आत्महत्या कशासाठी? 

ऋता बावडेकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

संपादकीय
अनेकदा मुलांना आपल्या भावनिक आधाराची गरज असू शकते. त्यांची ‘स्पेस’ त्यांना जरूर द्यावी, पण ती अति होत नाही ना याचीही काळजी आपणच घ्यायला हवी. म्हणजे समाजाला आत्महत्यांचे असे हादरे कमी बसतील.

आपल्या समाजात काही गोष्टी थांबायचे नावच घेत नाहीत. उदा. महिला किंवा दुर्बलांवरील अत्याचार, त्यांचे शोषण वगैरे. त्यातच ‘आत्महत्या’ ही बाबही येते. या सगळ्या दुर्दैवी गोष्टी - घटना आहेत. खरे तर त्या पूर्णपणे थांबायला हव्यात, पण तसे होताना दिसत नाहीत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तर तरुणांचे प्रमाण जास्त आहे, ही आणखी चिंतेची बाब म्हणायला हवी. ज्या वयात आयुष्य फुलायला हवे, भरभरून त्याचा उपभोग घेतला पाहिजे, त्याच वयात ही मुले (म्हणजे मुलीही) असा टोकाचा निर्णय घेतात. 

पुण्यात नुकतीच एक घटना घडली. अश्‍विनी पांडुरंग गवारे (वय २२) या तरुणीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ती संगणक अभियंता होती. पिंगळे वस्तीत पारपत्र कार्यालय आहे. या कार्यालयाच्या सातव्या मजल्यावरून तिने उडी मारली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘ग्लोबल टॅलेंट सर्च’ या खासगी कंपनीत अश्‍विनी चार महिन्यांपासून टेलि काऊन्सेलिंगचे प्रशिक्षण घेत होती. चार दिवसांपासून ती प्रशिक्षणालाही आलेली नव्हती. त्या दिवशी सकाळी ती प्रशिक्षणाला आली आणि सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून तिने उडी मारली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या एका घटनेत चेन्नईतील चैतन्य ब्युयुरू (वय २८) या संगणक अभियंत्याने चेन्नई डोमेस्टिक टर्मिनलवरील पन्नास फूट उंचीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. बंगलोरमधील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. घटनास्थळी पोलिसांना दोन महागडे मोबाईल संच सापडले. पुलावरून उडी मारण्यापूर्वी तो मित्राशी फोनवर बोलत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ही आत्महत्या की अपघात याची शहानिशा पोलिस करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणीने मित्र त्रास देतो म्हणून वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच दिवशी तिचा वाढदिवसही होता. आदल्या दिवशी मैत्रिणींबरोबर तिने वाढदिवस साजरा केला होता. नागपूरमधील एका तरुणीचे लग्न ठरले होते. साखरपुडाही झाला होता. पण तिचा पूर्वीचा मित्र तिला त्रास देऊ लागला. त्याला कंटाळून तिने विष पिऊन आत्महत्या केली. तसे करताना तिने त्याचा व्हिडिओही काढला. अशाच एका घटनेत एका अल्पवयीन मुलीने शेजारचा तरुण त्रास देतो म्हणून आईवडील कामाला बाहेर गेल्यावर घरात जाळून घेऊन आत्महत्या केली. 

पहिल्या दोन घटनांमधील आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण बाकी घटनांमध्ये कोणीतरी त्रास देते आहे, त्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी संबंधित तरुणींनी जीवनच संपविण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. अर्थात या संदर्भात पोलिस संबंधित त्रास देणाऱ्यांची चौकशी करत आहेत. अजून काही सिद्ध झालेले नाही. पण वरकरणी किंवा या तरुणींनी सांगितलेले कारण तरी तेच आहे. पोलिस चौकशीतून नेमके काय आहे ते स्पष्ट होईलच. पण आपले बहुमोल आयुष्य संपविण्याएवढे हे कारण मोठे आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. अनेकदा त्रास असह्य होतो, हे अगदी मान्य; पण म्हणून आपले आयुष्य आपण का संपवायचे? त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न का होत नाही? या सगळ्याचे उत्तर एक असू शकते, ते म्हणजे संवादाचा अभाव! आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपण, ही तरुण मुले सतत कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियावर असतात. व्यक्त (?) होत असतात; मग त्यांच्यात संवादाचा अभाव कसा? असा प्रश्‍न कोणाला पडू शकेल. पण या प्रश्‍नाचे हेच इंगित आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणे म्हणजे काही सगळे नव्हे. तिथे तुम्ही व्यक्त होता, तुमची फ्रेंडलिस्टही खूप मोठी असू शकते. पण म्हणून तुमचा कोणाबरोबर संवाद होतो असा त्याचा अर्थ होत नाही. व्यक्ती एकतर्फी व्यक्त होत राहते. त्याला लाइक्‍सही कदाचित येत असतील पण या गोष्टी ‘संवादा’ची जागा घेत नाहीत - घेऊ शकत नाहीत आणि एकटे पडण्याचे, एकलकोंडे होण्याचे हेच खरे कारण आहे. आपल्याला काय त्रास आहे, आपल्याला काय वाटते किंवा एखाद्या प्रसंगातून मार्ग कसा काढायचा हे प्रत्येक वेळी एकटा माणूस करू शकत नाही. त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार त्याला या गोष्टींत मदत करू शकतो. पण एखाद्याला मित्रच नसतील किंवा विश्‍वासाने बोलावे असे कोणीच नसेल किंवा तसे कोणी नाही असे वाटत असेल तर कोंडी होते.. आणि अशा निराशाजनक काळात असा आततायी, अविचारी निर्णय घेतला जाऊ शकतो. 

इंग्लंडमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण घेण्यात आले. त्यामध्येही हेच निरीक्षण नोंदविण्यात आले आहे, की १८ ते २४ वयोगटातील ४४ टक्के मुलांना सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी बोलताना बरे वाटते. केवळ ३७ टक्के मुलांना अनोळखी लोकांबरोबर थेट बोलायला आवडते. याच वयोगटातील अनेक मुले आपल्या शेजाऱ्यांबरोबरही बोललेले नाहीत. ही मुले समाजात वावरताना एकटी पडलेली आढळतात. 

अर्थात हा दोष केवळ या मुलांचा नाही. तर कुटुंब - कुटुंबातील व्यक्ती, समाज - समाजातील घटक म्हणून आपण अपयशी ठरलेलो आहोत. या मुलांना त्यांच्या कोशातून आपण बाहेर काढू शकत नाही. तो (किंवा ती) असाच आहे. सतत मोबाईल, नाहीतर कॉम्प्युटरमध्ये तोंड घालून बसलेला असतो, असे आपण (अनेकदा कौतुकानेही) म्हणत असतो. पण त्यात तो काय बघत असतो, का बघत असतो, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार आपण करत नाही. त्यांच्याशी संवाद साधण्याचाही प्रयत्न आपण करत नाही. उलट अनेकदा ‘नको डिस्टर्ब करायला’ अशी आपली वृत्ती असते. पण त्याचवेळी अनेकदा या मुलांना आपल्या भावनिक आधाराची गरज असू शकते. त्यांची ‘स्पेस’ त्यांना जरूर द्यावी, पण ती अति होत नाही ना याचीही काळजी आपणच घ्यायला हवी. म्हणजे समाजाला आत्महत्यांचे असे हादरे कमी बसतील.

संबंधित बातम्या