजे माणूस, अशीही काही व्याख्या त्यात आहे का, ते पाहायला हवं. मुळात आपण बऱ्याचदा आपला भवतालच गृहीत धरलेला असतो. आपल्या भवतालातल्या अनेक गोष्टी आपल्या मते जणू असतातच. पण प्रत्यक्षात खूपदा त्या असण्यापेक्षा नसल्या तरच जास्त जाणवतात!
पाणी हा असा आपल्या भवतालातला आपण गृहीत धरलेला एक घटक.
पाणी हा खरंतर सर्वव्यापी द्रव पदार्थ. पृथ्वीवर जीवोत्पत्ती झाली ती पाण्यात असं विज्ञान सांगतं. याचा अर्थ पृथ्वीवरच्या पहिल्या जीवाचा जन्म होण्याआधीपासून पाणी आहे. जळता गोळा असलेली पृथ्वी थंड होत असताना पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी बॅक्टेरियासारखा पहिला एकपेशीय जीव जन्माला आला. तिथून सुरू झालेल्या जीवसाखळीत आजच्या मानवाचं आयुष्य आहे जेमतेम दोन लाख वर्षांचं. माणसाच्याही आधीपासून अस्तित्वात असलेल्या पाण्याला आणि दरवर्षी वैशाखापासून आकाशमार्गाने येणाऱ्या नवमेघपंक्तींना आपण मात्र गृहीत धरलेलं असतं.
“महान्तं कोशमुदचा नि षिञ्च स्यन्दन्तां कुल्या विषिताः पुरस्तात्। घ्रृतेन द्यावापृथिवी व्युन्धि सुप्रपाणं भवत्वघ्ना भ्यः।।” आमच्या जीवनाचं हे विशाल पात्र जलाने भरून जाऊ दे. पाण्याचे (जीवनाचे) प्रवाह मुक्त वाहू देत आणि स्वर्ग व पृथ्वी समृद्ध होऊ देत, अमल आणि उदंड जलाने सर्व चराचराची तृष्णापूर्ती व्हावी यासाठी हे पर्जन्यदेवा तुमचे आशीर्वाद असो द्यावेत, अशी प्रार्थना पर्जन्यसूक्तातल्या एका श्लोकात केलेली आहे.
पावसाच्या देवावर सूक्ते रचताना आपल्या पूर्वजांनी आपल्या आयुष्यातलं पाण्याचं स्थानही अधोरेखित करून ठेवलं आहे. ‘इमा राष्ट्रस्य वर्धिनी’ -पाणी राष्ट्राला उन्नतीकडे नेते -असं ही सूक्त 
सांगतात.
जगण्यासाठी आपल्या निसर्गाकडून मिळत असलेल्या महत्त्वाच्या देणग्यांपैकी एक असणारं पाणी घेऊन पाऊस पुन्हा आला आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यापासून ते शेती आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या पाण्याच्या नियोजनापर्यंतची आणि त्या पलीकडे जाणारी बाजारपेठेची, समाजस्वास्थ्याचीही अनेक गणितं पावसाच्या वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पडण्याशी बांधलेली असतात, हे लक्षात 
घेतलं तर पावसाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व कदाचित पुरतं ध्यानी येईल.
पावसाच्या या आनंद सरी आपल्यासाठी पाण्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन येत असतात -ग्रीष्माच्या तडाख्यानंतर पुन्हा सगळं काही फुलणार आहे, या आशेचा तो हवाहवासा सांगावा असतो.
आपल्याला दुष्काळ आणि वाळवंटीकरणाचा सामना करायचा आहे, याची जगाला जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी एक दिवस राखून ठेवला आहे. महिन्याभरापूर्वी जूनच्या सतरा तारखेला जगाने हा दिवस साजरा केला. त्याआधी मार्चच्या बावीस तारखेला आंतरराष्ट्रीय जलदिन आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तेवीस तारखेला आंतरराष्ट्रीय हवामान दिनही साजरा झाला. एकेका दिवसांचे हे कार्यक्रम आता जगण्याचा भाग म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे, याची खूणगाठ आता आपल्याच मनाशी बांधायला हवी. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाचं जगण्याच्या गुणवत्तेशी असलेलं नातं. हे नातं समृद्ध करून पुढच्या पिढ्यांकडे सोपवण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. आणि भवतालाला गृहीत न धरता, त्यातल्या प्रत्येक घटकावरच्या आपल्या अवलंबित्वाचा सजग धांडोळा घेऊन आपल्यालाच ती जबाबदारी पार पाडायची आहे.
जगभरात गेल्या काही वर्षांपासून जाणवणाऱ्या हवामान बदलांमुळे पावसाचं तंत्र बिघडतंय, असं देशोदेशींचे संशोधक आपल्याला सांगत होते; आता ते आपल्याही जाणवायला लागलंय.
कोसळत्या जलधारांचं स्वागत करताना, पाऊस अनुभवताना, पावसाची गाणी पुन्हा नव्याने गाताना आपल्याला या बदलांनी निर्माण केलेल्या आव्हानांवरही विचार करावा लागणार आहे, याची जाणीव आता क्षणभरही विसरता येणार नाही. एकीकडे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगतीची शिखरं सर करीत असताना, माणसाचं जगणं सुखकर करण्याचं, चंद्र-तारे तोडून आणण्याची स्वप्न पाहात असताना; अतिवृष्टी, महापूर, त्यातून होणारं नुकसान आणि दुसरीकडे माणसांना अनिश्‍चितीकडे ढकलणारे पाण्याचे दुर्भिक्ष या सगळ्याचा पुन्हापुन्हा नव्यानं विचार करावा लागेल. निसर्गातल्या कोणत्याच घटकाला गृहीत न धरता त्या घटकांसह माणसाचा विचार केला तरच ‘पृथिवी सस्यशालिनी’ व्हावी ही प्रार्थना फलद्रूप होईल.

संबंधित बातम्या