मुलगी अजूनही नकोशीच? 

ऋता बावडेकर
शुक्रवार, 2 मार्च 2018

संपादकीय

मुलगी-स्त्री म्हणून तिला काही नाकारणे योग्य नाही. सामाजिक समतोल त्यामुळे बिघडतो हे आपण कधी लक्षात घेणार?

एकविसावे शतक आहे. मुलगा - मुलगी भेद आतापर्यंत नाहीसा व्हायला हवा. पण मधेच एखादी अशी बातमी कानावर येते, की हा भेद कमी होण्याऐवजी वाढलाय की काय अशी शंका येऊ लागते. आजच्या काळात मुलींनी - महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले असताना, अजूनही करत असताना त्यांना इतकी हीन वागणूक का मिळावी? प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. 

पिंपरीमध्ये घडलेल्या एका घटनेने हा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. येथील एका दांपत्याचे परस्परांशी अजिबात पटत नाही. सतत भांडणे होतात. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचे ठरवले. त्यावेळी प्रश्‍न आला दोन मुलांचा एक मुलगी आणि एक मुलगा. त्यांना कोण सांभाळणार? प्रकरण पोलिसांत गेले. पण वाद संपेना. मुलांना सांभाळण्यावरून दोघांनीही हात वर केले. त्यातही मुलाला सांभाळू, पण मुलीला नाही असे म्हणून दोघेही निघून गेले. ती रात्र पोलिसांनीच मुलांना सांभाळले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दांपत्याला बोलावून घेतले. पुन्हा तीच चर्चा, तोच वाद आणि तोच हटवादीपणा! कोणी नातेवाईकही पुढे येईना. अखेर पोलिसांनी दांपत्याला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी पतीने दोन्ही मुलांना सांभाळण्याचे आश्‍वासन देऊन जामीन मिळवला. मुलांचा प्रश्‍न सध्या सुटलेला वाटत असला, तरी या प्रकरणात पुढे काय होते हे सांगता येत नाही. यामध्ये मुलांचा - त्यातही मुलीचा काय दोष? 

पण हे काही एकमेव प्रकरण नव्हे. याच पद्धतीचे नसले, तरी मुलींना अजूनही अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागताना दिसते आहे. एकीकडे आपण प्रगतीच्या गोष्टी करतो आणि मुलींच्या बाबतीत असे मागास विचार का करतो? कोणतीही गोष्ट करायला त्यांना प्रथम नकाराचा सामना करावा लागतो. त्यानंतर तिच्यात ताकद असेल, ती जिद्दी असेल तर आपले म्हणणे ती पुढे रेटू शकते. अन्यथा गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे काही पर्याय नसतो. 

समाज जसजसा प्रगती (?) करतो आहे असे वाटते; तसतशी अनेक ठिकाणी मुलींची अधोगती होते आहे की काय, तिच्यावर बंधने लादली जात आहेत की काय, केवळ कुटुंबाकडून नाही तर समाजाकडूनही तिला विरोध होतो आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. याची पहिली पायरी म्हणजे, त्यांना जन्मच नाकारला जातो. स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण आपल्याकडे लक्षणीय आहे. तरी बरे, यामुळे हरियानात कोणती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली हे आपण जाणतो. तिथे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण प्रचंड कमी आहे. यामुळे मोठे सामाजिक, नैतिक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात - होतात. याचे भान आपल्याला कधी येणार? की मुलीच्या लग्नात हुंडा-मानपानात प्रचंड खर्च होतो, केवळ लग्नातच नव्हे तर त्यानंतरही ही मागणी सुरूच राहते; म्हणून आपण तिला तिच्या हक्काचे जीवनच नाकारणार का? हा अधिकार आपल्याला कोणी दिला. बरे, या प्रथाही आपणच सुरू केल्या आहेत. त्या आपण बंद करू शकत नाही? खोट्या प्रतिष्ठेपायी आपण आपल्याची मुलींचे आयुष्य पणाला लावणार? मुलीसाठी एवढा खर्च होऊ शकतो हे माहिती असताना आपल्या मुलाच्या लग्नात आपण त्यात काही कमी करत नाही, हा आपल्या वागण्यातला विरोधाभास आहे. तरी बरे, आईवडिलांच्या म्हातारपणात त्यांना सांभाळणाऱ्या मुलींचे प्रमाण सर्वच प्रातांत लक्षणीय आहे. 

एक खटला बाबा वीरेंद्र देव यांच्यावर सध्या सुरू आहे. त्यांच्या आश्रमात त्यांनी महिलांना डांबून ठेवले, असा त्यांच्यावर एक आरोप आहे. त्याचे समर्थन करताना त्यांचा वकील म्हणाला, ‘नारी ही नरकाचे द्वार आहे. तिला डांबूनच ठेवले पाहिजे.’ त्यावर न्यायाधीश प्रचंड भडकल्या आणि त्यांनी त्या वकिलाला ‘गेट आउट’ म्हणून न्यायालयाबाहेर हाकलून दिले. आजच्या या काळात महिलांबद्दल असा विचार - असा दृष्टिकोन असेल तर आपल्याला अजून किती पल्ला गाठावयाचा आहे, हे लक्षात यावे. आजही मुलगा व्हावा म्हणून लोक काहीही करायला तयार असलेले दिसतात. पुण्यातील एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेल्या एका गृहस्थांनी आपल्या मुलाला मुलगा व्हावा म्हणून एका मांत्रिकाची मदत घेतली. काही काळाने ते घरात विचित्र वागू लागले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. दरम्यान, घरच्यांनी शोध घेतला असता, त्यांच्या बॅंक खात्यातील तब्बल २६ लाख रुपये वेळोवेळी काढलेले दिसले. त्यानंतर चौकशी केली असता सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. सुशिक्षितांमध्ये असे प्रकार घटत असतील तर इतरांना काय दोष द्यायचा? अर्थात शिक्षण आणि संस्कार किंवा समजूतदारपणा याचा संबंध असतोच असे नाही, हेच अशा प्रकारांतून वारंवार सिद्ध होते. याउलट अनेकदा जिथे अपेक्षा नसते तिथे वेगळा अनुभव येतो. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. स्मिता कोल्हे यांनी सांगितले होते, की आदिवासी महिलांना खूप मानाने वागवतात. तिथे महिलांचा छळ, त्यांच्यावर अत्याचार असे प्रकार घडत नाहीत. हा समजूतदारपणा स्वतःला सुशिक्षित, शहरांत राहणारे लोक का दाखवू शकत नाहीत? 

अर्थात ही परिस्थिती केवळ आपल्या देशात आहे असे नाही. तर जगभर थोड्याफार फरकाने असेच चित्र दिसते. न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी एक महिला आहे. त्या गर्भवती आहेत. ही प्रेग्नन्सी आणि देशाचा कारभार त्यांना एकत्रपणे सांभाळता येणार आहे का, अशी सध्या तेथे चर्चा आहे. हॉलिवूडकडे आपण नेहमीच खूप अनिमिष नेत्रांनी बघत असतो. तिथे सगळे आलबेल असेल असे आपल्याला वाटत असते. काही दिवसांपासून आजच्या आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शक-अभिनेत्यांनी आपले कसे शोषण केले हे सांगणाऱ्या महिला पुढे येऊ लागल्या आहेत. एवढेच नव्हे, अभिनेत्रींना अभिनेत्यांप्रमाणेच मानधन मिळायला हवे, यासाठी तेथील अभिनेत्री प्रयत्न करत आहेत. अर्थात तिथे अशी परिस्थिती आहे म्हणून आपल्याकडचे वातावरण क्षम्य ठरत नाही. केवळ मुलगी-स्त्री म्हणून तिला काही नाकारणे योग्य नाही. सामाजिक समतोल त्यामुळे बिघडतो हे आपण कधी लक्षात घेणार?

संबंधित बातम्या