रंग मेंदीचा

-
सोमवार, 1 ऑगस्ट 2022

संपादकीय
 

खरंतर गुरुपौर्णिमेपासूनच श्रावणाचे वेध लागलेले असतात, आणि सणावारांची, व्रतवैकल्यांची - त्या निमित्तानं होणाऱ्या पूजांची, घरगुती समारंभांची चाहूल लागलेली असते. सृष्टीला सौंदर्याचं लेणं देत श्रावण येतो तोच आनंदभरल्या सणांच्या मालिकेची द्वाही फिरवत. आणि श्रावणात तर प्रत्येक तिथीचं महत्त्व वेगळं; माणसाला जगविणाऱ्या, त्याच्या आयुष्याला आधार देणाऱ्या निसर्गाशी, परंपरांशी जोडणारं.

श्रावणाबरोबर श्रावणसरींइतकीच जोडली गेलेली; शृंगारप्रिय स्त्री-पुरुषांच्या सौंदर्यात आणि समारंभाच्या आनंदात भर घालणारी चीज म्हणजे मेंदी. आणि गेल्या काही दशकांपासून तर श्रावणाबरोबर जोडलेल्या या मेंदीने लग्नसोहोळे आणि अन्य कौटुंबिक समारंभांबरोबर पक्कं नातं जुळवलेले आहे. 

मेंदीच्या पानांतील रंगद्रव्यामुळं, आणि फुलांपासून मिळणाऱ्या हिना अत्तरामुळं तिला व्यापारी महत्त्व प्राप्त झालं. स्त्रियांच्या शृंगारामध्ये तर हिरव्या-लाल मेंदीचं महत्त्व अनन्यसाधारण! तळहात, तळपाय, नखं रंगवण्यासाठी अळत्यासारख्या नैसर्गिक पदार्थांंचा वापर आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या याच मालिकेतली ही मेंदी. 

आज जगभरात काहीशे कोटी रुपयांची उलाढाल करणारी मेंदी मूळची इजिप्तमधील असावी, असं मानलं जातं. इ.स.पू. २१६०-१७८८ या काळातील इजिप्तमधील राजवंशातील एका ममीच्या हाताची बोटं मेंदीनं रंगविलेली असल्याचे उल्लेख सापडतात. विश्वकोशातल्या नोंदीनुसार, भारतामध्ये मेंदीची आयात झाली ती इ.स.११००च्या आधी कधीतरी. 

आजही सणवार, लग्नसमारंभ आणि वास्तुशांत, बारशासारख्या अन्य सोहळ्यांमध्ये मेंदी आवर्जून काढली जाते. विवाहादी सोहळ्यांमध्ये परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांच्या फॅशन कालानुरूप बदलल्या असल्या, तरी हातापायांवर मेंदीचं लालचुटूक रंगणं काही बदललं नाही. अलीकडे तर डोहाळे जेवणाला बेबी बम्पवरही मेंदी काढली जाते. आणि तरुण मुलींमध्ये पाठीवर ‘ब्लाऊज मेंदी’ काढून घेण्याचा ट्रेंड आहे. इतकंच नाही, तर टॅटूला पर्याय म्हणूनही मेंदीकडं पाहिलं जातं. 

थोडक्यात काय, तर पूर्वापार चालत आलेल्या मेंदीची लोकप्रियता काकणभरही कमी झालेली नाही, हे लक्षात यायला हातच्या काकणाचाच आरसा हवा असंच काही नाही. 

हातात आणि मनातही कला असेल आणि कष्टाची तयारी असेल तर ‘मेंदी आर्टिस्ट’ म्हणून करिअर घडवता येऊ शकतं हेदेखील आता स्पष्ट झालं आहे. तसं पाहायला गेलं तर मेंदी आर्टिस्ट म्हणून व्यवसाय सुरू करायला फार भांडवल लागत नाही. अगदी शंभर रुपयांपासूनही सुरुवात करता येते. वेगळी जागाही लागत नाही. पण हातात कला मात्र हवी, आणि अर्थातच आवडही. कारण नुसतं क्लासमध्ये शिकून टेक्निक साधता येतं. पण त्यात स्वतःचं कलात्मक वेगळेपण ओतावं लागतंच. वेळेचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं आणि अंग मोडून कष्ट केले तर हा उत्पन्नाचा एक उत्तम स्रोत होऊ शकतो, असं तज्ज्ञ मेंदी आर्टिस्ट सांगतात. कोरोनाच्या कठीण काळामध्ये अनेक जणींना या वैयक्तिक किंवा समूह पातळीवरही शक्य असलेल्या व्यवसायाने हात दिल्याची उदाहरणेही सांगितली जातात.

मेंदी रेखाटनाच्या ऑर्डरही घेता येतात किंवा घरच्याघरीच क्लास सुरू करता येतो. हा व्यवसाय एकेकट्याला करता येतो आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवायचा असेल, तर स्वतःची टीमही तयार करता येते. अर्थार्जनासोबत नावही कमवता येतं. झटपट कामांच्या जमान्यात मेंदी रेखाटनाइतकाच मेंदी रेखाटनाच्या तयारीच्याही व्यवसायानेही आकार घेतला आहे. मेंदी गाळणं, ती योग्य पद्धतीनं भिजवणं, कोन तयार करणं आणि अगदी त्यासाठीची सामग्री तयार करणं, हा सुद्धा आता तितकाच महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. 

सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर असंख्य संधींचा धांडोळा घेणं आता फार अवघड राहिलेलं नाही. परंपरांशी जोडलेला वारसा आणखी समृद्ध करायला वाव देणारी ही मेंदी रेखाटनं; कलासक्त मन आणि शिकण्यातलं सातत्य या दोन भक्कम आधारांच्या साह्यानं आपल्या आयुष्याचे रंग खुलवत राहो, अशीच सदिच्छा!

 

संबंधित बातम्या