विकृतीचे काय करायचे? 

ऋता बावडेकर    
शुक्रवार, 16 मार्च 2018

संपादकीय    
आपल्याकडे काही विषयांवर मोकळेपणाने बोलले जात नाही. अनेकदा भावना दडपल्या जातात. ही विकृती त्यातूनही येत असावी. मात्र असे असले तरी त्याचे कदापिही समर्थन होत नाही.

समाज म्हटला, की चांगल्याबरोबरच वाईट-विकृत लोक असणारच. असे असले तरी हे प्रमाण खूप कमी, नगण्य असायला हवे. त्याचप्रमाणे चांगल्यांचा त्यांच्यावर वचक असायला पाहिजे. पण अलीकडच्या काही घटना बघितल्या तर वाईट - त्यातही विकृतांचे प्रमाण वाढते आहे की काय, त्यांचा समाजाला जास्त उपद्रव होऊ लागला आहे की काय, अशी शंका येऊ लागते. 

कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलावर मुलीने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या मुलीचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. त्या घटनेनंतर हे कुटुंब पळून गेले आहे. आपल्या नात्यातील दहा - बारा वर्षांच्या मुलाला या कुटुंबाने आपल्या घरी शिक्षणासाठी म्हणून आणले होते. पण त्यांनी त्याला शाळेत दाखलच केले नाही. ही मुलगी - तीही अल्पवयीन आहे, त्याचा रोज छळ करायची. त्याचे डोके भिंतीवर आपटायची. त्याच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके द्यायची. मुलाने हा प्रकार आईवडिलांना सांगितला. पण मुलीचे वडील निवृत्त पोलिस असल्याने गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्याची मुलाच्या पालकांची तक्रार आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकावर विशीतील एक युवती लोकलची वाट बघत असताना एक मध्यमवयीन व्यक्ती तिच्याजवळ आली आणि त्या व्यक्तीने तिला मिठीत घेऊन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यानंतर ती व्यक्ती तेवढ्याच शांतपण चालत निघून गेली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला. रेल्वेचे दोन अधिकाऱ्यांनी ते बघितले आणि त्यांनी पाठलाग करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका बसमध्ये एक पन्नाशीचा पुरुष हस्तमैथुन करताना आढळला. एका तरुणीने व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. पोलिस त्याचा तपास करत आहेत. त्यानंतर काही दिवसांनी प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत या एका शाळेजवळ थांबल्या होत्या. रस्त्याच्या पलीकडे बीएमडब्ल्यू कारचा चालक हस्तमैथुन करताना त्यांना दिसला. त्याला मारायला त्या धावल्या पण त्या येताना बघून तो गाडीतून पळून गेला. त्यानंतर चिन्मयीचे पती प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी याबद्दल ट्विट केले. त्यात त्यांनी गाडीचा नंबर दिला. त्यावरून शोध घेऊन पोलिसांनी त्या माणसाला पकडले आहे. हा माणूस जिथे उभा होता, त्यासमोर मुलींची शाळा आहे. त्यामुळे त्याचे कृत्य अधिक निंदनीय ठरते, असे चिन्मयी सुमीत म्हणतात. 

एका सोळा वर्षांच्या मुलीवर बावीस वर्षांच्या मुलाने बलात्कार केला.. आणि त्याच्या बहिणीने या घटनेचे चित्रीकरण केल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे घडली. या मुलीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर मिळालेली बातमी अधिक धक्कादायक होती. जी महिला चित्रीकरण करत होती तिने काही दिवसांपूर्वी या मुलीच्या कुटुंबातील एकाने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी त्या कुटुंबाने आपल्याविरुद्ध बनाव रचल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. कुटुंबातील हा वाद आहे, की काय याचा तपास पोलिस करत आहेत. 

हे जगासमोर आलेले प्रकार आहेत. अशा आणखी किती घटना घडत असतील, याबद्दल कल्पनाही करवत नाही. अशा घटना का घडाव्यात? आपल्या भावनांवर आपला ताबा का नसावा? भर रस्त्यावर, रहदारीच्या - गर्दीच्या ठिकाणी असे प्रकार करण्यास कोणी धजावूच कसा शकतो? समाजाचा तेवढाही धाक राहिलेला नाही? कायद्याचीही भीती वाटेनाशी झाली आहे? 

याला कुठेतरी समाज म्हणून आपणच जबाबदार आहोत की काय असे वाटू लागते. कारण एक प्रकारचे औदासीन्य आल्यासारखे वाटते. ‘आपल्याला काय त्याचे’ ही वृत्ती वाढत असल्याचे जाणवते. त्यामुळे अनेकदा समोर घटना घडत असताना कोणी मधे पडल्याचे दिसत नाही. उलट अनेक जण मदत करण्याऐवजी व्हिडिओ चित्रण करताना दिसतात. नंतर हे चित्रण सोशल मीडियावर येते, व्हायरल होते आणि संतप्त प्रतिक्रिया उमटू लागतात. पण हा विरोध केवळ प्रतिक्रियांपुरताच राहतो. तो कृतीत येत नाही. त्याचप्रमाणे जो मदत करेल, त्या घटनेला वाचा फोडण्याचा प्रयत्न करेल त्यालाच दोष देणे सुरू होते. उदा. दिल्लीच्या बसमध्ये दिसलेल्या माणसाचे चित्रीकरण एका मुलीने केल्यावर तिच्या हेतूबद्दलच दुर्दैवाने शंका घेण्यात आली. त्याबद्दल उलट सुलट लिहिले गेले. हे चुकीचे आहे. त्यावेळी ती मुलगी तेवढेच करू शकत होती. त्या आधारे पोलिसांना किमान तपास तरी करता येणार आहे. अन्यथा काहीही नसताना ते कसा शोध घेऊ शकले असते? पण स्वतः काहीच करायचे नाही आणि करतात त्यांना नावे ठेवायची असे प्रकार सुरू आहेत. 

या घटनेनंतर तस्लिमा नसरीन यांनी एक ट्विट केले होते, की बलात्कार करण्यापेक्षा त्या माणसाने केलेला प्रकार सुसह्यच म्हणायला हवा. त्याने कोणाचे नुकसान तर झाले नाही. एका अर्थी हे बरोबरही आहे. पण तरी सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे काही नियम पाळणे आवश्‍यक असते. त्याने केलेल्या कृत्याचा मानसिक परिणामही कोणावर होऊ शकतो. मुळात या खूप खासगी बाबी आहेत. त्या अशा रस्त्यावर करणे, कोणाकडे बघून सूचक पद्धतीने करणे हे कितपत योग्य आहे? त्याची पुढची पायरी बलात्कारच असू शकते. त्यामुळे अशी कृत्ये निंदनीयच म्हणायला हवीत. 

आपल्याकडे काही विषयांवर मोकळेपणाने बोलले जात नाही. अनेकदा भावना दडपल्या जातात. ही विकृती त्यातूनही येत असावी. मात्र असे असले तरी त्याचे कदापिही समर्थन होत नाही. कोणी तसे करू नये. कारण कोणाच्या अशा विकृतपणामुळे एखाद्याचे केवळ भावविश्‍वच नव्हे, तर आयुष्यही उद्‌ध्वस्त होऊ शकते.. आणि ते कदापिही मान्य होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भावनांवर ताबा ठेवणे आवश्‍यक आहे. तसेच अशा बाबतीत समाजाचाही धाक असणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या