देहावरचा अधिकार

ऋता बावडेकर
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

संपादकीय
मुलगी जन्माला येते, त्याला मुख्य पुरुष जबाबदार असतो हे सगळे जाणत असतात. पण तरीही त्याचे खापर स्त्रीवरच फोडले जाते कारण ते सोपे असते आणि आपल्या संस्कृतीत पुरुषाचे स्थान नेहमीच वरचे मानले गेले आहे.

आपला अधिकार नेमका कशावर असतो? आपल्या नावावरचे घर यापासून ही यादी सुरू होते, ती जमीन, दागिने, नवरा, बायको, मुले, आई वडील... अशी कितीही लांबवता येऊ शकते. मात्र या यादीत स्वतःचे शरीर हा उल्लेख कधीच नसतो. तो अनवधानाने येत नाही असे नाही, तर आपल्या शरीरावर आपलाच अधिकार असे गृहीत तरी धरले जाते किंवा त्यात काय वेगळा उल्लेख करायचा असा तरी भाव असतो. मात्र आपल्या देहावर स्त्रीचा पूर्ण अधिकार असतो, असा महत्त्वपूर्ण निकाल देऊन न्यायालयाने हा मुद्दा अधोरेखित केला आहे. 

या प्रकरणातील नऊ वर्षांची मुलगी आपल्या आईबरोबर बाजारात गेली होती. तेथे छबीराम या व्यक्तीने तिला अयोग्यरीतीने स्पर्श केला. तिने हा प्रकार लगेच आईला सांगितला. आईच्या तक्रारीवरून छबीरामला पकडण्यात आले. ‘स्त्रीचा देह हा सर्वस्वी तिचाच असतो व त्यावर फक्त तिचाच अधिकार असतो. स्त्रीचे वय कितीही असले, तरी तिच्या परवानगीशिवाय कोणीही तिला कोणत्याही प्रकारे स्पर्श करू शकत नाही. तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीराला स्पर्श करणे हा देखील लैंगिक अत्याचार आहे,’ असा निर्णय दिल्लीच्या न्यायालयाने या प्रकरणात दिला आहे. छबीरामला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या दहा हजारातील पाच हजार रुपये त्या मुलीला द्यावेत असा आदेशही देण्यात आला आहे. तसेच राज्य सेवा विधी प्राधिकरणाने भरपाई म्हणून मुलीला पन्नास हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. 

हल्ली बलात्काराच्या घटना वाढलेल्या दिसतात. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण म्हणायला हवा. कारण काही अत्याचार झाला, प्रकरण गाजू लागले की मुली-महिलांचे पोशाख, त्यांचे वागणे, त्यांचे संस्कार अशी चोफेर टीका त्या महिलांवरच होऊ लागते.. आणि झाल्या प्रकाराला त्याच कशा जबाबदार आहेत हे सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू होतात. त्यामुळे स्त्री-देहावर केवळ तिचाच अधिकार होतो हे न्यायालयानेच स्पष्ट केले ते बरे झाले. खरे तर असे स्पष्ट करण्याची वेळ यावी हे दुर्दैव म्हणायला हवे. एकविसाव्या शतकात, आपल्या देहावर स्त्रीचा स्वतःचा अधिकार आहे, असे सांगण्याची वेळ यावी ही नामुष्कीची गोष्ट आहे. पण असे म्हणून हा मुद्दा टाळण्यापेक्षा न्यायालयाने ते स्पष्ट केले तेही बरेच केले. 

आपल्याकडे मुळातच या गोष्टींची समज किंवा जाणीव खूप कमी आहे. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. मुलीवर नेहमीच आईवडील, भाऊ, कुटुंबीय यांचा अधिकार असतो. लग्नानंतर त्यात नवरा, सासरची मंडळी यांची भर पडते. म्हातारपणी मुले येतात. एकूण स्त्री तिची स्वतःची कधीच नसते. गंमत म्हणजे याची जाणीव खूप कमी मुलींना-महिलांना असते. एरवी तिच्याबरोबर सगळेच तिला गृहीत धरत असतात. त्यामुळे मनाविरुद्ध काही घडले (जे बरेच वेळा नेहमीच घडत असते), तरी ती बाईही त्याकडे ‘काय करायचे?’ असे म्हणून दुर्लक्ष तरी करते किंवा झुरत राहते. स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या घटनाही समोर आल्या आहेत. केवळ कुटुंबातच नाही, स्त्री ‘बाहेर’ पडली तरी तिला असे अनुभव येतात. ती रात्री फिरताना दिसली, तोकडे कपडे घातलेली दिसली, मोकळेपणाने हसता-बोलताना दिसली; तरी अनेक जण तिला ‘गृहीत’ धरून त्रास द्यायला लागतात. आपली लायकी काय, याचा जराही विचार ते करत नाहीत. त्यामुळे न्यायालयाने सुनावले ते बरेच झाले. 

पण केवळ स्त्रीच का? ही गोष्ट पुरुषांनाही काही प्रमाणात लागू आहे. त्यांनाही अनेकवेळा या अनुभवातून जावे लागते. अलीकडे पुरुषांवरील अत्याचारांच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. त्यातही लहान मुलगे या वासनेला अधिक बळी पडत असल्याचे दिसते आहे. 

मात्र अत्याचार, विटंबना फक्त देहाचीच होत नाही. मनाचीही होत असते, किंबहुना मनाची अधिक होत असते. अनेक घरांत - मुलगी झाली म्हणून तिच्या जन्माचा उद्धार होत असतो, घालून पाडून बोलले जाते, प्रसंगी मारझोडही होते. दुर्दैवाने यात महिला सदस्यांचाही सहभाग असतो. अनेकदा तो उद्विग्नतेतून असतो, पण असतो. त्याचे काय करायचे? एखाद्या मुलीवर अत्याचार झालाच तर घरच्यांबरोबरच समाजाच्याही विखारी नजरांचा सामना तिला करावा लागतो. त्यावेळी तिला काय वाटत असेल हे तीच जाणे. तिचा काहीही दोष नसताना सगळे तिलाच बोल लावत असतात. त्यातूनच अत्याचार झालेल्या एका मुलीने आत्महत्या करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. काही मुली तोंड लपवून घरात बसतात. काही जीवन संपवतात. ज्या धाडस दाखवतात, त्यांचे खच्चीकरण करण्याचा एकही प्रयत्न समाज सोडत नाही. 

वास्तविक, जे काही चालले आहे त्याची कल्पना सगळ्यांनाच असते. मुलगी जन्माला येते, त्याला मुख्य पुरुष जबाबदार असतो हे सगळे जाणत असतात. पण तरीही त्याचे खापर स्त्रीवरच फोडले जाते कारण ते सोपे असते आणि आपल्या संस्कृतीत पुरुषाचे स्थान नेहमीच वरचे मानले गेले आहे. त्याला जबाबदार धरले तर या स्थानाला तडा जाईल, ते पाप कोण घेणार? तसेच अत्याचार होतात त्यात मुलींचा काही दोष नाही, हे सगळेजण जाणत असतात. अत्याचार करणारे लेक, त्यांची ‘कीर्ती’ सगळे जाणून असतात. पण त्यांना दोष द्यायला कोणी धजावत नाही. पण दोष तर कोणाला तरी द्यायलाच हवा, मुलगी - स्त्री हे ‘सॉफ्ट टार्गेट’ बरे असते. ती उलटून बोलत नाही, जाब विचारत नाही. कारण समाज म्हणून आपण तशी सोयच ठेवलेली नाही. 

त्यामुळेच न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य वाटतो. फक्त त्याचा चुकीचा उपयोग होता कामा नये. कारण समाजातील प्रत्येक पुरुष वाईट असतो असे मानणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचप्रमाणे स्त्रीवर आपला अधिकार आहे, तो आपण कसाही वापरू शकतो हे मानणेही चूक आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायला हवे. समाजाने आपला दबाव त्यासाठी वाढवायला हवा.

संबंधित बातम्या