पावसाळ्यात पर्यटनाची काळजी

ऋता बावडेकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

संपादकीय

पावसाची जादूच काही वेगळी असते. त्याच्या चाहुलीनेच सर्व आसमंतात उत्साह येतो. मातीच्या सुगंधानंतर टपटप पडणारे पावसाचे थेंब हा उत्साह द्विगुणित करतात. पावसाच्या येण्यानेच इतका बदल होतो; त्याच्या दीर्घ मुक्कामानंतर तर सृष्टीचे रुपडेच पालटते. अंगावर हिरवाई मिरवणाऱ्या धरित्रीने पर्यटकांना, रसिकांना आकर्षित केले नाही तरच नवल! साहजिकच डोंगर-दऱ्यांकडे माणसांचा ओढा वाढतो. पावसाळी सहली आयोजित केल्या जातात. मात्र धरित्रीचे हे रूप जितके आकर्षक तितकेच प्रसंगी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असतानाच निसर्गाची काळजीही घ्यायची असते.. स्वतःचीही काळजी घ्यायची असते. अशावेळी दोष कोणाचा वगैरे मुद्दे व्यर्थ असतात.. एक चूक आणि सगळे होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. 

दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन सहलीला निघालेली खासगी बस महाबळेश्‍वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील दाभिल टोक या ठिकाणावरून ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसमधील ३३ जणांपैकी ३२ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरीत कोसळताना प्रकाश सावंत-देसाई हे बसमधून बाहेर फेकले गेल्यामुळे बचावले. दरी चढून ते वर आल्यानंतर अपघाताची माहिती सगळ्यांना समजली आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. पोलिस, त्यांचे बचाव पथक, महाबळेश्‍वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, पोलादपूर यंग ब्लड ट्रेकर्स, स्थानिक असे सगळे मिळून बचाव कार्यास सुरुवात झाली. मात्र हे काम तितके सोपे नव्हते. झाडे, तसेच दगडांवर साठलेले शेवाळे, वरून पावसाचा मारा, बोचरा वारा, धुके यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या. पण या सगळ्या अडचणींवर मात करत त्यांनी तब्बल २६ तासांनी सर्व मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आणि या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले. 

हा अपघात कसा झाला, चूक कोणाची, हा अपघात टाळता आला असता का वगैरे गोष्टी या अपघाताच्या बाबतीत निरर्थक वाटल्या तरी पुढे असे काही प्रसंग घडू नयेत यासाठी प्रत्येकानेच काळजी घेणे आवश्‍यक आहे. विशेषतः पावसाच्या दिवसात तर ही काळजी विशेष घेतली पाहिजे. एक तर वातावरण ओले असते. शेवाळे साचते. रस्ते, डोंगरउतार निसरडे झालेले असतात. जमीन भुसभुशीत झालेली असते. मुख्य म्हणजे, अशा निसर्गात आपण नवखे असतो. त्यामुळे निसर्गाबरोबर फार न खेळता आपल्या मर्यादेत राहिलेले बरे असते. दरवर्षी पावसाळ्यात लोणावळ्याजवळच्या भुशी डॅमवर प्रचंड गर्दी होते. त्यात काही वाहून जातात. हे दरवर्षीचे असले तरी आपला फाजील आत्मविश्‍वास कमी होत नाही. नको तिथे धाडस करायला आपण जातो. त्यामुळे स्वतः तर संकटात येतोच, पण आपल्याला वाचवणाऱ्याचा जीवही आपण धोक्‍यात घालत असतो. असे कितीतरी ठिकाणी होते. आंबेनळीच्या अपघातात नेमके काय घडले याची अजून तरी कल्पना नाही, पण हे अपघाताचे ठिकाण नाही, रस्ताही पुरेसा रुंद आहे, तरीही हा अपघात झाला. त्यामुळे निसर्गात फिरताना, विशेषतः पावसाळ्यात; आपण काळजी घेतलीच पाहिजे, हेच ही घटना पुन्हा एकदा सांगते. ही घटना दुर्दैवीच. पण अशा घटना पुन्हा घडू नयेत याची आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. 

पावसाळ्यातील असो वा अन्य कुठल्या मोसमातील असो, निसर्गात फिरताना त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न कधीच करू नये. त्याच्याशी जुळते घेऊनच निसर्गाचा आनंद घ्यायला हवा. पर्यटनाचा उद्देश त्यामुळे सफल होतो. पर्यटन करताना आपल्याला काय हवे असते? दोन घटका विरंगुळा! रोजच्या धकाधकीला, कटकटींना वैतागलेल्या मनाला थोडा विसावा हवा असतो. रुटिनमधून बाहेर पडून दोन क्षण आनंद उपभोगायचा आणि त्या जोरावर पुढचा प्रवास सुरू करायचा, हा पर्यटनाचा प्रमुख उद्देश असावा. खूप जण तसे करतात. काही ग्रुपने फिरतात, काही एकटेच भटकून येतात. प्रचंड ऊर्जा मिळवतात. मात्र काहींच्या सेलिब्रेशनच्या कल्पना अफाट असतात. त्यात अचाट, न झेपणारी साहसे येतात. अपेयपान येते. त्या तारेत निसर्गाची नासधूस केली जाते. पावसात ठिकठिकाणी छोटे-मोठे धबधबे असतात. त्याखाली उभे राहून अक्षरशः धिंगाणा घातला जातो. मात्र हे करताना वरून दरड कोसळू शकते, आणखी काही होऊ शकते याची कल्पना नसते किंवा फिकीरही नसते. मग नको तो प्रसंग ओढवलाच तर निसर्गाला दोष देऊन मोकळे होतात. पण निसर्गाची काय चूक असते? तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागत असतो. काळजी आपण घ्यायची असते. केवळ पर्यटन करणारे नव्हे, तर निसर्गाशी खेळणारे इतरही अनेक जण असतात. विकासाच्या नावाखाली ही मंडळी निसर्ग अक्षरशः पोखरून ठेवतात. समुद्र मागे हटवतात, डोंगर-टेकड्या फोडून ठेवतात, नद्या बुजवतात आणि बांधकामे करतात. वर परत ‘निसर्गाच्या सान्निध्यात’ अशी या बांधकामांची जाहिरात करतात. निसर्गाचा नाश करून तिथे काँक्रिटची जंगले उभी करायची आणि निसर्गाचेच गुणगान करत ग्राहकांना आकृष्ट करायचे.. किती हा विरोधाभास. पण कधीतरी निसर्गाचाही संयम सुटतो आणि मुंबईत २६ जुलै घडते. पुण्यात कात्रजजवळ काही वर्षांपूर्वी डोंगर कोसळून आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात माणसे, गाड्या वाहून जातात. म्हणूनच जाणकार मंडळी सांगत असतात, निसर्गाबरोबर खेळ नको. पण ऐकायला वेळ कोणाला आहे. धाडसाच्या वेडगळ कल्पना आपल्याकडे असतात, त्याच घात करतात. 

पर्यटनाला कोणाची ना नसते. पण ते मर्यादेत असावे. आपण जात आहोत, त्या ठिकाणाची नीट माहिती हवा. निसर्गात वावरताना त्याचा आब राखायला हवा. त्याला हानी पोचेल असे काही करता कामा नये. तरच पर्यटनाचा निखळ आनंद आपल्याला घेता येईल. 

संबंधित बातम्या